- 740
- 1 minute read
तालवाद्यांचा बादशाह : होमी मुल्लन
एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर आघात केला की ध्वनी निर्माण होतो. जेव्हा हा ध्वनी ऐकायला नादमय वाटू लागला असावा तेव्हा मानवाने ताल वाद्यांची निर्मिती केली असावी. पहिला ताल अर्थातच निसर्गाने निर्मिला असावा. संगीताचे मूळ अशा अनेक नैसर्गिक चमत्कारातुनच निर्माण झाले आहे. यातुनच जगभरातुन हजारो ताल वाद्यांची निर्मिती झाली आणि आजही होत आहे. इंग्रजीत अशा वाद्यानां Percussion Instrument असे म्हटले जाते. जगभरात अशी असंख्य तालवाद्ये आहेत. संगीतात या सर्वच ताल वाद्यानां अत्यंत महत्व आहे.
लोकसंगीत हा सर्व संगीताचा प्राण आणि तालवाद्ये हा लोक संगीताचा प्राण. चित्रपट हे एक अजब प्रकरण आहे. एकाच वेळी व्यवसाय आणि कला याचा तोल सांभाळणारी सर्वात आधुनिक कला. या कलेने कलावंत, तंत्रज्ञ, साहित्य, संगीत, नृत्य सर्व काही सामावून घेतले. चित्रपटात संगीताचे स्थान जसजसे मजबूत होऊ लागले तसतसे अनेक कलावंताना संधी आणि रोजगार उपलब्ध होऊ लागले. या सर्वाच्या मेळातुन मग अनेक विशेषज्ञ ही तयार होत गेले. संगीतकार कुठलाही असो त्याला ज्या चार महत्वाच्या कलावंताची गरज असते ते म्हणजे- वाद्यमेळ संयोजक, तालमेळ संयोजक आणि पार्श्व संगीत संयोजक. पैकी काही संगीतकार स्वत: पार्श्व संगीत तयार करीत असत. चित्रपट संगीताचा एक अनोखा मेळा असतो म्हणजे टीमवर्क. यातील प्रत्येक कडी ही अत्यंत महत्वाची असते. चित्रपट संगीत म्हणजे शब्द, ताल, नाद,लय,भावना यांचा समतोल मिलाप. सर्वांची एकत्रीत सुंदर कामगिरी झाली की गाणे सुरेल होते.
होमी भाभा आम्हाला म्हणजे शिक्षित लोकानां माहित आहेत मात्र “होमी मुल्लन” हे नाव माहित असण्याची शक्यता वाटत नाही. मलाही ते माहित नव्हते. “पर्कशनिस्ट” हा शब्द माझ्यासाठी एकदम नवखा. मला तर आगोदर हा पर्किन्सस् सारखा आजार बिजार असेल असेच वाटायचे . Percussion ही संज्ञा खरे तर फिजीशियन क्षेत्रातील आहे. उदा: आपण जेव्हा हाडतज्ञ किंवा दंततज्ञ डॉक्टरकडे जातो तेव्हा ते एका लहानशा हातोडीने आघात करून दुखणाऱ्या जागेचा नेमका बिंदू ओळखतात. पर्कशन म्हणजे आघात पण हलकासा.“पर्कशनिस्ट” हा शब्द याच पर्कशन पासून आलेला. संगीतात तालवाद्यांचे काम म्हणजे नादमय आघात करणे. अनेकदा कुठल्याही लहानमोठ्या वस्तू पासून असे नाद निर्माण करता येतात. या वस्तू अक्षरश: काहीही असू शकतात.“पर्कशनिस्ट” या कामात निपूण असतात. आपल्या मराठी तमाशाची सुरूवात ढोलकी वादनाने सुरू होते. सोबत एक तुणतुणेवाला असतो तसाच एक त्रिकोणी आकाराची धातूची सळी वाजविणारा कलावंत असतो. हे त्रिकोणी धतूवाद्य म्हणजे पर्कशन वाद्य आणि तो वाजविणारा म्हणजे “पर्कशनिस्ट”. सुरवातीस तुणतुणे आणि ती धातूसळी एक खास लय साधतात ही लय टीपेला पोहचली की ढोलकीची थाप ऐकू येतो व अंगात ताल भिनू लागतो. ते तुणतुणे आणि ती धातूसळी वगळून बघा….. मजा नाही येणार…तर होमी मुल्लन हे भारतातील अग्रगण्य “पर्कशनिस्ट”. होते.
या बंगाली बाबूच्या संगीताचा प्रवास काेलकत्ता पासून सुरू झाला. पंकज मलिक या गायक संगीतकाराने तरूण होमीला पहिल्यांदा बंगाली चित्रपटात “पर्कशनिस्ट” म्हणून संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत राहूल देव बर्मन यांच्याकडे होमी मुल्ल्न सहाय्यक म्हणून रूजू झाले आणि पर्कशनिस्ट” ची जादू खऱ्या अर्थाने उमगू लागली. खरे तर ५०-६० च्या दशकात अनेक संगीतकारांनी पर्कशनचा वापर केलेला मात्र पंचमदानी होमीच्या कलेचा पूरेपूर वापर करत चित्रपट संगीताला वेगळा आयाम दिला.
तबला, ढोलक, घटम, मांदल,डफ, खंजीरी, चिपळ्या,टाळ, घुंगरू, झांज,ढोल, मंजीरी, दिमडी, डमरू, चिमटा, खुळखुळा वग्ेरे भारतीय पारंपांरीक पर्कशन वाद्य आहेत. पूढे डिस्क ब्लॉक, काेको हॅमर, वुडन बेल, कॅस्टानेट, टॅम्बोरीन, कोंगो बोंगो, सॅप, ऑकॉस्टीक ड्रम, झायलोफोन,मरीम्बा, गॉन्ग, वुडब्लॉक वगैरे आधुनिक पर्कशन्स वाद्याची भर पडली. हा सर्व वाद्य चित्रपट संगीतात खरेच वापरले जात का? तर होय. मात्र पूर्वी ही वाद्य संगीतातील रिकाम्या जागा भरून काढत. मात्र पंचम नावाच्या अवलियाने या सारख्या अनेक वाद्यानां मूख्य वाद्य म्हणून वापरले व त्या गाण्यांची गोडी वाढविली. हल्ली तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतके सुंदर हेडफोन्स व स्पीकर्स आले आहेत की या पर्कशन वाद्यांची खुमारी समजून येते.
५० ते ६० च्या दशकातील काही प्रसिद्ध गीते जी तुम्ही नेहमीच एैकली असतील आता परत ऐक्ून बघा. मनोज कूमारच्या शहीद नावाच्या चित्रपटात “जोगी हम तो लूट गए तेरे प्यारमे….”हे गाणे फक्त ढोलक या वाद्या सोबत आहे. यातील ढोलक वजा करून बघा!!! श्री ४२० या चित्रपटातील “दिल की बात सुने दिलवाला….” किंवा मेरा नाम राजू, घराना अनाम…हे डफ आणि घुगंरूवरील गाणे …. कॅस्टानेट्स हे एक स्पॅनिश वाद्य म्हणजे आपल्या कडील लाकडी चिपळ्या… ‘अकेली मत जाईयो’ या चित्रपटातील ‘थोडे देर के लिए मेरे हो जाओ…’या गाणयाच्या शेवट पर्यंत हे वाद्य वाजत राहते…ओ.पी. नय्यर या संगीतकाराने चिपळ्या ऐवजी काचेचे तुकडे वापरून अनेक गाणी तयार केली…. ‘यँू तो हमने लाख हँसी देखे है’…‘ माँग के साथ् तुम्हारा’ ….‘ये या कर डाला तुने’…‘जरा होले होले चलो मेरे साजना’….‘ बंदा परवर थाम लो जीगर’….‘ पिया पिया पिया मेरा जिया पुकारे’…ही त्यांची घोड्याच्या टापाची गाणी तर फक्त लाकडी ठोकळे वापरून कर्णमधूर केली. १९५५ च्या देवदास मधील एक भजन ‘आन मिलोआन मिलो श्याम सावरे’ .. यात फक्त मंजीरा (टाळ), एकतारा आणि खोल(आपल्याकडील मृदुंगा सारखे) हे तीनच वाद्य वाजविले आहेत. ‘चिक्का’ हे एक पंजाबी लाेकवाद्य आहे. डफली सारखे मात्र याला छोट्या छोटया धतूच्या चकत्या जोडलेल्या असतात. राजकपूरच्या ‘जागते रहो’ या चित्रपटात ‘ते की मै झूठ बोलिया….कोई ना भई कोई ना’ हे पंजाबी गाणे फक्त चिक्कामुळेच गोड झाले आहे. कॅरेबियन आणि लॅटीन संगीतात ‘माराका’ या दोन्ही हाताने वाजविल्या जाणाऱ्या वाद्याचा उपयोग होतो. हे म्हणजे आपल्या कडील वरातीतल्या बॅन्डमध्ये वाजविले जाणारे पत्र्याचे खुळखुळे होय. माराका लाकडी असते ज्याच्या आत बारीक बारीक छर्रे असतात. अत्यंत संयतपणे हे वाजवावे लागते नाही तर गाण्याचा पार खुळखुळा होतो.
होमी मुल्लन यांचे सांगितीक गुरू होते दिग्गज संगीतकार व पियानो या वाद्यावर कमालीची हुकूमत असणारे व्ही. बलसारा. त्यांनीच होमीनां मुंबईत पाठवले. मुंबईत त्यानां एचएमव्ही कंपनीत काम मिळाले व येथेच त्यांची भेट संगीतकार सलील चौधरीशी झाली. त्यांनी अनेक संगीतकारांकडे शिफारशी केल्या. होमी यांच्या मृदू स्वभावामुळे आणि बोटात कमालीचे कौशल्य असल्यामुळे कामे मिळत गेली. सुरूवातीस ते अॅकॉर्डियन आणि पियानो वाजवित असत मात्र नंतर कावस लॉर्ड या भारतीय चित्रपटसृष्टीतले सर्वात मोठे म्युझिक अॅरेजंर व पर्कशनीस्टनी त्यांना खऱ्या अर्थाने घडविले. होमी यानां ते आपले तिसरे आपत्य मानत असत. पूढे होमीनी देखिल आपल्या कर्तृत्वाने त्यांचा वारसा पूढे नेला व श्रेष्ठ दर्जाचे पर्कशनिष्ट झाले.
त्यांनी त्यावेळच्या सर्वच जेष्ठ्य व श्रेष्ठ संगीतकारांकडे कामे केली. नतंर ते पचंमदाकडे रूजू झाले आणि मग त्यांचे खरे सूर जुळले ते थेट पचंमदाच्या निधना पर्यंत. त्यांच्या शिवाय ते कुणाकडे सहसा वाजवत नसत. पचंमदा सोबतची त्यांची गाणी म्हणजे नवनवे प्रयोगच होते. आशाताईच्या ‘आओ नाs गले लगाओ नाss’…. या गाण्यात त्यानी वाजविलेला ट्रॅगंल ऐका…शेवट पर्यंत एक मंजूळ ठेका ऐकू येतो. किशोर आणि लताचं ‘भिगीभिगी रातो मे’…या गाण्यातील वादळाचा आवाज एक पातळ पत्रा लांब पर्यंत हलवत नेत काढला आहे. ‘बडे दिलवाला’ चित्रपटातील ‘तुझ मे क्या है दिवाने’…या गाण्यात शेवट पर्यंत एक छोटेसे आफ्रिकन वाद्य ‘शेकर’ वाजत राहते. हे वजा केले तर गाणे रंगणारच नाही. होमीदाची कमाल म्हणजे ‘होगा तुमसे प्यारा कौन….हे कांची’ हे ‘शैलेंद्रसिंग यांचे गाणे…..या ‘गाण्यात चिक्S चिक्S चिकS चिक…असा ध्वनी शेवटपर्यंत ऐकू येतो..हा आवाज होमीदा यांनी रेगमल पेपरचे दोन तुकडे एकमेकांवर घासून काढला आहे…सोबत कांचा नावाच्या नेपाळा कलावंताचा मांदलही शेवट पर्यंत वाजत राहतो.
‘लव्हस्टोरी १९४२’ या चित्रपटातील प्रसिद्ध ‘गाणे रूठ न जाना मै जो कहँू तो’ हे गाणे आठवा. यात ‘कडकट्… कडकट्.. कडकट्’ असा एक ताल ठराविक वेळाने ऐकू येतो. लाकडी ठोकळ्यावर गोल चेंडू दांडी वाजवूनकाढला आहे ज्याला ‘टेम्पल ब्लॉक’ असे म्हटले जाते. तर अतंरा गाताना ‘छोटा बोंगो’चा वापर केलाय.. मेहमूदचे ‘मुथुकोडी कवारी हडा’ त्यात वाजणाऱ्या इवल्याशा ‘डुग्गी’मुळे मजा आणते. डुग्गी या वाद्यात तर ते मास्टर होते. द ट्रेन चित्रपटातील गुलाबी आंखे…या गाण्यात त्यांनी वाजविलेली ‘लाकडी चापट खुंट्या’ असलेली माळ म्हणजे या गाण्याचा उत्कर्ष बिंदू… त्यांनी जवळपास ४० प्रकारचे देशी विदेशी पर्कशन् वाद्य वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. काही वाद्ययंत्र तर त्यांनी स्वत: तयार केले होते जे पचंमदाच्या गाण्यात वापरले आहेत. ‘मेरे सामनेवाली खिडकी’….आठवा. गाण्याच्या सुरूवातीस जो खास ‘खर्रSSखक….खर्रSSखक’ आवाज येतो तो बागंड्या चिकटविलेल्या नळकांड्यावर कंगवा फिरवून विशिष्ट ध्वनी काढलाय…
आरडीचे खास ऱ्हिदम मास्टर म्हणजे ताल सम्राट मारूतीराव. होमी मुल्लर यांच्या यशात या महान ऱ्हिदमसम्राटाचा मोठा सहभाग असल्याचे ते सांगतात. शिवाय संगीतकार उत्तमसिंग यांचेही ते ऋण मान्य करतात. चित्रपटातील गाण्यात अशा पर्कशन वाद्याचे प्रयोग जेवढे आरडी बर्मन यांनी केले तेवढे इतर कुणीच केले नसतील. आधुनिक काळातील अनेक म्युझिक गॅझेट्समुळे आता संगीतातील सर्व बारकावे ऐकता येतात. भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन गाणी अशी आहेत ज्यामध्ये तालवाद्यांचा अप्रतिम उपयोग केला आहे. ही गाणी तुम्ही पुन्हा एकदा नव्याने ऐकावित म्हणजे पर्कशन वाद्यांचा किती सुंदर वापर केला गेला आहे हे समजते. राजकपूर यांच्या ‘जिस देशमे गंगा बहती है’ मधील ‘तुमभी हो..हमभी है आमने सामने’…हे गाणे. सुरवातीचे तालवाद्यांचे तुफान ऐकण्या सारखे आहे..यात जवळपास सर्वच भारतीय तालवाद्ये वापरली आहेत. दुसरे गाणे देवानंद यांच्या ‘ज्वेल थ्ीफ’ मधील होठोपे ऐसी बात…..च्या सुरवातीचा वाद्यमेळ…यात जवळपास सर्वच प्रकारच्या देशी विदेशी तालयंत्राचा वापर केला आहे. हे संयोजन पंचमदाचे…गाण्याच्या सुरूवातीस ‘हो SS हो SS होSS अशी सुरूवात करून मध्येमध्ये ‘ओ SS शालू’ म्हणणारे गायक होते भूपेंद्र सिंग. तिसरे गाणे ‘बहारों के सपने’ मधील ‘चुनरी संभाल गोरी’…हे गाणेही पचंमदाचे. कधीकाळी जी वाद्ये फक्त संगत करण्यासाठी वापरली जात त्यानां पंचमदानी मूख्य वाद्ये म्हणून वापरली. हे काम नक्कीच सोपे नव्हते त्यासठी प्रचंड आत्मविश्वास आणि निपूणतेची गरज असते. होमी आणि पचंम हे असेच एक रसायन होते. जेव्हा १९९४ मध्ये पचंम जग सोडून गेले त्यानंतर होमी मुल्लर यांनीही निवृत्ती पत्करली. होमीनी आपल्या आयुष्यातील ५३ वर्षे संगीत सेवेसाठी दिले. त्यांच्या नंतर त्यांची ही वाद्ये मात्र अनाथ झाली असावीत कारण कुटूंबीय तर आहेत पण कुटूंबांत हा वारसा पूढे नेणारे कुणी नाही. सन २०१५ मध्ये हा जादूई बोटाचा जादूगार मितभाषी होमी मुल्लन अज्ञाताच्या प्रवासास निघून गेला.
-दासू भगत