- 23
- 1 minute read
शब्दांना वेग देणारा विचारवंत : सर आयझॅक पिटमॅन
शब्दांना वेग देणारा विचारवंत : सर आयझॅक पिटमॅन
आजच्या वेगवान डिजिटल युगात ‘टायपिंग’, ‘रेकॉर्डिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या शब्दांचा उच्चार सहज होतो. मात्र या आधुनिक साधनांच्या कितीतरी आधी, मानवी विचारांना वेग देणारे, शब्दांना शिस्तबद्ध रूप देणारे आणि कार्यालयीन व्यवस्थेला नवे आयाम देणारे एक महान संशोधक होऊन गेले, ते लघुलिपीचे जनक सर आयझॅक पिटमॅन. त्यांचा जन्मदिन म्हणजे केवळ एका संशोधकाची आठवण नव्हे, तर ज्ञान, कष्ट आणि संधी यांच्या ऐतिहासिक संगमाचे स्मरण होय. इंग्लंडमधील ट्रॉब्रिज, विल्टशायर येथे जन्मलेल्या सर आयझॅक पिटमॅन यांनी विकसित केलेली लघुलिपी ही केवळ लेखनपद्धती नव्हती; तर ती एक क्रांती होती. माणसाच्या विचारांच्या गतीला कागदावर उतरविण्याचे सामर्थ्य त्यांच्या लघुलिपीत होते. एखाद्या कार्यालय प्रमुखाच्या, न्यायाधीशाच्या किंवा वक्त्याच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द अचूक, त्वरित आणि शिस्तबद्ध पद्धतीने नोंदवता येणे, ही त्या काळातील अभूतपूर्व बाब होती.
कार्यालयीन कामकाज म्हणजे आज ज्या गतीने ई-मेल, नोट्स, मिनिट्स तयार होतात, त्याची बीजे पिटमॅन यांच्या लघुलिपीतच दडलेली होती. निर्णय प्रक्रिया, प्रशासकीय नोंदी, न्यायालयीन कामकाज आणि पत्रकारिता, या सर्व क्षेत्रांना लघुलिपीने नवे बळ दिले. शब्द फक्त ऐकायचे नाहीत, तर ते जपायचे आणि जतन करायचे असतात, ही जाणीव पिटमॅन यांच्या कार्यातून ठळकपणे पुढे आली. संगणक, मोबाईल आणि व्हॉइस-टू-टेक्स्टच्या युगात लघुलिपी हळूहळू मागे पडत असली, तरी अवघ्या पाच–सहा दशकांपूर्वी लघुलेखन आणि टंकलेखन ही लाखो मध्यमवर्गीय युवकांची जीवनरेषा होती. अत्यल्प खर्चात, कमी कालावधीत शिकता येणारे हे कौशल्य अनेकांच्या हाताला काम देणारे ठरले. सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये ‘लघुलेखक’ ही पदे केवळ नोकरी नव्हती, तर सामाजिक प्रतिष्ठा आणि स्थैर्याची हमी होती. या लघुलिपीच्या बळावर अनेकांनी नोकरी करत शिक्षण पूर्ण केले, पुढे अधिकारी झाले, काहींनी प्रशासनात उच्च पदे भूषवली, तर काहींनी पत्रकारिता व न्यायव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावली. ही सारी यशोगाथा म्हणजे सर आयझॅक पिटमॅन यांच्या संशोधनाची जिवंत साक्ष आहे.
1986 पर्यंत त्यांच्या लघुलिपीवरील पुस्तकांच्या दहा लाखांहून अधिक प्रती विकल्या जाणे, ही केवळ व्यावसायिक यशाची आकडेवारी नव्हे, तर त्यांच्या कार्याची जागतिक स्वीकारार्हता दर्शविणारी बाब आहे. शिक्षणशास्त्राच्या क्षेत्रात ते एक नावाजलेले संशोधक, प्रभावी शिक्षक आणि दूरदृष्टीचे प्रकाशक म्हणून ओळखले गेले. आज प्रश्न असा आहे की, आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या झगमगाटात मूलभूत कौशल्यांचे महत्त्व विसरत तर नाही ना? लघुलिपी आज मागे पडत असली, तरी शिस्त, अचूकता, एकाग्रता आणि श्रवणशक्ती ही मूल्ये तितकीच महत्त्वाची आहेत. पिटमॅन यांची लघुलिपी आपल्याला केवळ वेगवान लेखन शिकवत नाही, तर विचार ऐकण्याची, समजून घेण्याची आणि जतन करण्याची संस्कृती शिकवते.
सर आयझॅक पिटमॅन यांचा जन्मदिन हा केवळ एका संशोधकाचा गौरव नाही, तर ज्ञानाच्या साधेपणातून संधी निर्माण होऊ शकतात, याचा आत्मविश्वास देणारा दिवस आहे. शब्दांना वेग देणाऱ्या या विचारवंताचे योगदान काळाच्या ओघात बदलले, तरी त्यामागील तत्त्वज्ञान आजही तितकेच जिवंत आणि प्रेरणादायी आहे. शब्दांना वेग, विचारांना शिस्त, संधींना दिशा देणाऱ्या आणि शब्द जतन करण्याची संस्कृती घडवणाऱ्या लघुलिपीचे जनक सर आयझॅक पिटमॅन यांना पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञ स्मरण..
प्रविण बागडे