• 41
  • 1 minute read

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

        आमचे दोन्ही मित्र नीरज हातेकर Neeraj Hatekarआणि हितेश पोतदार Hitesh D. Potdar यांनी फेसबुकवर “नवउदारमतवाद” या संकल्पनेबद्दल चर्चा छेडली आहे. अशा वैचारिक चर्चा सोशल मीडियावर फार कमी होतात. त्याचे स्वागत. त्यात माझा छोटा वाटा

या फरकाबद्दल मंथली रिव्ह्यूच्या मे २०१९ च्या अंकात संपादक जॉन बेलामी फॉस्टर यांनी एक लेख लिहिला होता “Absolute Capitalism” त्यांच्या त्या लेखावर आधारित एक मराठी लेख मी युगांतर साठी लिहिला होता. तो बराच मोठा आहे. त्यातील काही तुकडे सिरीज मध्ये येथे शेयर करत आहे.
___________

नवउदारमतवाद (निओ लिबरॅलिझम) हा शब्द आपण गेली ३०-३५ वर्षे सर्रास वापरत आहोत.

आपल्याला माहित असणारा उदारमतवाद हा “नवा” म्हटला जात असेल तर “जुना” उदारमतवाद असलाच पाहिजे. मग तो कोणता ? नवउदारमतावाद हा शब्द रूढ होण्याच्या आधी देखील उदारमतावादी विचारधारा कार्यरत होती. फक्त तिला त्यावेळी “जुनी” म्हणण्याची गरज पडली नव्हती. या दोन उदारमतवादी विचारधारांमधील फरक समजून घेण्याआधी खालील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत:

(एक) दोन्ही उदारमतवादी विचारधारा, निओ आणि त्या आधीची, भांडवलशाही प्रणालीचीच पाठराखण करणाऱ्या आहेत हे नक्की. जुन्या उदारमतवादी विचारधारेऐवजी नव-उदारमतवादी विचारधारा केंद्रस्थानी आणली गेली त्याचा संबंध भांडवलशाही प्रणालीत झालेल्या काही मूलभूत बदलाशी आहे.

औद्योगिक व स्पर्धात्मक भांडवलाच्या ऐवजी वित्त व एकाधिकारशाही (फायनान्स-मोनोपॉली) भांडवल जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येणे हा तो मूलभूत फरक आहे.

(दोन) असा समज व्हायची शक्यता आहे कि औद्योगिक भांडवलशाही व वित्त भांडवलशाही यांचे संबंध शत्रुभावी आहेत. तसे ते नाहीयेत. औद्योगिक भांडवलदार आणि वित्त भांडवलाचे वाहक यांच्यात पूर्वीच्या काळी दोन सरंजामदारांमध्ये जसे हाडवैर असते तसे नसते. एकाच वर्गात मोडत असल्यामुळे त्यांच्यात वर्गीय हितसंबंधनाबद्दल कमालीचे सौहार्द असते, वर्गीय सामंजस्य असते.

वाढावा/ सरप्लस भांडवलाकडे वर्ग झाला पाहिजे, भांडवलाची महत्ता टिकली पाहिजे, अर्थव्यवस्थेत अनेक स्टेकहोल्डर्स असले तरी भांडवलाचे हितसंबंध त्या सर्व सेटहोल्डर्सच्याही पलीकडे असले पाहिजेत अशा गीष्टींवर त्यांच्यामध्ये कमालीचे एकमत आहे.

उत्पादन कसे व कशासाठी करायचे, अर्थव्यस्वस्थेतील स्पर्धेची व्याख्या व व्याप्ती काय ठेवावी, अर्थव्यस्वस्थेतील शासनाची भूमिका काय असावी, आर्थिक विषमता व तत्सम मूल्याधारित जजमेंट्सना किती महत्व द्यावे याबद्दल या दोन प्रकारच्या भांडवलशाहीत मतभेद आहेत.

(तीन) भांडवल हे अपौरेषय आहे, अमूर्त संज्ञा आहे. भांडवलदार मूर्त आहे. आपण म्हणू शकतो अनिल अंबानी, गौतम अडानी हे आजच्या काळातील भारतीय भांडवलदार आहेत.

वित्त भांडवल अशी संज्ञा वापरात असली तरी वित्त भांडवलदार अशी संज्ञा वापरात नाही. वित्त भांडवलाचे वाहक बँकर्स, इन्व्हेस्टमेंट बँकर्स, फंड मॅनेजर्स या व्यक्ती असतात. अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर नक्की पण भारतात कमी प्रमाणात.

संजीव चांदोरकर (२७ ऑक्टोबर २०२५) क्रमशः

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *