- 11
- 1 minute read
महामानवाच्या स्मृतीतून मनाला भिडणारा महापरिनिर्वाण दिन
महामानवाच्या स्मृतीतून मनाला भिडणारा महापरिनिर्वाण दिन
6 डिसेंबर हा भारतीय इतिहासातील एक भावस्पर्शी, चिंतनशील आणि आत्मपरीक्षणाचा दिवस. हा फक्त एका महामानवाच्या देहपरीत्यागाचा दिवस नाही; हा त्या महामानवाच्या विचारज्योतीचा पुनर्जन्मदिन आहे. हा दिवस मानवी स्वाभिमानाची, लोकशाही संस्कृतीची आणि सामाजिक परिवर्तनाची आठवण करून देणारा दिवस आहे. हा दिवस कॅलेंडरवरील फक्त एक दिवस नाही. तो एका महामानवाच्या देहपरीत्यागाचा क्षण असला, तरी त्याच क्षणी त्याच्या विचारांचा जन्म झाला; विचारांच्या क्रांतीची अक्षय ज्योत प्रज्वलित झाली. हा दिवस केवळ शोकाचा नाही; तो अंतर्मनाची जागृती, समाजपरिवर्तनाचा संकल्प आणि लोकशाही संस्कृतीच्या आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. हा दिवस केवळ बाबासाहेबांच्या स्मृतींचा दिवस नसून, न्याय, समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांना नव्याने जागवणारा दिवस आहे. हा दिवस भारतीय समाजाला आत्मचिंतनाची, जागृतीची आणि कृतज्ञतेची साक्ष देणारा ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो. महापरिनिर्वाण दिन हा स्मरणाचा नाही, तर संकल्पाचा दिवस आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचा संकल्प, अंधश्रद्धा, असमानता आणि वर्णभेद मोडून काढण्याचा संकल्प आणि “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा” या मंत्राला कृतीत आणण्याचा संकल्प. शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र, अन्यायाविरुद्ध संघर्षाची ठाम भूमिका आणि संघटित समाज हीच खरी ताकद आहे. बाबासाहेब गेले, पण त्यांचे विचार अमर झाले म्हणूनच ‘महापरिनिर्वाण’ म्हणजे अंत नव्हे, तर एका विचारक्रांतीचा नवा आरंभ!
बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका महान नेत्याचे नव्हे, तर विचारांचे विश्व होते. गरीब, वंचित, बहिष्कृत आणि शोषित समाजाला त्यांनी कायद्याचा आधार दिला, शिक्षणाची ताकद दिली आणि जगण्याचा स्वाभिमान दिला. “मी जन्मलो अंधारात, पण संघर्षाच्या प्रकाशाने जग उजळून टाकले,” ही केवळ त्यांची कथा नाही, तर संपूर्ण भारतीय समाजाची नवचैतन्याची कहाणी आहे. बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे फक्त कायद्यांचे पुस्तक नाही, ते मानवतेचे पवित्र ग्रंथ, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे चार अतूट स्तंभ आहेत. ते फक्त वाचायचे नाहीत, ते जगायचे आहेत. पण आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, आपण या मूल्यांना खरंच जगत आहोत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दोन गोष्टी दिल्या, एक म्हणजे जागृक बुद्धी आणि दुसरी म्हणजे जागृत वैचारिक जबाबदारी. आज आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो तेव्हा फुलांच्या हारात ते समाधानी नसतात; ते समाधानी असतात, जेव्हा आपण त्यांच्या विचारांच्या अंगाऱ्याला कृतीच्या श्वासाने तेज देतो. फुले आणि शब्द वाहून चालणार नाही; विचारांची कृतीमय वाहतूक ही खरी अभिवादनमय श्रद्धांजली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला कायदे, अधिकार आणि स्वाभिमान दिला. त्यांनी केवळ समाजाच्या उपेक्षित, शोषित घटकांना आवाज दिला नाही, तर संपूर्ण भारताला ‘मानव म्हणून जगण्याची कला’ शिकवली. त्यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि संघर्ष आजही प्रकाशस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. त्यांचे जीवन मुठीत माती घेऊन सुरू झाले पण त्या मातीला त्यांनी ज्ञानाच्या सुवर्णकणांनी समृद्ध केले. जगभरातील 40 दशलक्षांहून अधिक गुलाम मनांना त्यांनी विचारांचा उधाण दिला. जन्मानं हीन, पण कर्मानं महान होण्याची प्रेरणा त्यांनी दिली, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, हीच महानायकाची अखेरची शिकवण. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञान, संघर्ष आणि स्वाभिमानाची जिवंत शाळा. ते म्हणाले होते“मला माझ्या मृत्यूनंतर पाहायचे असेल, तर माझ्या समाधीवर येऊ नका; माझ्या विचारांकडे पाहा, माझ्या पुस्तकांकडे पाहा, माझ्या संघर्षाकडे पाहा, कारण तिथेच मी जिवंत आहे!”
6 डिसेंबरला आपण लाखोंच्या संख्येने मुंबईतील चैत्यभूमीवर जमा होतो; मेणबत्त्या लावतो, पण आपण अंतर्मनात विचारांची ज्योत पेटवतो का? बाबासाहेबांच्या समाधीवर मेणबत्त्या लावता-लावता आपण आपल्या अंतर्मनातील मेणबत्ती प्रज्वलित करतो का? 6 डिसेंबर आपल्याला एक प्रश्न विचारतो, आपण बाबासाहेबांना फक्त वंदन करतो, की त्यांच्या विचारांची वंदनीय कृती करतो? आपण समाज बदलतो की समाजाकडून फक्त भावनिक शब्द घेतो? त्यांनी दिलेल्या संविधानाच्या दिव्यज्योती भोवती आपण सजावट करतो की त्या ज्योतीने अंधारात प्रकाश आणतो? मृत्यू एखाद्या व्यक्तीचा होतो, पण विचार अमर होतो. डॉ. आंबेडकर देहाने गेले, पण त्यांनी दिलेला संविधानाचा श्वास आजही जिवंत आहे. त्यांची बौद्ध धम्माकडे झेप, ही आध्यात्मिक नाही; ती मानवी प्रतिष्ठेची समानतेची क्रांती होती हीच महामानव आणि आपली जाणीव आहे. त्यांनी शेवटी म्हटलं होतं, “मी हिंदू म्हणून मारणार नाही” हे धार्मिक वाक्य नव्हतं, ते मानवी अस्मितेचं घोषणापत्र होतं. आजची अत्यंत गरज आहे बाबासाहेबांना समजून घेणे, फक्त पाठ करणे नाही. समाजाला मसिहा नको, समाजाला मार्गदर्शक हवा. देणाऱ्याला देव बनवून थांबू नका तर त्याचा विचार देवत्वाने जगवा. बाबासाहेबांची शिकवण तांत्रिक नाही; ती जीवनतत्त्वज्ञान आहे. ती तत्त्वज्ञान फक्त उधृत केल्याने नाही, तर जगल्याने प्रभावी होते.
आज विषमता, धार्मिक कट्टरता, जातीगत द्वेष, आर्थिक अन्याय पुन्हा समाजाला जखडू पाहत आहेत. अशा वेळी बाबासाहेब जागृत स्वरात आपल्याला आठवण करून देतात “राजकीय स्वातंत्र्य व्यर्थ आहे, जोपर्यंत सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही.” आजच्या परिस्थितीत हे वाक्य विशेषतः ठामपणे जाणवते. बाबासाहेब म्हणाले होते, “मी ज्या समाजासाठी लढलो, तो समाज जर झोपला तर माझे कार्य अपूर्ण राहील.” म्हणूनच आज 6 डिसेंबरच्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांचा दीप पुन्हा प्रज्वलित करू या. आज बाबासाहेबांची गरज पुतळ्यांत नाही, तर मनांत आहे. त्यांच्या विचारांची गरज केवळ ग्रंथांत नाही, तर कृतीत आहे. त्यांच्या लोकशाहीची गरज केवळ संविधानात नाही, तर समाजव्यवस्थेत आहे. महापरिनिर्वाण दिन हा स्मरणाचा नव्हे, संकल्पाचा दिवस आहे. मी जातभेद मोडीन, समतेची वीट बनेन, मी संविधान फक्त वाचणार नाही, तर त्याचा रक्षक बनणार तसेच, मी बाबासाहेबांना स्मरणार नाही तर त्यांच्या विचारांना स्मरणीय करीन, हीच आजची आजची सशक्त प्रतिज्ञा आहे. म्हणून त्यांची शेवटची ओळ जो प्रत्येकाने मनात कोरावी, “बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केले, पण मुक्ततेची किंमत आपण जपू शकतो का?” खरी प्रतिज्ञा अशी असावी. ही जाणीव, ही जागृती, ही जबाबदारी, यालाच आपण म्हणू शकतो महापरिनिर्वाणाची खरी श्रद्धांजली! आज डॉ. आंबेडकर आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार आपल्यात आहेत. ते विचार आपल्याला सजग करतात, सशक्त करतात, आणि माणूस म्हणून जगण्याची कला शिकवतात. “ज्या समाजात मनुष्य मनुष्याचा शत्रू नाही, ज्या समाजात बंधुता हीच खरी संपत्ती आहे, असा समाज घडवण्याचे स्वप्न बाबासाहेबांचे होते.” हे स्वप्न जगणे, जपणे आणि पुढील पिढीकडे पोहोचवणे हेच खरे महापरिनिर्वाण! विचार अमर आहेत. मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा अंतर्मनाचा प्रकाश उजळवू या. महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली !
प्रविण बागडे