• 238
  • 1 minute read

पायाने आकाशाला गवसणी घालणारी जेसिका

पायाने आकाशाला गवसणी घालणारी जेसिका

लंगड्या लुळ्या पांगळ्या लोकानां सगळ्यात सोपे वाटते ते भिक मागणे. आणि आमच्या देशात पूण्य प्राप्तीसाठी असे दान देणाऱ्यांची कमी पण नाही. कल्पना करा की तुम्हाला हात नाहीत आणि तुम्हाला पायलट व्हायचे आहे, हे शक्य आहे का? मला माहित आहे सर्वजण म्हणणार हे शक्य नाही. पण हे सर्व खोटे ठरविणरी एक तरूणी आहे जिच्या जिद्दी समोर आभाळानेही हात टेकले आणि तिला सलाम केला. इतकेच नाही तर ऑक्सफर्ड आणि केंब्रिज डिक्शनरी तयार करणारे तर आता ‘अशक्य’ आणि ‘नाही’ हे दोन शब्द डिक्शनरीतुन काढुन टाकणार असे म्हणत आहेत. तर कोण आहे ही तरूणी ?

अरिझोना प्रांतातील सिएरा व्हीस्टा येथील जेसिका कॉक्स. ही विल्यम आणि इनेज कॉक्स यांची दुसरी मुलगी. वडील निवृत्त बॅन्ड मास्टर आहेत. २ फेब्रुवारी १९८३ रोजी जेव्हा जेसिकाचा जन्म झाला तेव्हा तिला खांद्यापासुन दोन्ही हात नव्हते. आई वडीलासाठी तर अशा अपत्याचा जन्म अत्यंत वेदनादायी असतो. पण जेसिकाचे नशीब बलवत्तर आई वडील जिद्दीचे निघाले. तेच तिचे दोन्ही हात झाले.

विशेष म्हणजे जेसिकाने या नसलेल्या हातामुळेच ‘अशक्य ’हा शब्द तिच्या डिक्शनरीतुन काढून टाकला. या एका शब्दाचे तिच्या जीवनातुन नाहीसे होणे खूप महत्वाचे ठरले. जन्मताना भलेही जेसिकात शारीरीक दोष होते पण मानसिक बळ मात्र जबरदस्त होते. मग तिने ठरविले हात नाही म्हणून काय झाले, पाय तर आहेत ना! मग पायच तिचे हात झाले. लहानपणी आई तिच्या पायात खेळणी ठेवत असे व लहानगी जेसिका पायाने खेळणी खेळत असे. घरी संगीताचे वातावरण असल्यामुळे जेसिकाने लहानपणीच नृत्य शिकायला सुरूवात केली. जेव्हा नृत्य सादर करण्याचा पहिला दिवस उगवला तेव्हा तिने नृत्य शिक्षकेला विनंती केली की तिला मागच्या रांगेत उभे करा पण शिक्षकेने सांगितले की इथे मागची रांग नाही तुला समोर जाऊनच नृत्य करावे लागेल आणि तिने ते करून दाखविले. समोरच्या रांगेत तिला तिच्या शिक्षिकेने आणून ठेवले आणि ती रांग मग तिने कधीच सोडली नाही.

वडील संगीतकार असल्यामुळे संगीताची आवड तीला उपजतच होती. तिने पायाने पियानो शिकण्यास सुरूवात केली आणि तरबेजही झाली. पियानो वादनाचे अनेक सोलो कार्यक्रम जेसिकाने सादर करून लाखो रसिकांचे लक्ष स्वत:कडे वळवले.

एकदा तिच्या आई वडीलांची जीम कनिंगहॅम नावाच्या तायक्वांदो शिक्षकाशी सहज भेट झाली. व त्याने सांगितले की जेसिका तायक्वांदो आत्मसात करू शकेल कारण तिला पायाचा कसा उपयोग करायचा हे चांगले माहित आहे. जीम तिला तायक्वांदो शिकविण्यास तयार झाला आणि त्याचे म्हणणे खरे ठरले. जेसिकाला वयाच्या १४ व्या वर्षी पहिला जगातिक ब्लॅक बेल्ट मिळाला. जेसिका ही हात नसलेली जगातील पहिली ब्लॅक बेल्ट व्यक्ती आहे.

शाळेतील सर्वच कार्यक्रमात ती आग्रहाने भाग घेत असे. पूढे तीने अरिझोना विद्यापिठात प्रवेश मिळवला आणि मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली. हा विषयही तिने मुद्दाम निवडला होता. ती नेहमी म्हणते की – ‘मानसाशास्त्रामुळेच मी शारीरीक अपंगात्वावर मात करू शकले.’ कॉलेजच्या काळात तिला ‘अमेरिकन तायक्वांदो ’ नावाच्या एका क्लबची माहिती मिळाली आणि आणि ती त्याची सभासद झाली व पुन्हा तायक्वांदोचा अभ्यास सुरू केला. यातुन आणखी एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे तिच्या प्रशिक्षिकाने हात नसलेल्या व्यक्तीसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला.

जेसिका आपली कार स्वत:च उत्तम रितीने ड्राईव्ह करू शकते. तिच्यासाठी कारमध्ये कुठलेही फेरबदल केले जात नाहीत. स्वत: कारमध्ये इंधनही तीच भरते. पण जेसिकाचे एवढ्यावरच समाधान झाले नाही. कार चालवतानां नेहमी समोर बघावे लागते आणि अनेकदा समोर क्षितीजरेषाही दिसत असते. या रेषेला आकाश टेकलेले असते. एक दिवस जेसिकाला या टेकलेल्या आभाळाने खुणविले व मग तिने वर बघायला सुरूवात केली. आता तिचे लक्ष आकाशात भिरभिरणाऱ्या विमानांकडे लागले. उंचावरून जाणाऱ्या विमानांकडे बघतानां तिच्या स्वप्नांनाही आपसूक उंची मिळू लागली. असे उंच आकाशात आपल्यालही का नाही जाता येणार? या प्रश्नाने मग ती अस्वस्थ होऊ लागली. मला विमान चालवता आले पाहिजे व मी ते शक्य करून दाखवेनच.

जेसिका तयारीला लागली आणि तिला १० ऑक्टोबर २०१० रोजी पायलटचा परवानाही मिळाला. ही ट्रेनींग मुळात सहा महिन्याची असते मात्र जेसिकाने तीन वर्षे कसून सराव करावा लागला आणि त्यानंर ‘लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट’ उडविण्यासाठी ती पात्र ठरली. हे विमान ती १० हजार फूट उंचीवरून उडवण्याची परवानगी होती. पहिल्यांदा तिने जेव्हा विमान चालविले ते एक एकल एजिंन विमान होते. या विमानाने जेव्हा आकाशात झेप घेतली तेव्हा तिच्या स्वप्नांचे झाडाच्या फांद्या देखिल आकाशात पोहचल्या होत्या. तिचे आकाशात उडण्याचे स्वप्न जेव्हा पूर्ण झाले तेव्हा गिनीज बुकानेही मग तिची नोंद घेतली. हात नसलेली जगातील पहिली पायलट व्यक्ती म्हणून तिचा गौरव करण्यात आला.

जेसिकाची ही गोष्ट जशी तिच्या स्वत:च्या जिद्दीची आहे तशीच ती जिद्दी पालकांची देखिल आहे. आईने तिला सतत प्रोत्साहन देत असे. सुरूवातीला जेसिकाला कृत्रिम हातही बसविणात आले होते पण नंतर तिने ते काढून टाकले. आज जशी ती वैमानिक म्हणून ओळखली जाते तशी एक उत्तम तायक्वांदो, उत्तम स्कुबा डायव्हर म्हणूनही ओळखली जाते. तिच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन तिच्यावर ‘बॉर्न विदावुट आर्म्स’ नावाच्या लघुपटाचीही निर्मिती केली गेली. जेसिका आज जगभर एक मोटीव्हेटीव ऑयकॉन म्हणून प्रवास करते. जगभरातील अपंगासाठी मदत गोळा करत फिरते. या प्रवास दरम्यान जगातील अनेक नामवंत व्यक्क्ती स्वत:हुन तिच्या भेटी घेतात. सन २०१० मध्ये AOPA LIVE Pilots Choice Award तर २०१२ मध्ये जगातिक स्तरावरील Inspiration Award for Women हा पुरस्कार प्राप्त झाला.

अमेरिकेतील १०० प्रभावी व्यक्तीमध्येही तिच्या नावाची नोंद करण्यात आली. सर्वसामान्यपणे तरूणी जे काम हाताने करतात ते सर्व ती आजही सहजपणे करते. जेसिका एकदा फिलिपाईन्स येथे गेली असता तिची भेट तायक्वांदो फेस्टिव्हल दरम्यान पॅट्रीक चॅम्बर्लिन यांच्याशी झाली. तेथेच दोघानी आपण लग्न करणार असल्याचे जाहीर केले आणि सन २०१२ मध्ये लग्न केले. आज जेसिका एक सुखी व संपन्न आयुष्य जगत आहे. शरीराने व सर्वार्थाने धडधाकट असलेले अनेकजण जेव्हा रडत असतात त्यांच्यासाठी जेसिकाची ही विलक्षण कहाणी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

– दासू भगत

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *