- 8
- 1 minute read
बुवाबाजी : आंबेडकरी विवेकाचा पराभव की सामाजिक आत्महत्या?
बुवाबाजी : आंबेडकरी विवेकाचा पराभव की सामाजिक आत्महत्या?
भारतीय समाजाच्या इतिहासात अंधश्रद्धा ही केवळ धार्मिक समस्या राहिलेली नाही; ती सत्ता, अर्थकारण आणि मानसिक गुलामी यांचे सर्वात प्रभावी साधन बनली आहे. विज्ञान, शिक्षण आणि लोकशाही यांच्या युगातही बुवाबाजी टिकून आहे, याचा अर्थ समाजाने आधुनिकतेचा स्वीकार केला असला तरी विवेकाचा स्वीकार केलेला नाही. विदर्भातील विक्तूबाबा ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही; ती संपूर्ण समाजाच्या वैचारिक अपयशाची आरसेदर्शी कहाणी आहे. विदर्भातील मोठ्या बाबांपैकी एक म्हणजे विक्तूबाबा. नागपूर जिल्ह्यात त्याचे भव्य देवस्थान उभे आहे. आज हे देवस्थान कोट्यधीश बनले आहे. पण या देवस्थानामागील वास्तव वेगळे आहे. वास्तविक पाहता विक्तूबाबा हा मानसिकदृष्ट्या अपंग मुलगा होता. वयात आल्यानंतर स्त्रिया दिसल्या की चावायला धावायचा; म्हणून त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या हातापायात बेड्या घातल्या. हाच पुढे “बेडीवाले-विक्तूबाबा” म्हणून प्रसिद्ध झाला. दलित समाजामध्ये या बाबाला फार मानाचे स्थान मिळाले आणि प्रचंड जनसमुदाय त्याच्यावर श्रद्धा ठेवू लागला. एका मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तीला देवत्व देणे, त्याच्या विकृतीला चमत्काराचे रूप देणे आणि त्याच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे देवस्थान उभे राहणे हे श्रद्धेचे नव्हे, तर विवेकाच्या पराभवाचे लक्षण आहे. समाजाने जेव्हा प्रश्न विचारणे थांबवले, तेव्हा बुवाबाजी जन्माला येते. बुवाबाजी ही अंधश्रद्धेची आधुनिक आवृत्ती आहे. ती देवाच्या नावाने नव्हे, तर माणसाच्या नावाने चालते म्हणूनच ती अधिक धोकादायक आहे. बुद्धांचा विचार याच बुवाबाजीच्या मुळावर घाव घालणारा आहे.
बालपणी मी स्वतः विक्तूबाबाला पाहिले आहे. सतत घाणेरड्या शिव्या देणारा, हातापायात बेड्या असणारा हा बाबा; ज्याच्या भोवती भक्तांचा गराडा असायचा. त्याच्या प्रत्येक पागल हावभावाचा भक्त आपापल्या परीने अर्थ काढायचे. मोठ्या प्रमाणावर पेढे, नारळ, पैसे बाबाला वाहिले जायचे आणि त्याच वस्तू पुन्हा दुकानांत विक्रीला ठेवण्यात यायच्या. टी.बी., महारोग आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे रुग्णही विक्तूबाबाकडे येताना मी पाहिले. त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधल्यावर “बाबाच्या कृपेने रोग बरे होतात” हा केवळ विश्वास नव्हे, तर अनुभव असल्याचा दावा ऐकून मी स्तब्ध झालो. कारण विक्तूबाबांची आई महारोगाची रुग्ण होती आणि ती बाबा आमटेंच्या दवाखान्यात दीर्घकाळ उपचार घेत होती. विक्तूबाबाच्या घाणेरड्या शिव्यांतूनही “चांगला अर्थ” काढण्याचा भक्तांचा अट्टाहास विलक्षण होता. काही भक्त तर मुद्दाम बाबाला त्रास देत, जेणेकरून त्याने शिव्या द्याव्यात. त्या शिव्या मोजून काही लोक सट्टा-जुगार लावत असत. हा प्रकार केवळ हास्यास्पद नव्हे, तर समाजाच्या मानसिक अधःपतनाचे प्रतीक होता. आजही काही लोक लग्नाची पत्रिका समाजात वाटण्यापूर्वी विक्तूबाबाच्या चरणी ठेवतात. हा केवळ श्रद्धेचा प्रश्न नाही; तो मानसिक गुलामीचा पुरावा आहे. जीवनातील प्रत्येक निर्णय स्वतःच्या बुद्धीने घेण्याऐवजी बाबाच्या आशीर्वादावर अवलंबून राहणे म्हणजे विवेकाचा त्याग होय.
बुद्धाने सांगितले “अत्त-दीप-भव”, म्हणजे स्वतःचा दिवा व्हा. पण आजचा समाज म्हणतो, “बाबाचा दिवा व्हा.” हा फरक केवळ शब्दांचा नाही; तो मानसिकतेचा आहे. बुद्धधम्माचा अर्थ देव बदलणे नव्हे, तर विचार बदलणे आहे. जो समाज बुद्धाचा धर्म स्वीकारूनही चमत्कार शोधतो, तो बुद्धाचा नाही, तर बुवांचा अनुयायी ठरतो. म्हणूनच बुवाबाजी ही केवळ धार्मिक समस्या नाही; ती बुद्धविचाराच्या पराभवाची चिन्हे आहेत. जर बुद्धाचा विचार खरोखर स्वीकारायचा असेल, तर बुवाबाजीला केवळ विरोध करणे पुरेसे नाही; तिच्या मुळावरच घाव घालावा लागेल. कारण बुद्धाचा मार्ग स्पष्ट आहे, श्रद्धेपासून विवेकाकडे, देवापासून मानवाकडे आणि चमत्कारापासून विज्ञानाकडे. बुद्धाने देव, चमत्कार आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिले. “कोणत्याही गोष्टीवर केवळ परंपरेमुळे, धर्मामुळे किंवा कोणाच्या सांगण्यामुळे विश्वास ठेवू नका; स्वतःच्या बुद्धीने तपासून पाहा” हा बुद्धाचा मूलमंत्र होता. त्यामुळे बुद्धधम्म हा पूजा, कर्मकांड किंवा बाबागिरीचा धर्म नाही, तर विवेक, अनुभव आणि तर्काचा धर्म आहे. बुद्धाने सांगितले की दुःखाचे कारण बाहेर नाही; ते आपल्या आत आहे. त्यामुळे दुःखावर उपाय शोधताना देव, बाबा किंवा चमत्कार शोधण्याची गरज नाही; गरज आहे ती स्वतःच्या बुद्धीची. विडंबन असे की बुद्धधम्म स्वीकारलेल्या समाजातच बुवाबाजी फोफावली आहे. बुद्धाच्या नावाने धर्म स्वीकारणारा समाज बाबांच्या चरणी नतमस्तक होतो ही केवळ विसंगती नाही; ती बुद्धविचाराची विटंबना आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला केवळ अधिकार दिले नाहीत; त्यांनी त्याला विचार करण्याची शक्ती दिली. बाबासाहेबांचा धर्म हा देवाचा नव्हे, तर माणसाचा धर्म होता. बुद्धधम्म स्वीकारताना त्यांनी स्पष्ट सांगितले, “श्रद्धा नव्हे, बुद्धी.” त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि देववाद यांना स्पष्ट नकार दिला. पण आज प्रश्न उभा राहतो—आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत की त्यांच्या नावावर जगणारे भक्त? हजारो घरांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि विक्तूबाबांचे फोटो शेजारी लावलेले दिसतात. हा केवळ प्रतीकात्मक विरोधाभास नाही; तो वैचारिक शून्याचा पुरावा आहे. दीक्षाभूमी ही केवळ भूभाग नाही; ती विवेकाची क्रांती आहे. ज्या भूमीवर बाबासाहेबांनी लाखो लोकांना अंधश्रद्धेपासून मुक्त केले, त्याच भूमीवर विक्तूबाबाचा सत्कार होणे म्हणजे बुद्धिवादाची सार्वजनिक हत्या आहे. याविरोधात मोजकेच बुद्धिवादी आवाज उठले; बहुसंख्य आंबेडकरी नेते मात्र गप्प राहिले. का? कारण भक्तांचा रोष, मतांचा तोटा आणि राजकीय नुकसान. इथे प्रश्न उभा राहतो राजकारणासाठी विवेकाचा बळी देणे ही आंबेडकरी चळवळ आहे का? जर हो, तर बाबासाहेबांचा विचार केवळ निवडणूक घोषणापत्रापुरता मर्यादित राहिला आहे, हे स्वीकारावे लागेल.
विक्तूबाबाचे देवस्थान आज कोट्यधीश आहे. हजारो भक्त दरवर्षी दर्शनाला येतात. नारळ, पेढे, पैसे, वस्त्र, दान या सगळ्यांतून एक प्रचंड अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. बुवाबाजी ही आज केवळ धार्मिक नव्हे, तर आर्थिक उद्योग बनली आहे. प्रश्न असा आहे हा पैसा कुठून येतो? तो येतो गरीब, असुरक्षित आणि असहाय लोकांकडून. जेव्हा राज्य त्यांना आरोग्य, शिक्षण आणि रोजगार देण्यात अपयशी ठरते, तेव्हा ते बाबांकडे धाव घेतात. म्हणजेच बुवाबाजी ही व्यवस्थेच्या अपयशाची उपज आहे. टी.बी., कॅन्सर, महारोग यांसारख्या रोगांवर बाबाच्या कृपेने उपचार होतात, असा विश्वास म्हणजे विज्ञानाचा अपमान आहे. पण या विश्वासामागे असलेली मानसिकता अधिक धोकादायक आहे, “आपण स्वतः काही करू शकत नाही, कोणीतरी चमत्कार करावा लागेल.” ही मानसिकता म्हणजेच मानसिक गुलामी.
सामान्यतः अंधश्रद्धा ही ग्रामीण समाजाशी जोडली जाते. पण दलित समाजात तिचे अस्तित्व अधिक खोलवर आहे. कारण दलित समाजाने ऐतिहासिकदृष्ट्या सतत अपमान, शोषण आणि अन्याय सहन केला आहे. त्यामुळे त्याच्या मनात असुरक्षितता, भीती आणि आश्रयाची गरज निर्माण झाली आहे. बुवाबाजी ही त्या मानसिकतेचा परिणाम आहे. बाबासाहेबांनी दलित समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. पण सामाजिक चळवळ दुर्बल झाल्यामुळे ती गुलामी नव्या रूपात परत आली, बुवाबाजीच्या रूपात. आज आंबेडकरी चळवळ राजकीयदृष्ट्या सक्रिय आहे. निवडणुका, मोर्चे, सभा, घोषणा सगळे सुरू आहे. पण सामाजिक चळवळ मात्र निष्प्रभ झाली आहे. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर सामाजिक परिवर्तनाची मशाल कोणीच उचलली नाही. परिणामी, बाबासाहेबांचा फोटो सर्वत्र दिसतो; पण त्यांचा विचार समाजात दिसत नाही. आंबेडकरी चळवळ जर खरोखरच बाबासाहेबांची वारसदार असती, तर बुवाबाजीविरोधात ती सर्वात पुढे उभी राहिली असती. पण वास्तव उलट आहे. बुवाबाजीवर टीका केली की “भावना दुखावतात” असा युक्तिवाद केला जातो. प्रश्न असा आहे, भावना जपायच्या की विवेक?
बुद्धाने सांगितले “काहीही अंधश्रद्धेने स्वीकारू नका.” बाबासाहेबांनी त्याच विचाराला आधुनिक संदर्भ दिला. पण आज बुद्धधम्म स्वीकारलेल्या समाजातच अंगात येणारे बुद्ध, अंगात येणारे बाबासाहेब दिसतात. हा विरोधाभास केवळ हास्यास्पद नाही; तो धोकादायक आहे. कारण जेव्हा विचाराऐवजी चमत्कार महत्त्वाचा ठरतो, तेव्हा समाज पुन्हा मध्ययुगात परत जातो. प्रश्न विक्तूबाबाचा नाही; प्रश्न आपला आहे. विक्तूबाबा ही समस्या नाही; समस्या म्हणजे त्याला देवत्व देणारा समाज. विक्तूबाबा उद्या नाहीसा झाला, तरी उद्या दुसरा बाबा तयार होईल. कारण समाजाची मानसिकता बदललेली नाही. जो समाज बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करतो, तोच समाज बुवांच्या चरणी नतमस्तक होतो, हा विरोधाभास केवळ वैचारिक नाही, तर नैतिकही आहे. आज समाजासमोर प्रश्न स्पष्ट आहे, आपण बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहणार की बुवांच्या? बाबासाहेब म्हणजे प्रश्न विचारण्याची परंपरा. बुवा म्हणजे प्रश्न न विचारण्याची गुलामी. बाबासाहेब म्हणजे विज्ञान, तर्क आणि मानवतावाद, बुवा म्हणजे चमत्कार, अंधश्रद्धा आणि भीती. दोन्ही एकत्र चालू शकत नाहीत.
आता वेळ आली आहे की आंबेडकरी समाजाने आत्मपरीक्षण करावे. बाबासाहेबांचे फोटो घरात लावणे पुरेसे नाही; त्यांचा विचार जीवनात उतरवावा लागेल. जर तुमच्या घरात बुवाचा फोटो आहे, तर बाबासाहेबांचा फोटो केवळ सजावटीचा आहे, हे स्वीकारावे लागेल. जर तुम्ही बुवांच्या चरणी नतमस्तक होता, तर बाबासाहेबांच्या विचारांशी तुम्ही द्रोह करत आहात, हे मान्य करावे लागेल. आज गरज आहे ती निर्भीड वैचारिक क्रांतीची. बुवाबाजी विरोधात उभे राहणे म्हणजे धर्मविरोध नाही; ते मानवतावादाचे समर्थन आहे. अंधश्रद्धेविरोधात बोलणे म्हणजे समाजविरोध नाही; ते समाजाच्या मुक्तीसाठीचे युद्ध आहे. जर आंबेडकरी समाजाने आता प्रश्न विचारले नाहीत, तर भविष्यात बाबासाहेबांचा विचार केवळ पुस्तकांमध्ये उरेल आणि बुवाबाजी समाजावर राज्य करेल. म्हणूनच आजच निर्णय घ्या, देव नव्हे, विचार स्वीकारा! चमत्कार नव्हे, विज्ञान स्वीकारा! बुवा नव्हे, बाबासाहेब स्वीकारा! कारण विवेक हीच खरी क्रांती आहे आणि विवेकाशिवाय कोणतीही मुक्ती शक्य नाही !
प्रविण बागडे