- 29
- 1 minute read
RSS के छाती पर, फुले शाहू आंबेडकर!
भारताची लोकशाही विविधतेच्या धाग्यांनी विणलेली आहे. धर्म, भाषा, जात, संस्कृती या सर्वांचे अस्तित्व, समान हक्क आणि परस्पर आदर या तत्त्वांवरच राष्ट्राची एकता टिकून असते. पण या विविधतेला फोडून ‘एक विचार, एक धर्म आणि एक सत्ता’ हा विषारी राष्ट्रवाद पसरवण्याचे काम RSS ही संघटना दशकानुदशके करीत आली आहे.
ही संघटना स्वतःला “संस्कृतीचे रक्षणकर्ते” म्हणवते; पण प्रत्यक्षात तिचा इतिहास समाज तोडण्याचा, द्वेष पसरवण्याचा आणि संविधानिक मूल्यांना कमकुवत करण्याचा आहे.
भारतात RSS वर तीन वेळा बंदी घालण्यात आली. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर सामाजिक सलोखा धोक्यात आणणारी संघटना असा ठपका ठेवण्यात आला. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात असंवैधानिक गुप्त संघटनात्मक कारवायांमुळे RSS वर बंदी घालण्यात आली. १९९२ ला बाबरी विध्वंसानंतर देशात धार्मिक तणाव पेटवणाऱ्या भूमिकांमुळे RSS विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
हिटलर आणि मुसोलिनीची विचारधारा मानणारी RSS म्हणजे लोकशाहीसाठी धोकादायक संघटना आहे. मात्र, काँग्रेसने वेळोवेळी RSS बाबतीत मवाळ भूमिका घेतल्यामुळे आज ती वाढली आहे.
आज हातात संविधान घेऊन मते मागणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, डावे, कम्युनिस्ट RSS वर शांत का आहेत? आज अनेक राजकीय नेते संविधानाचे नाव घेऊन सभा घेतात, मोर्चे काढतात. परंतु RSS वर बंदी घालावी अशी मागणी मात्र कुणीही करताना दिसत नाहीत. कारण त्यांच्यात ते धाडस नाही. त्यांचा राजकीय स्वार्थ त्यांना हे करू देत नाही.
ज्या संघटनेची नोंदणीच झालेली नाही. ती RSS “राष्ट्रभक्ती”च्या नावाखाली बहुजन समाजाच्या मुलांना शिस्त, त्याग, देशसेवा याचा उपदेश करत धर्मांध विष पसरवत आहे. पण स्वतःची मुलं परदेशी विद्यापीठात पाठवत आहेत. राष्ट्रवाद फक्त बहुजन मुलांसाठी आणि लाभ फक्त सत्ताधाऱ्यांसाठी. यालाच म्हणतात कावेबाज गुलामीचा कारखाना. RSS ही सवर्ण ब्राह्मण समाजाने स्वतःच्या हितासाठी काढलेली संघटना आहे. हल्ली त्यात बहुजन समाजाचे लोक दिसतात पण त्यांना मोक्याच्या ठिकाणी कधीच संधी दिली जात नाही. त्यांना गुलामीचीच वागणूक दिली जाते.
नोंदणी कायद्यानुसार कोणतीही नोंदणी नसलेली धर्मांध संघटना शाळा महाविद्यालय येथे जाऊन शाळा–महाविद्यालयात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना “संघात या” म्हणून गळ घालते हेच बेकायदेशीर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या दोन जागरूक तरुणांनी RSS च्या पिलावळीला महाविद्यालयांतून पिटाळून लावले. हा लोकशाहीचा, विचारस्वातंत्र्याचा पहिला विजय होता. मात्र, राज्यात आणि देशात rss च्या भाजपचेच सरकार असल्याने त्यांच्या बचावासाठी पोलिस धावून आले आणि पाठीमागून वार करण्याची त्यांची जुनीच पद्धत वापरून आरएसएसने एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. त्याचा निषेध म्हणून आताचे संभाजीनगर आणि जुन्या औरंगाबादमध्ये एक विराट मोर्चा निघाला आणि इतिहास घडला. युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले आणि आंबेडकरवादीच तुमच्या खोटेपणाचा पर्दाफाश करू शकतात हे दाखवून दिले. सुजात आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने दाखवलेली हिंमत स्वतःला सेक्युलर पुरोगामी समजणाऱ्या पक्ष संघटनांनी दाखवली तर समाजातील सलोख्याला नख लावण्याचे, विद्वेषाचे विष पेरणाऱ्या धर्मांध संघटनांना वेळीच रोखता येईल.
जिथे काँग्रेस–राष्ट्रवादीने RSS ला पायघड्या घातल्या, तिथे सुजात आंबेडकरांनी थेट संघाला प्रश्न विचारले.
RSS ची कायदेशीर नोंदणी कुठे आहे?
RSS कडे असलेल्या शस्त्रांचा सरकारी परवाना कुठे आहे?
या प्रश्नांनीच संघाच्या फुग्यातली हवा निघून गेली. त्यामुळे
RSS ने थेट सामोरे येण्याची हिंमत दाखवली नाही.
ते पळाले. ते लपले. आंबेडकरवादी जनतेला घाबरले. एवढंच नव्हे निवेदन स्वीकारायलासुद्धा त्यांनी पोलिसांना पुढे केले. राष्ट्रध्वज, संविधान आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत सुजात आंबेडकर यांनी दिली.
पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे RSS आणि BJP ला वाटलं होतं “बहुजन आंबेडकरवादी घाबरतील.”
पण वंचित बहुजन आघाडीने विशेषतः सुजात आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले, “संविधानाने दिलेला हक्क परवानगीने थांबत नाही. मोर्चा निघणारच.”
आणि तो निघाला. शांततेत.शिस्तीत. निर्भीडपणे. ऐतिहासिक मोर्चा झाला. जे कोणत्याही राष्ट्रीय, प्रादेशिक राजकीय पक्षांना जमले नाही, ते वंचित बहुजन आघाडीने करून दाखवले. थेट RSS च्या कार्यालयावर निघालेला देशातील हा कदाचित पहिला मोर्चा असेल.
सुजात आंबेडकर यांनी विचारलेले प्रश्न अतिशय रास्त आहेत. एखादी किरकोळ संघटना काढायची असेल तर नोंदणी कुठे आहे असे विचारले जाते. मग, शंभर वर्षे झालेली संघटना अद्याप नोंदणीकृत का नाही. त्यांना शस्त्र कशासाठी लागतात. त्यांना शस्त्र परवाना दिला आहे का. असे प्रश्न विचारून या लढ्याला सुजात आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने सुरुवात केली आहे. आता निर्णयाची वेळ आली आहे
RSS चा इतिहास हा द्वेष, विभाजन आणि हिंसेचा आहे. देशविघातक आणि दहशतवादी विचारधारा मानणाऱ्या RSS वर बंदी घातली पाहिजे. पण ती हिंमत कुणाच्यात दिसत नाही. कर्नाटकात काँग्रेसने बंदी घालण्याचा प्रयत्न केला. विधेयकाचा मसुदा तयार केला पण त्यांचा फक्त मतांवर डोळा असल्याने ते विधेयक मागे घेण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण राष्ट्राची एकता हा कोणीच्या धार्मिक अहंकाराचा शिकार होऊ देणार नाही. कारण संविधान या देशाचा एकमेव सर्वोच्च ग्रंथ आहे.
कारण बंधुता, समता आणि स्वातंत्र्य हीच खरी भारताची ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे एकसंध असलेला शांतीप्रिय देश ज्यांना हवा आहे त्यांनी आज निर्भीडपणे RSS च्या विरोधात मैदानात उतरले पाहिजे. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाने इतिहासाच्या पानांवर आज एक वाक्य लिहिले जात आहे “RSS ला प्रश्न विचारण्याची सुरुवात झाली आहे. आता उत्तरदायित्वाची वेळ आली आहे.” औरंगाबादमधून सुरू झालेला हा कारवा मानवमुक्तीची मशाल व्हावा…या मोर्चाच्या निमित्ताने आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरली की, तुमच्याकडे कितीही यंत्रणा, बळ आणि झुंडी असल्या तरी आम्ही निर्भीडपणे संविधानिक मार्गाने आरएसएस सारख्या धर्मांध संघटनांना प्रश्न विचारत राहू…कारण अशा प्रकारे द्वेष पसरवणाऱ्या संघटनांना वठणीवर आणण्यासाठी डर जरूरी होता है…आंबेडकरवादीयों के सामने सत्ता को डरना जरुरी है…हा इशारा देखील या मोर्चाने दिलेला आहे. हा देश छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारांवर चालेल, हे या विराट मोर्चाने आणि वंचित बहुजन आघाडीने दाखवून दिले आहे. RSS च्या कार्यालयावर काढलेल्या या मोर्चाबद्दल वंचित बहुजन आघाडी आणि सुजात आंबेडकर यांचे अभिनंदन..!
—-
– धनाजी कांबळे