मुंबई | दि. २९ डिसेंबर २०२५
PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदासाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी हजारो उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र महायुती सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, दिरंगाईमुळे आणि निर्णयक्षमता अभावामुळे आजही या अत्यंत संवेदनशील व न्याय्य मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी हजारो पात्र, मेहनती आणि प्रशिक्षित तरुण वयोमर्यादेबाहेर फेकले गेले असून त्यांच्या भविष्याशी थेट खेळ केला जात आहे. हा केवळ अन्याय नसून लाखो युवकांची उघड फसवणूक आहे.
PSI परीक्षेसाठी उमेदवारांनी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, आर्थिक गुंतवणूक, शारीरिक तयारी आणि मानसिक तयारी केली आहे. PSI जाहिरात सरकारकडून तब्बल अनेक महिने उशिरा प्रसिद्ध झाली—हा दोष पूर्णपणे सरकारचा आहे. मात्र या प्रशासकीय अपयशाची शिक्षा परीक्षार्थींना दिली जात असून अवाजवी वयोमर्यादेमुळे पात्र उमेदवारांना संधी नाकारली जात आहे. हा घोर अन्याय तात्काळ थांबवला गेला पाहिजे.
महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे की PSI पदासाठी *तात्काळ १ वर्ष वयोवाढीचा GR जाहीर करावा* आणि वयोमर्यादेची गणना *०१ जानेवारी २०२५* प्रमाणे करण्यात यावी. आत्तापर्यंत सर्वच पक्षांच्या ९० पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींनी
या मागणीसाठी सरकारकडे लेखी पत्रे सादर केली आहेत, तरीही सरकारने निर्णय घेतलेला नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
जर सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने *पुणे शहरात तीव्र, व्यापक आणि रस्त्यावर उतरून आंदोलन* छेडले जाईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महायुती सरकारची असेल.
तरुणांचा संयम आता संपत चालला आहे. वेळेत निर्णय न घेतल्यास सरकारला याचे गंभीर राजकीय व सामाजिक परिणाम भोगावे लागतील.