मराठी भाषेचा सन्मान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा, संविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा सन्मान करणे
मराठी भाषा पंधरवडा संवर्धन दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालय, धुळे येथे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता एक विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश स्वर्णिता बी. महाले, प्रमुख पाहुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राहुल बी. पाटील तर प्रमुख वक्ते जगदीश देवपूरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती दिपाली मानकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर श्रीमती माधुरी भदाणे यांनी मराठी भाषेचे महत्त्व व पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट करत प्रस्तावना मांडली. यावेळी धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राहुल बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करत न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी वकील व न्यायिक अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.“मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून न्यायालयीन क्षेत्रात तिचा प्रभावी वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्य नागरिक न्यायालयात येतो तेव्हा त्याला न्याय प्रक्रियेतील भाषा समजली पाहिजे. मराठी भाषेचा वापर केल्यास न्याय अधिक सुलभ, पारदर्शक व लोकाभिमुख होतो.
मराठी भाषा पंधरवडा हा केवळ औपचारिक उपक्रम न राहता, तो आपल्या दैनंदिन न्यायालयीन कामकाजाचा भाग व्हावा, यासाठी धुळे बार असोसिएशन सदैव कटिबद्ध राहील.” कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जगदीश देवपुरकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्कृती, इतिहास व अस्मितेची ओळख असल्याचे सांगितले. न्यायदान प्रक्रियेत मातृभाषेचा वापर केल्यास न्याय अधिक लोकाभिमुख होतो, असे त्यांनी नमूद केले.“मराठी भाषा ही ज्ञानाची, संस्कृतीची व न्यायाची भाषा आहे. न्यायालय हे लोकांच्या जीवनाशी थेट जोडलेले संस्थान असल्याने येथे वापरली जाणारी भाषा जनतेच्या हृदयाशी संवाद साधणारी असावी. मातृभाषेतून दिलेला न्याय अधिक परिणामकारक ठरतो. मराठी भाषेचा सन्मान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा, संविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा सन्मान करणे होय. प्रत्येक वकील, न्यायाधीश व कर्मचारी यांनी मराठी भाषेचा अभिमानाने वापर करावा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मा. स्वर्णिता बी. महाले, या होत्या. त्यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगून न्यायालयीन व्यवहारात मराठीचा वापर वाढविण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती दिपाली मानकर यांनी केले. सदर कार्यक्रमास वकील संघाचे सचिव उमेशकांत पाटील, पदाधिकारी व सदस्य तसेच कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक डी व्ही गोंधळी,सहा.अधीक्षक के. पी. मिटसागर,लघुलेखक हिरामण रामोळ, वरिष्ठ लिपिक व्ही. एम. सैंदाणे,कनिष्ठ लिपिक महेंद्र सुयवंशी, राकेश मोरे, माधुरी भदाणे, राहील शेख, शिपाई एजाज शेख, भूषण दुसाने, तुषार गुरव, पक्षकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.