बॅरिस्टर वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा वकील संघाला भेट
धुळे, दि. ३१ (यूबीजी विमर्श-संहिता) धुळे जिल्हा वकील संघाच्या सभागृहात भारताचे लोहपुरुष आणि एकात्मतेचे शिल्पकार बॅरिस्टर वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वकिल संघाच्या हॉल मध्ये दुपारी २:००वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी वकील संघाचे सदस्य अॅड. ए. एम. शहा व अॅड. अनिश शहा यांनी बॅरिस्टर वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा वकील संघाला भेट दिली. वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बॅरिस्टर वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जेष्ठ विधिज्ञ शामकांत पाटील, जितेंद्र निळे, आर.डी जोशी,राहुल भामरे,गोरक्ष माळी, वकील संघाचे सचिव उमेशकांत पाटील, हिंमाशु वाणी,सचिन जाधव,, नितीन पाटील,आर डी जोशी,श्रीराम देशपांडे व वकील बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वकिली क्षेत्रातील योगदान बॅरिस्टर वल्लभभाई पटेल हे केवळ भारताचे एकीकरण करणारे नेते नव्हते, तर अतिशय कुशल आणि प्रामाणिक वकील होते. लंडनच्या मिडल टेंपल इन्स ऑफ कोर्ट येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून १९१३ साली त्यांनी अहमदाबाद येथे वकिली सुरू केली. फौजदारी प्रकरणांमधील त्यांचा तार्किक आणि प्रभावी युक्तिवाद प्रसिद्ध होता. त्यांच्या न्यायालयीन कार्यात सत्य, शिस्त आणि नीतिमत्ता या मूल्यांचा ठसा कायम दिसून येत असे.महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपले यशस्वी वकिलीचे करिअर सोडून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. खेड़ा सत्याग्रह आणि बारडोली सत्याग्रह यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे वकील म्हणून न्यायासाठी लढा दिला. याच कार्यामुळे त्यांना “सरदार” ही उपाधी मिळाली. अध्यक्ष अॅड. राहुल पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “बॅरिस्टर वल्लभभाई पटेल यांनी न्याय, प्रामाणिकता आणि राष्ट्रहित यांचा संगम घडवून वकिली या व्यावसायाला एक वेगळी ओळख दिली.आज त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना अभिवादन करणे आहे.”जेष्ठ वकीलांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सरदार पटेल यांचे आदर्श आजच्या पिढीतील वकिलांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे वकिली क्षेत्रातील पटेल यांचे योगदान व आदर्श पुन्हा एकदा उजाळले गेले. सदर कार्यक्रमात वकील संघाचे जेष्ठ सदस्य, पदाधिकारी व वकील सदस्य उपस्थित होते.