- 28
- 2 minutes read
मित्रा, तुझ्या कार्याला सलामी ! -श्यामल गरूड
बुद्धप्रिय कबीर आज तुला जाऊन चार वर्षे पूर्ण झालीत..पण तुझ्यातला निष्ठावंत कार्यकर्ता अन् त्या कामाचं वितळतं पोलाद कवितेच्या खडकावर येऊन आदळलं.. मित्रा तुझ्या कार्याला माझ्याकडून हीच सलामी! उद्या सायंकाळी साडेसहा वाजता चळवळीच्या बालेकिल्ल्यात ‘ काॅम्रेड, जयभीम’ या दीर्घ काव्यसंग्रहाचे प्रकाशन बीडीडी वरळी चाळ, इंजिन छेडा, जांबोरी मैदान येथे रस्त्यावर होणार आहे. सर्वच समकालीन मित्रमंडळींना निमंत्रण!
( प्रकाशित होणाऱ्या संग्रहातील कवितेचे दोन वेचे)
. (१)
होय मला ठाऊक आहे, बुद्धाचा अनित्यवाद
अनंताच्या दिठीमिठीतला शेवटचा श्वास,
मृत्यू एकमेव सत्य !
काळाने आपल्या पुढ्यात ठेवला नाही मरणोत्त्सव
तरीही मित्रा, जातीअंताच्या समकालीन पांथ:स्थांना या अनावर हाकेचे मोल ठाऊक आहे.
कोणाला वाटू दे ही कविता, करुणेच्या तर्कापल्याडची बाराखडी
चळवळीतल्या असीम ग्लानीनंतरची आरोळी
अश्रूंनी मौनव्रत सोडल्याची हाकाटी
निळ्या बिछायतीवरून अचानक उठून गेलेल्या
एका कार्यकर्त्याची झाडाझडती
आपण तर खुल्लम खुल्ला आमने-सामने लढणारे सैनिक
शोषणमुक्त जगाचे स्वप्न बघणारे फिनिक्स
डोलत्या निवडुंगाच्या फण्यावर ढोल वाजवणारे उन्मत्त तांडे
मुर्दाडांना विद्रोहाची शीळ वाजवायला शिकवणारी निळी रानपाखरं
या पृथ्वीवरल्या शेवटच्या माणसाचेही अश्रू पुसणारे
महामानवाचे वंशज
रणकंदनात समग्र शोषणाच्या विरोधात लढणारे शिपाई
युगानुयुगे मानवतेची मशागत झालेल्या भुईत
वैफल्याचे चिरगूट हवेत भिरकावणारे कफल्लक
परिघावरच्या तितर-बितर झालेल्या येड्या-गबाळ्यांना पंखाखाली घेणारे
समष्टीची टाळी आभाळभर वाजवणारे
अंधारानंतर उजेडाची स्वप्न बघणारे
आपण सूर्यकुळाचे वंशज…!
(२)
“कुठल्या अज्ञाताचं बोट धरून सरळ चालू पडलास ?
कुठल्या तहाची बोलणी फिस्कटली होती ?
की, डाव्या उजव्यांच्या लढाईत आलं होतं घनघोर रितेपण ?
मित्रा, तू तर होतास ना फकीर…?
‘अल्ला हूं अकबर’ची बांग तुझ्या बाळोत्या दुप्ट्यातच
घराभोवती रांगली
सामाजिक सलोख्याची गाठ तुझ्या नाळेसोबत बांधलेली
क्रूसाच्या कनवटीला धरून तू ऐकलीस मेरीची लेकुरवाळी हाक
ख्राईस्ट चर्चच्या शाळेत
नागसेनवनाच्या आंबेडकर महाविद्यालयात तू
विद्यार्थी आंदोलनाची अनुभवलीस झिंग
मिसुरडं फुटल्या वयात नामांतराच्या मोर्चात तू घशाच्या शिरा ताणून,
“अरे देत कसे नाही, दिलेच पाहिजे… मराठवाडा विद्यापीठाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलेच पाहिजे…!”
या घोषणा मुठी आवळून आभाळभर फेकत होतास.
विद्यापीठात आल्यावर तर पांगलास सैरभैर,
मग मावलाच नाहीस हातात.
जवानीच्या धांदलीत मैथुनमोरांच्या छावण्या लांघून तू
सभा-मोर्चा-निदर्शने-उपोषणात चौखूर उधळलास
माणसांचे जथ्ये काळजात-उरात साठवत राहिलास
तुझ्या धमन्यांतला आंबेडकरी लाव्हा तुला स्वस्थ बसू देईना
तू वस्त्या-वस्त्यांच्या चौथऱ्यावर जाऊन बसू लागलास
आंबेडकरी आया-बायांच्या चुल्ह्यापर्यंत तुझा बंधूभाव !
जेव्हा शहरातली पिसं गळालेली असंख्य शहामृगं
आपली भुंडं झाकत चळवळीच्या अपयशाच्या
आदीम कथा चघळत बसलेली होती
त्यावेळी तू अबलख घोड्यावर बेधुंद होऊन विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व करीत
जातीअंताच्या पताका घेऊन लखलखत होतास.
पुढेही तुझा खांदा तोच होता,
फक्त पताका मात्र बदलली !
पण मित्रा… आपलं जातीअंताचं इप्सित तर तथागत व्हाया भिडेवाडा ते बाबांच्या मानव मुक्तीच्या सूचीपर्णी सावलीत वाढलेलं होतं ना !
मित्रांच्या एकजुटीची समशेर तर आपल्या कमरेलाच होती की !
आपण तर नव्हतोच ना चळवळीच्या भाळावरचे विधवापण मोजणारे असंस्कृत ?
आपण तर गाडलेल्या आत्म्यांच्या छाताडावर नाचणारे अनात्मे होतो.
आपण ईश्वराच्या भोंगळ पिसाऱ्यातील पिसं नाचवत
अनिश्वराच्या हिरव्यागच्च शेतात वाढलेलो होतो.
आपण होतो क्रोधाला-शांती, हिंसेला-अहिंसा सांगणारे
निर्वाणीच्या पाण्यात बसलेल्या म्हशीला ढुसण्या देणारे
मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून एकमेकांचे पिचलेले मणके मोजणारे नव्हतोच आपण!
आपण यातनांची सोंगीभजन मंडळीही काढलेली नव्हती
आपण नव्हतो उकिरडे फुंकत तारुण्याची झूल पांघरणारे
आपण होतो दगडालाही करुणेने स्पर्श करून त्यांची वेगाने
फुले बनविणाऱ्या कुळाचे
मग असं काय घडलं मित्रा,
तुझ्या मोर्चाने रस्ताच बदलला?
आता अळंबळं मेंदूला खळं पाडणारेही सोंड मोठी करून
बोलतील तुझ्यावर.
ते तुझ्या अंगावरच्या लाल-निळ्या सदऱ्याचंही करतील सिद्धांतन
आयुष्य वेचूनही शापग्रस्त राजकुमारासारखाच जगलास तू
सहज चालू पडलास डोक्यावर काटेरी मुकुट ठेवून.
आपल्या उद्धारकर्त्याने तर पृथ्वीच्या नाभीवर पाय देऊन
संपवलीत इथली हाडकी-हडोळी
चळवळीच्या वाहत्या स्तनाग्रातून उभ्या राहिल्यात
आपल्या चार पिढ्या
मित्रा, आपल्या विचारांच्या सर्वच नद्यांचा उगम तर
शाक्य कुळाच्या गर्भातूनच झालाय ना ?
प्रज्ञा-शील-करुणेसह मेत्ता तर आपला स्थायीभाव!
तू ठेवायची असती ना पुढ्यात तुझ्यातल्या
अस्वस्थ कार्यकर्त्याची बाराखडी
पुढे पुढे तर तू सोबत असतानाही धूसर होत गेलास
नजरेतून आरपार
आता नाकं खाजवून पडक्या घरावरची माकडं बोलवणारेही
कदाचित करतील तुझी मीमांसा…
पण तू माझ्यासह त्यांनाही माफ कर
तुझ्या अमर्याद चारित्र्याचे बिल्लोरी तुकडे वेचण्यापासून
कोणीच कोणाला रोखू शकत नाही, एवढंच लक्षात ठेव
तशी बाय कुठलीही असो भीमनगरातली-वस्ती-कॉलनीतली
की, विद्येच्या महाद्वारातली
तिचं आतलं दुःख वाफाडत राहिलं की,
सांजच्याला येऊन बसते ती दाराशी.
कालचक्राचं उसवलेलं जुनेरही ती भरते गोधडीत
काहीच तर वाया जाऊ देत नाही ती
इथे तर अख्या जातीअंताच्याच लढाईतल्या शिपायाचा
प्रश्न होता ना कॉम्रेड ?
मित्रा, ही विलापाच्या वाळवंटातली कोरडी हाक नाहीये
तू चळवळीतल्या यातना अन् पुढ्यात आलेलं संभ्रमाचं धुकं एकटाच तुडवत गेलास.
तुला आठवतं का ?
कधी माहेरवाशीण होऊन यायचे दाराशी
तेव्हा ‘जयभीम कॉम्रेड’ म्हणून कडक घालायचे साद
तेव्हा तुझ्या सहा फुटी स्थितप्रज्ञ देहात
आपोआप वाहायची एक दुथडी नदी
अन्यायाच्या हैदोसाविरोधात एल्गार करणाऱ्या तुझ्या हातात
मग दिसू लागायची अदृश्य खणा-नारळाची ओटी
आपल्या हमदर्दी नात्याच्या बदललेल्या कवडस्यांचे असंख्य तुकडे आजही जोड!ता येत नाहीत
कदाचित उद्विग्न उदास प्रहराची ही अवेळी आळवलेली प्रार्थना समज.
हो प्रार्थनाच !
समकालीन सहोदरांची
मोहरबंद पाकिटात
पत्ता हरवलेल्या गावी पाठवलेली
-श्यामल गरुड