तंत्रज्ञानात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत होणाऱ्या काही मूलभूत बदलांमुळे, माणसाच्या सवयी आणि म्हणून पूर्वापार चालत आलेले सामाजिक/ सांस्कृतिक आयाम आपल्या नकळत बदलत आहेत.
हे शहरी भागात, श्रीमंत उच्च वर्गातच नाही तर अगदी मध्यम/ निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात देखील वेगाने घडत आहे. ग्रामीण भागाला आणि गरीब कुटुंबाना अर्थातच ही निरीक्षणे तशीच्या तशी लागू होणार नाहीत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत माणसे बाजारातून अनेक चीजवस्तू खरेदी करतच होती. जरी त्यांचे वैविध्य आता एवढे नव्हते तरी.
त्यासाठी बाजारात जाण्यापूर्वी याद्या बनवल्या जायच्या. कोणते जिन्नस किती आणायचे याचे प्लॅनिंग केले जायचे. काय संपत आले आहे हे बघून अनेक घरात त्यासाठी वेगळ्या चोपड्या ठेवलेल्या असायच्या. पैसे बेताचे असल्यामुळे कोणत्या खर्चाला प्राधान्य द्यायचे हे ठरवावे लागे.
गिग/ डिलिव्हरी इकॉनोमी मुळे आता प्लॅनिंगची गरज सरत चालली आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा मागवता येते. या कुटुंबाच्या हातात पैसे असतात. कमी पडले तर क्रेडिट कार्ड असतेच. खरेदी, खर्चाचे, पैशाचे प्लॅनिंग बाद होत चालले आहे. आले मनात, केले अशी मानसिकता बनत आहे.
अनेक कुटुंबाचे वाणी, भाजीवाले, फळवाले ठरलेले होते. त्यांची नावे, गावे माहीत असायची. विचारपूस व्हायची. कोणी अनेक दिवस दिसले नाही तर आजारी होता / होती, गावाला गेलो होतो हे शेयर केले जायचे. त्यातून एक प्रकारचे कम्युनिटी बंध तयार व्हायला मदत व्हायची. आता सारे चेहराहीन होत चालले आहे.
विक्री करणाऱ्या कंपन्या, वस्तूंचे ब्रँड, रेस्टॉरंटची नावे माहीत असतात. पण ती माणसांची नावे नसतात. अनेकवेळा डिलीव्हरी करणारे वस्तुमाल दारात किंवा वॉचमन कडे ठेवून किंवा बेल मारून हातात देऊन जातात. साधी चौकशी करणे, पाणी विचारणे देखील होत नाही.
काही वर्षांपूर्वीपर्यंत कुटुंबे घरात विविध पदार्थ करून खात होती. नातेवाईक /मित्र सणवार वा तत्सम निमित्ताने एकत्र जमले की स्त्रिया विविध पदार्थ घरात करतच होत्या. आता देखील माणसे एकत्र जमतात पण बरेचसे खाद्यपदार्थ बाहेरून मागवले जातात. कोण काय पदार्थ करणार हे नाही तर कोठून आणि काय मागवायचे यावर चर्चा होतात. आता अनेक घरात, विशेषतः तरुण मुले मुली, आईने केलेले जेवण आवडीचे नाही म्हणून जेवणाच्या वेळी, दहा मिनिटात येऊ शकणारे, आपल्या आवडीचे पदार्थ मागवून जेवतात. यामुळे आधीच व्यक्तिकेंद्रित झालेला समाज अजून ॲटोमाईज्ड होण्याच्या प्रक्रियेस गती मिळत आहे. याचे दूरगामी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिणाम होणार आहेत. एक दोन पिढ्या, काही वर्षे जावी लागतील हे फक्त गिग डिलिव्हरी इकॉनोमी पुरते मर्यादित नाही. ना सर्व बदल निगेटिव्ह आहेत.
यूपीआय मुळे पेमेंट प्रणालीत, ओ टी टी प्लॅटफॉर्म मुळे कुटुंबाच्या करमणुकीच्या प्रणालीत, टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ मुळे माणसाना भेटण्याची गरज कमी होणे, डेटिंग ऍप मुळे तरुण मुलामुलींच्या लग्न ठरवण्याच्या प्रणालीत अशी मोठी यादी काढता येईल. हे सगळे बदल निरागस नाहीत. यातून आधीच असलेली आर्थिक आणि संध्या (opportunities) विषमता अजून धारदार बनणार आहे.
संजीव चांदोरकर