पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अनुसुचीत जातींसाठी राखीव असलेला सुमारे ३९३ कोटींचा निधी वर्गीकरण करणे अन्यायकारक असल्याने हि कृती सरकारने करु नये अशी भुमिका रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक न्याय विभागाने काल २० जानेवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार या विभागाने समारे ३९३.२५ कोटी ( तीनशे त्र्यान्नव कोटी पंचवीस लाख ) इतका मोठा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. अनुसूचित जातींसाठीचा निधी अशा प्रकारे खर्च करता येत नसल्याने शासनाची ही कृती बेकायदेशीर असल्याचे मत डंबाळे यांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोग यांचेकडे तक्रार केलेली आहे. एकीकडे शिष्यवृत्ती, घरकूल , शिक्षण यांसह अनुसूचित जातींसाठींच्या योजनांना सरकार कात्री लावत असताना अशा प्रकारे पैशाची पळवा पळवू अन्यायकारक असल्याचे डंबाळे यांनी सांगितले,