कल्याण : गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांचा अटक पूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आमदार सुपुत्राचा जामीन अर्ज फेटाळल्यावर त्याचा राजकीय परिमाण काय होणार आहे. याची चर्चा आता रंगली आहे. भाजप आणि शिवसेनेतील वाद दूर करण्यासाठी एकीकडे खासदार शिंदे आणि मंत्री रविंद्र चव्हाण प्रयत्नशील आहेत. मात्र वैभव गायकवाड यांचा जामीन अर्ज रद्द केल्याने भाजपशी शिवसेनेचे मनोमिलन होणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. द्वारली गावातील जागेच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना हिललाईन पोलिस ठाण्यात घडली होती या घटनेपश्चात आमदार गायकवाड यांच्यासह पाच जणांना सध्या तळोजा कारागृहात आहेत. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचे सुपुत्र वैभव हे देखील आरोपी आहे. घटना घडल्यापासून ते फरार आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर काल कल्याण न्यायालयात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली. मात्र न्यालायाने त्यांच्या अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. आज त्यांच्या अर्जावर निकाल दिला आहे. त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे वैभव यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यावर वैभव गायकवाड हे उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करु शकता अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसापूर्वी दिव्यातील भाजपचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा भाजपच्या चिन्हावर लढविली गेली पाहिजे असे विधान केल्यावर खासदार शिंदे यांच्यासह भाजप मंत्री चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी बैठक घेतली. कल्याण पूर्व विधान सभेत हे मनोमिलन झाले की नाही हे आत्ता निवडणूकीत स्पष्ट होणार आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर त्याचा युतीवर काय परिमाण होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.