- 41
- 1 minute read
पुन्हा एकदा जोहरान ममदानी !
न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदासाठी जोहरान ममदानी या समाजवादी विचारांच्या तरुण नेत्याने जून २०२५ मध्ये झालेल्या प्रायमरी मध्ये डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी मिळवली. आणि अमेरिकन प्रस्थापित वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. ती अजूनही आहे.
रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोटात सर्वाधिक. कारण अमेरिकेतून ज्याला ज्याला समाजवादी विचारसरणीचा, डावेपणाचा वास येईल त्याला नेस्तनामूद करण्याचा ट्रम्प यांच्या “मागा” आंदोलनाचा जाहीर राजकीय अजेंडा आहे
ममदानी निवडणुकीत जिंकले तर “मागा” आंदोलनातील श्वेतवर्णीय अस्मितेच्या मुद्द्यातील हवेला टाचणी लागून सामान्य नागरिकांच्या जीवनमानाचे प्रश्न संपूर्ण अमेरिकेत ऐरणीवर येऊ शकतात हे अमेरिकन प्रस्थापित वर्ग ओळखतो. आणि त्याची गंभीरता देखील.
साहजिकच येत्या नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत कसेही करून ममदानी यांना पाडण्यासाठी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षा मधील कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या समर्थकांनी हात मिळवणी केली आहे.
दोन्ही पक्षातील भांडवलशाही प्रणालीच्या समर्थकांनी! हे मुद्दामहून अधोरेखित करूया. यातून ही प्रणाली कशी ऑपरेट होते हे कळते.
________
डेमोक्रॅटिक पक्षाचे न्यूयॉर्क शहरांमधील सर्वेसर्वा , जे स्वतः प्रस्थापित वर्गाचे एक प्रमुख स्तंभ आहेत, अँड्र्यू कुमो हे अपक्ष म्हणून ममदानी यांच्याविरुद्ध ही निवडणूक लढवणार आहेत. (ममदानी आणि कुमो दोघे डेमोक्रॅटिक पक्षाचेच आहेत ! ) त्यासाठी सर्व प्रतिस्पर्धी एकेका उमेदवाराला घरी बसवण्याचा अजेंडा राबवला जात आहे.
दोन दिवसापूर्वी न्यूयॉर्क शहराचे सध्याचे महापौर, स्वतः कृष्णवर्णीय असलेले एरिक ॲडम्स यांनी महापौर पदाच्या निवडणूक शर्यतीतून माघार घेतली.
डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क शहराचे रहिवासी आहेत. आपल्या राहत्या शहरात कडव्या समाजवादी तरुण नेत्याला महापौर बनू न देण्याचा चंग ट्रंप यांनी बांधला आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे कदाचित कोणताही उमेदवार दिला जाणार नाही असे ट्रम्प यांनी सुतोवाच केले आहे.
_______
भांडवलशाहीमध्ये भांडवलदारांच्या समर्थकांची आपल्या वर्गाशी असलेली बांधिलकी प्रथम आणि अंतिम असते. नॉन निगोशिएबल.
त्यांचे तत्कालीन राजकीय पक्ष अंगातील शर्ट सारखे असतात. वेळ आली तर वरकरणी विरोधी असणारे पक्ष आपसात हात मिळवणी करून मध्यमवर्गीय /कामगार/ कष्टकरी वर्गाला सर्व प्रकारे नामोहरम करतात.
कॉर्पोरेट आणि वित्त भांडवलशाही सर्व प्रकारची राजकीय सत्ता आपल्या हातात राहण्यासाठी नक्की कशी कार्य करते हे शिकण्यासाठी जोहरान ममदानी यांची केस स्टडी खूपच उपयुक्त ठरणार आहे. ज्यातून मिळणारी अंतरदृष्टी भारतासकट अनेक देशांना लागू होईल. ….
_______
…..भारताला देखील लागू होणारी अंतरदृष्टी काय असू शकेल…
भांडवलशाही प्रणालीची ताकद भांडवलदार वर्गामधील वर्गीय एकजुटीमध्ये आहे. देशांतर्गत वरकरणी परस्परांचे स्पर्धक असलेले कॉर्पोरेट वित्त भांडवलदार, आपल्या सामुदायिक वर्गीय हितासाठी एक होतात. एवढेच काय, एका देशातील कॉर्पोरेट वित्त भांडवलदार, केंद्र सरकारच्या धोरणांवर आपल्या हिताचा प्रभाव पाडण्यासाठी परकीय कॉर्पोरेट वित्त भांडवलदारांबरोबर हात मिळवणी करतात.
त्याला काउंटर करणारी शक्ती राजकीयच असू शकते. बिगर राजकीय एनजीओ नाहीत. अशी राजकीय शक्ती उभी करायची असेल तर, ग्रामीण शहरी भागातील, सर्वच क्षेत्रातील मध्यमवर्गीय/ कामगार/ कष्टकरी श्रमिकांची उभी रहात असलेली एकजूट अजून बळकट करावी लागेल. भांडवलशाही कडून वर्गीय हितसंबंधासाठी एकजूट कशी ठेवायची हे शिकावे लागेल.
मध्यमवर्गीय/ कामगार/ कष्टकऱ्यानी प्रचलित प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध का एकजूट करायची? त्यांची व्यक्तिगत दुश्मनी आहे म्हणून ? नाही. तर जगातील तीन चतुर्थांश जनतेच्या सर्व भौतिक प्रश्नांची मुळे या प्रचलित प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आहेत म्हणून. किमान त्यांच्या पुढच्या पिढ्यांना बरे दिवस मिळावेत म्हणून.
संजीव चांदोरकर (३ ऑक्टोबर २०२५)