- 43
- 2 minutes read
धम्मदीपातून उजळलेलं एक आयुष्य डी. एल. कांबळे यांना ७५ व्या वर्षात अभिवादन!
डी. एल. कांबळे : बौद्ध साहित्यविश्वाततील एक तेजस्वी धम्मदीप !
दशरथ लक्ष्मण कांबळे (डी. एल. कांबळे) — हे नाव आज बौद्ध साहित्यविश्वात एका तेजस्वी धम्मदीपासारखं झळकतंय. २८ ऑक्टोबर १९५० रोजी भंडारा जिल्ह्यातील मासलमेटा या छोट्याशा गावात जन्मलेले कांबळे सर, आयुष्याच्या पहिल्याच वर्षी पित्याच्या छत्रछायेशिवाय राहिले, पण आईच्या कठोर श्रम, त्याग आणि करुण प्रेमातून उभं राहिलं एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व.
गरीबीतही शिक्षणाची ओढ कायम ठेवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद सायन्स कॉलेज, औरंगाबाद येथून उच्च शिक्षण घेतलं. याच काळात धम्मचळवळीची जाणीव त्यांच्या अंतःकरणात रुजली आणि पुढे त्या जाणिवेचं रूपांतर एका महान धम्मयोध्याच्या प्रवासात झालं.

१९७२ मध्ये दूरसंचार खात्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून सुरुवात करून, अखेर BSNL कल्याण येथे Assistant General Manager (TP) पदावरून ३१ ऑक्टोबर २०१० रोजी निवृत्त झाले. पण त्यांचा खरा प्रवास धम्माचा प्रचार आणि प्रसार निवृत्तीनंतर अधिक जोमाने सुरू झाला.
धम्मकार्यासाठी आयुष्य समर्पित :
१९९६ पासून त्यांनी TBMS येथे धम्ममित्र दीक्षा घेतली. विपश्यना शिबिरांमधून त्यांनी धम्माचे गूढ समजून घेतले. धम्मदीप बुद्धविहारात त्यांनी सुरू केलेल्या धम्मवर्गांमुळे अनेकांनी बुद्ध, धम्म आणि संघ यांची ओळख पुन्हा जिवंत केली.
साहित्यनिर्मितीची असामान्य साधना :
२१ मार्च २००४ रोजी “धम्मपद गाथा आणि कथा खंड १” या ग्रंथापासून सुरू झालेला साहित्य प्रवास आज २५ हून अधिक ग्रंथांपर्यंत पोहोचला आहे.
त्यातील काही महत्त्वाचे ग्रंथ :
धम्मपद गाथा आणि कथा (खंड १ ते ७)
बोधिसत्वाच्या जातक अनुकथा (खंड १ ते ११)
तथागतांचा धम्म आणि विज्ञान
खरा धम्मधर कोण?
बुद्धप्रणीत कम्मसिद्धांत, पुनर्जन्म सिद्धांत, सुगम धम्मपद इत्यादी.
या सर्व ग्रंथांतून त्यांनी लोकमानसात तथागतांचा खरा धम्म पोहोचवण्याचं कार्य केले. त्यांच्या लेखनात विचारांची सखोलता, शब्दांची संयमता आणि बुद्धधम्माची वैज्ञानिक मांडणी यांचा अद्भुत संगम दिसतो.
संघटनात्मक आणि साहित्य चळवळ :
‘अस्मिता शैक्षणिक धम्मविषयक साहित्यिक चळवळ, उल्हासनगर-४’ या संस्थेशी ते सुरुवातीपासून जोडले गेले.
ते ५व्या आणि ७व्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले — आणि असंख्य धम्मप्रेमींना साहित्यातून जागं करण्याचं काम केलं.
नाट्य, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांतून धम्मसेवा :
“ज्योतीची ज्योत” हे ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित संगीत नाटक आचार्य अत्रे रंगमंदिरात हाऊसफुल्ल शो!
धम्मसूर्य प्रकाशन या संस्थेतून अनेक ग्रंथ प्रकाशित. धम्मसूर्य चॅनल वर त्यांच्या धम्मविषयक व्याख्यानांचे व महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन विषयक ९० हून अधिक व्हिडिओ उपलब्ध. दैनिक वृत्तरत्न सम्राट, दै. विश्व सम्राट आणि जनतेचा महानायक या वृत्तपत्रांतून त्यांनी लेखन करत धम्मप्रबोधनाचा दीप प्रज्वलित ठेवला.
सन्मान व गौरव :
१)त्यांच्या अथक कार्याचा गौरव अनेक संस्थांनी केला —
२) भदंत आनंद कौसल्यायन धम्मलेखन महानायक पुरस्कार २०१०
३) कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा सन्मानचिन्ह (२०१६-१७)
४) सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ (२०२४)
५) मूलभारतीय विचार मंचचा ‘Native Hero Award’ (२०२५)
आयुष्याचा संदेश :
“धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हिच खरी मानवसेवा होय.”
या एकाच ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन त्यांनी आयुष्यभर समाजजागृती, लेखन आणि प्रबोधन यांचा दीप प्रज्वलित ठेवला.
आज जेव्हा डी. एल. कांबळे सर आपले ७५वे वर्ष पूर्ण करत आहेत आणि त्यांच्या ‘गौरवग्रंथाचे प्रकाशन’ झाले आहे तेव्हा त्यांचं संपूर्ण जीवन हेच एक जिवंत धम्मपद वाटतं! अशा या थोर धम्मदीपाला, साहित्यक्षेत्रातील महानायकाला, आमचं कोटी कोटी नमन! “दीर्घायुषी व्हा सर, तुमच्या लेखणीचा प्रकाश समाजाला नवी दिशा देत राहो!”
© साहित्यिक नवनाथजी रणखांबे
( आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विविध ऐतिहासिक वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड धारक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित)