• 45
  • 1 minute read

आज्ञाधारकपणा एक मोठा अवगुण! –जगदीश काबरे

आज्ञाधारकपणा एक मोठा अवगुण! –जगदीश काबरे

भारतात मुलांनी प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, संशय घेणे, चिकित्सा करणे, ही सगळी उद्धटपणाची लक्षणे मानली गेलेली आहेत.

     भारतीय कुटुंब व्यवस्थेत मुलांवर केला जाणारा सगळ्यात वाईट संस्कार म्हणजे आज्ञाधारकपणा! हंss असे दचकून जाऊ नका, मी योग्य शब्द वापरला आहे. कारण आज्ञाधारकपणा म्हणजे आज्ञा धारण करणारा म्हणजेच कुठल्याही प्रकारे प्रश्न विचारता, शंका उपस्थित न करता निमूटपणे सांगेल तो आदेश पाळणारा… थोडक्यात मेंढरू वृत्तीचा. आज्ञाधारक मुले ही सरळ वळणाची असतात, असा समज समाजात घट्ट रुतून बसला आहे. पण वळण कधी सरळ असते का, हा प्रश्न मला कायम पडतो. असे आज्ञाधारक सांगकामे गुलाम बनवणे हाच आपल्या संस्कृतीचा पाया राहिलेला आहे आणि म्हणून आपल्या संस्कृतीला पु ल देशपांडे गमतीने म्हणत ही “गप्प बसा” संस्कृती आहे. या आज्ञाधारकपणामुळे आपण आपली पुढची पिढीची एक प्रकारे निष्ठुरपणे आदेश पाळणारी हृदयशून्य यंत्र मानवी संस्कृती तयार करत असतो. त्यातूनच मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, शिवप्रतिष्ठानचे धारकरी अथवा इस्लामिक स्टेट, सिमी यासारख्या धर्मांधांच्या झुंडी तयार होत असतात. या झुंडी मालकाने छूss केल्याबरोबर इमानी कुत्र्याप्रमाणे भुंकायला सुरुवात करतात. मग तो आदेश योग्य आहे की अयोग्य आहे हे पाहिले जात नाही. कारण आदेश पाळणे आणि आज्ञाधारकपणा हाच आपल्याकडे सर्वोत्तम गुण समजला गेलेला आहे.

या आज्ञाधारकपणाच्या संस्कारामुळे भारत मागास राहिलेला आहे. भारतात मुलांनी प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, संशय घेणे, चिकित्सा करणे, ही सगळी उद्धटपणाची लक्षणे मानली गेलेली आहेत. भारतीय धर्मग्रंथातूनच “संशयात्मा विनश्यति” असे वचन सांगितले गेलेले असल्यामुळे संशय घेणाऱ्याचा, प्रश्न विचारण्याचा, शंका उपस्थित करणाऱ्यांचा नाश होतो असा समज सर्वदूर पसरला आणि त्यातून ही “गप्प बसा संस्कृती” जन्माला आली. यामुळे भारतात कुठल्याही प्रकारचा नवीन वैज्ञानिक शोध लागला नाही आणि भारतीय सतत पूर्वजांचे गोडवे गाण्यात मग्न होत राहिले. प्रश्न न विचाराच्या सवयीमुळे नवीन कल्पनांचा उदय झाला नाही. त्यामुळे पुरातन गोष्टीला कवटाळून बसणे हेच उच्च संस्कार आहेत असे समाजात मूल्य रुजले. याचा परिणाम आज आपण पाहत आहोतच की, भारतात मोठ्या प्रमाणात तरुणांच्या बेलगाम झुंडीच्या झुंडी निर्माण झालेल्या आहेत. मुठभरांच्या वर्चस्वासाठी आज्ञा पाळणारे शेकडो मानसिक गुलाम तयार झालेले आहेत. लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यापेक्षा मनुस्मृतीतील विषमतेलाच डोक्यावर घेऊन नाचणारे संस्कारी(!) लोक तयार झालेले आहेत.

प्राचीन भारतातही प्रश्न विचारण्याची सवय होती त्यामुळे गार्गी, मैत्रेयीसारख्या विदुषी, कणाद बृहस्पतीसारखे तत्त्वज्ञ, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्यसारखे शास्त्रज्ञ निर्माण होत होते. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्या काळात भारत तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारत होता. पण नंतर काय झाले? त्यानंतरच्या काळात विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीच्या पगडा सामान्यजनांच्या डोक्यावर घट्ट बसला. जातीयतेचे कुंपण उभारून स्वतःलाच पारतंत्र्यात कैद करून घेतले. त्याचा फायदा घेऊन काही मूठभर वर्चस्ववाद्यांनी धर्मग्रंथांचा आधार घेत आज्ञाधारकपणा हा सर्वोत्तम गुण बनवला. परिणामी गेली सुमारे हजार वर्षे भारतीय मागास होत गेला तो आजतागायत. थोड्याबहुत प्रमाणात पाश्चात्य देशातही हीच परिस्थिती होती. पण पंधरा-सोळाव्या शतकापासून विज्ञानाची किल्ली पाश्चात्य माणसाला सापडली आणि जीवाचे मोल देऊनही प्रश्न विचारायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणून आज पाश्चात्य देश विकसित झालेले दिसत आहेत.

तेव्हा माझ्या भारतीय बांधवांनो, प्रश्न विचारायला कचरू नका. कुणीतरी दिलेल्या आज्ञा निमुटपणे डोकं गहाण ठेवून पाळण्यापेक्षा त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा विचार करा आणि मगच त्या पाळायच्या की नाही हे ठरवा. कोणत्याही घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रश्न विचारणे, चिकित्सा करणे आणि त्यावर योग्य उत्तर शोधणे हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून जर आजची तरुणाई वाटचाल करू लागेल तर लवकरच भारत देशही विकसित होईल. अन्यथा प्रश्न न विचारण्याच्या, शंका उपस्थित न करण्याच्या आणि आज्ञा पाळण्याचा आज्ञाधारकपणामुळे आजची परिस्थिती कशी अराजकसदृश्य झालेली आहे ते आपण पाहत आहोतच. विचार तर कराल…!

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *