• 13
  • 1 minute read

वेडात बौद्ध वीर दौडले सात

वेडात बौद्ध वीर दौडले सात

वेडात बौद्ध वीर दौडले सात

            जानेवारी 2006 सुरुवातीचे ते दिवस होते. बौद्ध समाजाला आज देखील ते आठवत असणार आहे.कारण नवाकाळ दैनिकांमधून बाहेर पडलेले दिवंगत बबन कांबळे यांनी समाजातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सम्राट दैनिकाची सुरुवात केली.
     त्या अगोदर नागपूर वरून ‘जयभीम’ साप्ताहिक प्रकाशित होत होते. त्याचा महाराष्ट्रभर प्रसार झाला होता. इतर सुद्धा छोटी मोठी मासिके, अनियमितकालिक पत्रिका आणि संपूर्ण बौद्ध समाजात प्रामुख्याने प्रसिद्ध पावलेले ,औरंगाबाद वरून प्रकाशित होणारे म.ना.वानखेडे यांनी सुरू केलेले त्रेमासिक,’ अस्मिता’ त्याचे पुढे प्राध्यापक गंगाधर पानतावणे यांनी ‘ अस्मितादर्श ‘ असे रूपांतर केले. पुण्यावरून प्रकाशित होणारे सुगावा, एक दोन अंकानंतर बंद झालेले, बाबूराव बागुल यांचे ‘ आम्ही’ असे छोटे मोठे प्रयत्न आपण सर्वांनी पाहिलेले आणि सम्राटने सरळ सरळ दैनिकाची सुरुवात केलेली. हा प्रकार बौद्ध समाजातील सर्वांना
चक्रावून टाकणारा होता.
     अगदी थोड्या दिवसातच सम्राट दैनिकाचा तमाम बौद्ध समाजात मोठा बोलबाला झाला होता. प्रत्येक दिवसाच्या सकाळी सम्राट पेपर मध्ये हेडलाईन काय असणार म्हणून वाचकांना उत्सुकता असे. त्यादिवशी 
‘ कान्हेरी येथील बुद्ध लेण्यात हिंदूंना पूजा करण्यापासून बौद्ध तरुणांनी रोखले ‘ हि सम्राट मधील हेडलाईन वाचून, प्रत्येक बौद्ध माणूस रोमांचित होऊन, एक दुसऱ्याला तो पेपर पुढे करीत होता.
    विधवा बौद्ध तरुणीवर बलत्कार, बौद्ध समाजावर गावाचा बहिष्कार, एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षात असलेल्या बौद्ध तरुणाची आत्महत्या अशा रोजच्या हेडलाईन वाचून, सुन्न होणारा बौद्ध समाज त्यादिवशी उत्साहाने रोमांचित झाला होता.
    महाशिवरात्री दिनानिमित्ताने दरवर्षाप्रमाणे कान्हेरी लेण्यातील अखंड खडकामध्ये कोरलेला बुद्धस्तूप हा शिवलिंग आहे. अशा समजापोटी हिंदू भाविक फार मोठ्या संख्येने, तिथे नारळ आणि इतर पूजा-पाट साहित्य अर्पण करून पूजा करून, लेण्याचे विद्रूपीकरण करीत आले आहेत.
   त्यादिवशी हिंदू भाविक पोहोचण्या अगोदरच बौद्ध तरुणांनी लेण्याच्या प्रवेश जागेवर साखळी तयार करून, ही बुद्ध लेणी आहे. तुम्हाला इथे पूजा करता येणार नाही. असे बजावत हिंदू भाविकांना रोखणे सुरू केले. जथ्या,जथ्याने
जमाव, येणाऱ्या हिंदू भाविकांची गर्दी साचत होती. जसजशी गर्दी वाढत गेली. तसा हिंदू भाविकांचा लेण्यात प्रवेश करण्यासाठी रेटा वाढू लागला. हे चित्र पाहून अचानक तिथे एक बौद्ध भिक्षू तरुणांच्या बाजूने येऊन मिळाला. त्यामुळे हिंदू जमाव फारच चेकाळला. तो गोंगाट ऐकून बंदोबस्तावर असलेले दोन पोलीस त्या ठिकाणी हजर झाले.
 बौद्ध तरुणांनी त्या दोन्ही पोलीस हवालदारांना समजावून सांगितले. ही बुद्ध लेणी आहे. तसा नोटीस बोर्ड लेण्याच्या सुरुवातीलाच लावलेला आहे. तरी ह्या जमावाला तुम्ही तशी समज द्यावी आणि त्यांना पूजा करण्यापासून रोखावे. तसे न झाल्यास पुढील सर्व जबाबदारी तुमची असेल. तरी तुम्ही ताबडतोब या लेणीच्या समोर पडदा लावण्याची व्यवस्था करा. त्या दोघा पोलीस हवालदारांनी आणखी पोलिसांची कुमक मागविली. आणि लेणीच्या प्रवेशद्वारावर भला मोठा पडदा लावण्याची व्यवस्था केली. हिंदू भाविकांना त्यांच्या समजाप्रमाणे शिवलिंगाची पूजा न करताच माघार घ्यावी लागली.
 ह्या मिशनची कामगिरी बजावण्यात संजय वाघमारे, हनमंते, कांबळे, जाधव, पवार. वाघमारे आणि गायकवाड या बौद्ध तरुणांचा पुढाकार होता.
   बातमीतील तो संपूर्ण वृत्तांत वाचून, इतरांच्या प्रमाणे मी सुद्धा फारच रोमांचित झालो होतो.
वेळ मिळेल त्या दिवशी, अगदी सकाळीच म्हणजे 9 पर्यंत मी आंबेडकर भवन दादर येथे पोहोचत असे. मी आलेले बघताच, बबनराव बोलणार चला आले आपले मोठे साहेब. असे म्हणत त्यांच्याजवळ बसलेले वेणेगावकर हे दोघे ठाण्याला एकमेकांच्या शेजारी राहत होते. असे आम्ही तिघे मिळून कोपऱ्यावरच्या साधना हॉटेलमध्ये जात असू. खाण्याचे जिन्नस येईपर्यंत, त्या दिवसाचा सम्राट मी डोळा पुढे धरीत असे. त्या दिवसाची हेडलाईन ‘ वेडात बौद्ध वीर दौडले सात ‘ ही हेडलाईन आणि रोमांचित होऊन मी घाई घाईने बातमीतला मजकूर वाचून काढला. त्या तिघा तरुणांच्या धाडसाविषयी आणि त्यांनी बजावलेल्या अफलातून कामगिरी विषयी आमचे बरेच उलट सुलट बोलणे झाले.  
     लोकलमध्ये गर्दी नाही. अशा निवांत वेळेत घरी परत येत असताना मी पुन्हा ती बातमी वाचली आणि त्या तरुणांच्या नावामध्ये संजय वाघमारे हे पहिल्या क्रमांकाचे माझ्या मुलाचे नाव वाचून, माझ्या मनात धस्स झाले. कारण जर तो जमाव हिंसक आक्रमक झाला असता तर… ह्या विचारानेच बसल्या जागेवर मी बधिर झालो होतो.
     बौद्ध समाजा संबंधाने अशा घटना नेहमीच घडतात. जिथे खुलेआम आमच्या तरुणांचे मुद्दे पाडले जातात. नामांतराच्या आंदोलनात पोचिराम कांबळे, चंदर कांबळे या पिता पुत्रांचे जमावाने जाहीरपणे मुडदे पाडण्यात आले. मारेकऱ्यांचा शोध कधीच घेतला नाही आणि लागला नाही. जणू काही जमावाने आमचे मुडदे पाडण्याचा परवाना दिल्यासारखे आहे.
      त्या प्रसंगात या कार्यकर्त्यांच्या साठी वेळ अनुकूल होती असे म्हणावे लागेल. कारण ऐनवेळी ते बौद्ध भिक्षुक यांना येऊन मिळाले. तिथे हजर असणाऱ्या दोघा पोलिसांनी अधिक कुमक बोलावली, प्रवेशद्वारावर पडदा लावला. आणि जमावाचे मन परिवर्तन करण्याची भूमिका बजावली.
     कार्ला लेणीच्या प्रवेशद्वारावरच एकविरा देवीच मंदिर बांधलं, त्याचं बांधकाम अगदी अलीकडे आणि लेण्याला तुटक असल्याचे स्पष्ट दिसून येते. लेण्याद्री लेणीच्या मुख्य शिल्पाला शेंदूर फासुन दैवीकरण करून, बुद्ध शिल्पाच जे विद्रूपीकरण करण्यात आलेल आहे. ते चित्र डोळ्यापुढे उभे येताच मन विषन्नतेने भरून येते.
अशाप्रकारे बौद्ध लेण्यांचे हिंदू दैविकरण करण्यापासून कान्हेरी ची लेणी आजपर्यंत बचावलेली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तिथे देखील हिंदूकरणं चाललेल् असताना, ह्या तरुणांचं धाडसाचं कृत्य फारच मोलाच म्हणाव लागेल. आणि त्या पुढच्या घडामोडी लक्षात घेतल्यास, या तरुणांनी किती मोठा कट उधळून लावला. ही हकीगत म्हणजे, एखाद्या रहस्यमय सिनेमा सारखी आहे.
       लेण्याच्या पूर्व दिशेच्या टोकाला, वरून खाली पाहिले म्हणजे, एका छोट्याशा देवळा पुढे भगवा झेंडा फडकत असलेल दृश्य दिसत असे. वास्तविक दर्शनी भागावर ते भगवं निशान आणि वाकून जावं लागेल इतका छोटासा दरवाजा,मात्र आतील भागात सर्व सुख सोयीयुक्त, सुसज्ज दिवाणखाना होता. ते ठिकाण म्हणजे हिंदू दहशतवाद्यांचा अड्डाच होता. ही इथमभूत माहिती, आपल्या ह्या तरुणांनी वन भटकंतीच्या बाहण्याने अगोदरच मिळविली होती.          
      मिशन महाशिवरात्री यशस्वी झाल्यामुळे या तरुणांना फार कॉन्फिडन्स आला होता. हे देऊळ अनाधिकृतपणे उभे झाले. हे तुम्हाला दिसले नाही का, की तुमचा त्याला पाठिंबा होता? महाराष्ट्र इलेक्ट्रिक सिटी बोर्डाने, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कनेक्शन कसं दिलं? महानगरपालिकेच्या पाणी खात्याने, पाण्याची लाईन कशी दिली? या सगळ्या घडामोडी संबंधित पोलीस खात्याच्या लक्षात कशा आल्या नाहीत? अशा आशयाचे लेखी पत्र, त्या त्या संबंधित कार्यालयाला देण्यात आले. आणि त्यासाठी माझे लेटर पॅड वापरण्यात आले. त्यावेळेला मी रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे पक्षाचा मष्ट्र प्रदेशाध्यक्ष होतो. संघटक म्हणून माझ्या मुलाने सही करून बिंदासपणे ते लेटर दिलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की, पंधरा दिवसांमध्ये तिथे असलेले देऊळ आणि त्या अडून तिथे असलेला हिंदू अतिरेक्यांचा अड्डासुद्धा जमीन दोस्त झाला. कारण हे प्रकरण जर वाढले. तर आपल्या नोकऱ्यांवर सुद्धा बला
येऊ शकते. म्हणून त्या त्या कार्यालयाच्या, अधिकारी कर्मचाऱ्यांनी, आपला बचाव करण्याची भूमिका बजावली होती. ते देऊळ, होत्याचे नव्हते झाले होते.
      हे एवढे मोठे प्रक्षोभक प्रकरण ह्या तरुणांनी फार अक्कल हुशारीने हाताळल्यामुळे, कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशन बोरीवली पूर्वच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या सर्वांना फार फार धन्यवाद दिले. त्यावेळेला तोच धागा पकडून, महाशिवरात्रीला कान्हेरी लेण्याला भेट देणाऱ्यांना, तिथे कोणीही हिंदू पद्धतीचा पूजा – पाठ करू नये. अशी अनाउन्समेंट करणे आणि सूचना फलक लावणे. ह्या त्या तरुणांच्या दोन्ही मागण्या पोलीस अधिकाऱ्यांनी मान्य केल्या. आणि त्याची अंमल बजावणी सुद्धा सुरू केली. हे त्या तरुणांच्या मिशनचे मोठे यश म्हणावे लागेल. आणि आपले प्रश्न कसे सोडवायचे, हा धडा घेण्यासारखे आहे!
” भावना निर्मळ – स्वच्छ असेल आणि उद्दिष्ट योग्य असेल तर त्या कार्यात यश प्राप्ती निश्चितच असते ” हा बोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक अनुयायी बौद्ध माणसाने घेण्यासारखा आहे.
 सयाजी वाघमारे 
 अध्यक्ष भीम बाणा सामाजिक संघटना.
 संपर्क:9892066967
 विलास पवार
 प्रचार प्रमुख 
 संपर्क:8652591972
0Shares

Related post

शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद सर, मैं शिव बचन यादव प्रयागराज का मूल निवासी हूँ। बुलंदशहर में…
वंदे मातरम्’च्या सहा कडव्यांची सक्ती धर्मनिरपेक्षतेला धोकादायक; बामसेफ’ची सर्वोच्च न्यायालयात याचिका

वंदे मातरम्’च्या सहा कडव्यांची सक्ती धर्मनिरपेक्षतेला धोकादायक; बामसेफ’ची सर्वोच्च न्यायालयात याचिका

सहा कडव्यांच्या ‘वंदे मातरम्’ची सक्ती करणारे दोन्ही सरकारी आदेश रद्द करावेत नवी दिल्ली :     …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *