- 23
- 1 minute read
“आयपीओ’ महापूर : ही पोस्ट नवीन गुंतवणूकदारांसाठी!
“आयपीओ’ महापूर : ही पोस्ट नवीन गुंतवणूकदारांसाठी!
पूर सदृश्य परिस्थितीत वाहून जाऊ शकणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा द्यायला हवा. पण इथे तर लोकांना सांगितले जात आहे की हे जे पुराचे पाणि आहे ते तुमच्याकडच्या हंड्यात, बादलीत भरून घ्या !
______
देशातील प्रायमरी मार्केट मध्ये आय पी ओ चा महापूर आला आहे. जानेवारी पासून ९६ कंपन्यांनी १,५३,००० कोटी रुपये उभे केले आहेत.
या पुराची पातळी शेवटच्या महिन्यात डिसेंबर मध्ये वाढणार आहे. पुढच्या महिन्यात आठ कंपन्या अजून ३०,००० कोटी रुपये उभारणार आहेत.
आय पी ओ मधील रिटेल गुंतवणूकदारांची संख्या काही पटींनी वाढली आहे. यापैकी अनेकांना भांडवली बाजारातील अनेक संज्ञा माहित, कळत नसतील. ही पोस्ट मुख्यत्वे त्यांच्या सारख्या गुंतवणूकदारांसाठी आहे.
ग्रे मार्केटमध्ये काय प्रीमियम सुरू आहे हे बघून आयपीओ मध्ये गुंतवणूक करणारे बरेच आहेत. रिटेल गुंतवणूकदारांना हे देखील मनात येत नाही की …अरे, वेस्टेड इंटरेस्ट ग्रे मार्केट प्रीमियम मॅन्युप्युलेट करू शकतात की !
_____
आयपीओ मार्केट कडे वस्तुनिष्ठपणे कसे बघायचे ? उदा जानेवारी पासून जे आयपीओ आले आहेत त्या कंपन्यांचे शेअर्स आता किती रुपयांवर ट्रेड होत आहेत हा एक निकष असू शकतो. जानेवारीपासूनच्या एकूण आयपीओ पैकी
३२ आय पी ओ इश्यू प्राईस पेक्षा कमी किंमतीवर
३१ आयपीओ इश्यू प्राईस पेक्षा १ टक्का ते १० टक्के जास्त किमतीला ; बाकीचे यथातथाच
फक्त चार आयपीओ इश्यू प्राईस पेक्षा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत.
(सर्व माहिती बिझीनेस लाइन नोव्हेंबर २५, पान क्रमांक ६)
गेल्या पाच किंवा दहा वर्षाची आयपिओ परफॉर्मन्सची आकडेवारी काढली तर अजून फाटलेली लक्तरे दिसतील. अलीकडच्या काळात तर जास्तच कारण अनेकानेक आयपिओ ऑफर फॉर सेल स्वरूपाचे आहेत. ज्यातून कोणत्याही नवीन उत्पादक मत्ता तयार होत नाहीत. आयपीओमुळे ना उत्पादक क्षमता वाढणार असतात, ना विक्री वाढणार असते ना नफा..
_______
खरतर आयपीओ परफॉर्मन्सची ही माहिती लहान गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याची घटनादत्त जबाबदारी असणाऱ्या, नियामक मंडळांची / सेबीची असली पाहिजे.
त्यांनी २०२५ सालाचीच नव्हे तर गेल्या पाच वर्षांपासून आय पी ओ चा परफॉर्मन्स कसा आहे याची आकडेवारी वेबसाईट वरच नाही तर वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर टाकली पाहिजे. सगळी माहिती उपलब्ध आहे. ती प्रभावीपणे पोचवली जात नाही. हे शिक्षण कोण करणार ? ब्रोकर करणार की सेबी?
सेबी दावा करते की ती छोट्या गुंतवणूकदारांची वित्तीय साक्षरता वाढवतात. म्हणजे काय फक्त डिमॅट अकाऊंट कसा उघडायचा याची माहिती ?
सेबी जाऊदे. अनेक मध्यमवर्गीय प्रोफेशनल्स स्वतःला फायनान्शीयल इन्फ्लुएन्सर्स म्हणून घेतात. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियावर. ते असे काहीही बोलत नाहीत, की ज्यामुळे भांडवल बाजारातील सामान्य गुंतवणूकदारांची संख्या घटेल. मग सुपारीबाज म्हटले की त्यांना राग येतो.
पुन्हा पुन्हा मुद्दा, फक्त फायनान्शियल इन्फ्ल्यूएंसर्स नाही.
तर सर्व क्षेत्रातील, बँकर्स, मर्चंट बँकर्स, नोकरशहा, नियामक मंडळे सर्वच, मध्यमवर्गीय प्रोफेशनल्सच्या बौध्दिक प्रामाणिकपणाचा अभाव अधोरेखित होत असतो. “प्रोफेशनल इंटिग्रिटी”चा संबंध डाव्या उजव्या विचारसरणीशी नाही.
____
धरणाचे दरवाजे उघडले जात असताना शासकीय यंत्रणा बाधित होऊ शकणाऱ्या गावात जाऊन इशारे देत असतात. की संभाळून, सतर्क रहा. नजर ठेवतात. मॉनिटर करतात.
पण इथे ज्यांच्यावर हि इशारे देण्याची जबाबदारी किंवा अपेक्षा आहे तेच सांगत आहेत की हा जो पूर आहे त्याच्या पाण्यातून तुम्ही घरातील बादल्या, हंडे, भांडी भरून घ्या
संजीव चांदोरकर (२६ नोव्हेंबर २०२५)