‘२८ जानेवारी २०२४”
“४६ व्या स्मृती दिनानिमित्त’
“चंद्रभागा आटू लागली खंत हिच अंतरी
पुसे नभाला केव्हा आता
येतील श्रावणसरी”
लोकगायाक श्रावण यशवंते यांच्या २८ जानेवारी १९७८ रोजी झालेल्या दुःखद निधनाच्या निमित्ताने कवीश्रेष्ठ वामनदादा कर्डक रचित हे शोक गीत कव्वालीचा बादशहा गोविंदराव म्हशीलकर यांनी चेंबूर येथील श्रावणदादांच्या श्रद्धांजली सभेत गायले होते. त्याच कार्यक्रमात शिघ्रकवी नवनीत खरे यांनी “श्रावणा राखेत शोधतोय आज मी तुझे डोळे” असे गीत सादर केले होते. आजही तो काळ माझ्या डोळ्यासमोर आहे.
खरेतर माझ्या शाळकरी वयातच नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झालेली श्रावणदादांच्या निधनाची बातमी वाचून मी फारच अस्वस्थ झालो होतो. विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले कवीश्रेष्ठ वामनदादा कर्डक आणि लक्ष्मणदादा केदार यांची काव्यप्रतिभा आणि तिला मिळालेली श्रावणदादांच्या सुमधुर स्वरांची साथ याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते.
“चल चल हरणे तुरू तुरु”
“चिमण्या उडतील भुरू भुरु”
“बंधू रं शिपाया, दे रे दे रुपाया”
“ह्या थुई थुई थुई धारा,
हा शिवार भिजवा सारा”
“ह्यो ह्यो पाव्हणा, सखुचा मेवणा”
ही लोकगीते महाराष्ट्रात गाजत होती. याशिवाय…
“अंधाऱ्या वस्तीत भिमानं लावलाय दिवा”
“उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे”
“त्रिसरणाची मंगलवाणी घुमते मंगलधामी”…
अशा अनेक बुद्ध आंबेडकर गीतांनी प्रबोधनाचे चैतन्य सळसळत होते. या गाण्यांना सुमधुर स्वर देणारे गायक अर्थातच श्रावणदादा यशवंते होते. महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीला जनमानसात पोहचवण्याचे ऐतिहासिक कार्य भजनी मंडळे, संगीत जलसे आणि कव्वाल पार्ट्या या माध्यमातून झाले. रा. रा. रेवजीबुआ डोळस यांचे भजनी मंडळ आणि २६ ऑक्टोबर १९३० रोजी ‘नाशिक जिल्हा युवक संघ’ हा संगीत जलसा उभा करणारे आद्य जलसाकार भीमराव कर्डक आणि इतर समकालीन जलसे अशी एक मोठी परंपरा आहे. त्याच मालिकेत पुढे १९४६ साली वयाच्या पंधराव्या वर्षी ‘भिमकमल’ गायन पार्टीची स्थापना श्रावणदादांनी केली. तिचे रूपांतर पुढे ‘राजकमल’ गायन पार्टीत होऊन नंतर पुढे ‘ श्रावण यशवंते आणि पार्टी ‘ असे झाले.
याकाळात गोविंद म्हशीलकर, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, किसन खरात, नवनीत खरे, सामीरा बेगम, शकीला पूनवी, शांता भोसले, सुमन रोहम, रंजना शिंदे अशा अनेक गायक – गायिका जनमानसांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. परंतु हे सर्व कवी – गायक श्रावण यशवंते यांना दादा म्हणूनच आदराने संबोधत असत.
वयाच्या दहाव्या – बाराव्या वर्षापासूनच मुस्लिम समाजातील उर्दू कव्वालींचे कार्यक्रम ऐकण्याची आवड श्रावणदादांना होती. त्यानेच प्रभावित होऊन आंबेडकर जयंतीला स्टेजवर कव्वालीचा बैठा प्रकार सुरू करण्याचा पहिला मान जातो तो श्रावणदादांकडेच, असे महत्त्वाचे विवेचन भिमशाहीर हिरापुत्र भवार यांचे आहे.
या लाडक्या गुणी गायकाला फारच अल्पआयुष्य लाभले. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी श्रावणदादांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या मरणोत्तर लक्ष्मणदादा केदार यांनी व्यथित होऊन लिहिले,
“वामन लक्ष्मणाची लेखणी नाही थांबली अजून
चिरनिद्रेच्या कुशीत श्रावणा कारे घेतलेस निजून”
श्रावणदादा यशवंते यांच्या संघर्षशील स्मृतींना विनम्र अभिवादन करत असतानाच काळाच्या पडद्याआड गेलेल्या या समस्त कवी – गायकांच्या पिढीला मानाचा जय भीम
– सुरेश केदारे