- 62
- 1 minute read
भाजपच्या पथ्यावर पडणारे मत विभाजन बौद्ध समाजाने टाळावे !
– श्यामदादा गायकवाड यांचे आवाहन
मुंबई ( २२ एप्रिल २०२४ ) – कुठलाही आंबेडकरवादी, बहुजनवादी पक्ष राज्यात स्वबळावर जिंकणे दूरच, पण मोदी आणि त्यांच्या भाजपला एकट्याने कदापिही पराभूत करू शकत नाही, असे सांगतानाच या लोकसभा निवडणुकीत बौद्ध समाजाने भाजपच्या पथ्यावर पडणारे आपल्या निर्णायक मतांचे विभाजन टाळावे आणि महाविकास आघाडीच्या प्रबळ उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन ज्येष्ठ पँथर – रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांनी केले आहे. ते सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पँथर नेते सयाजी वाघमारे, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, संजय अपरांती, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोबरागडे हे उपस्थित होते. त्यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजप महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळची लोकसभा निवडणूक ही राज्यातील बौद्ध समाजासाठी आपले राजकीय उपद्रव मूल्य सिद्ध करून दाखवण्याची मुळीच नाही. या निवडणुकीत देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्याचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे. मोदी आणि त्यांच्या भाजपला रोखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन श्यामदादा गायकवाड यांनी यावेळी केले.
बौद्ध मतांची ताकद जगजाहीर
—————–
बौद्ध समाजाच्या एकजुटीच्या निर्णायक मतांची ताकद ही नव्याने सांगण्याची वा दाखवण्याची गोष्ट राहिलेली नाही, असे सांगून गायकवाड म्हणाले की, आंबेडकरी समाजाने आपल्या मतांची उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य आजवर अनेकदा सिद्ध केले आहे. १९९० सालात एकिकृत रिपब्लिकन पक्षानेच शिवसेना – भाजप युतीला सत्तेवर येण्यापासून रोखले होते. तसेच घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील दलित हत्याकांडानंतर १९९९ सालात त्या युतीला सत्तेतून हद्दपारसुद्धा केले होते.
त्याचीच पुनरावृत्ती या लोकसभा निवडणुकीत आपल्या मतांची विभागणी टाळून आंबेडकरी समाज घडवेल आणि भाजपला रोखेल, या विषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, असे गायकवाड, वाघमारे, सुराडकर,अपरांती, खोबरागडे यांनी एकसुरात सांगितले.
गटा- तटापेक्षा लोकशाही मोठी
—————–
काही आंबेडकरवादी, बहुजनवादी गट – संघटनांनी केवळ पक्षीय अस्तित्वासाठी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या अस्तित्वाला प्राधान्य देवून माघार घ्यावी, असे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.
विदर्भातील ८० संघटनांचा पाठिंबा
—————–
विदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आंबेडकरी समाजाची भाजपच्या पथ्यावर पडणारी मतविभागणी टाळण्यासाठी थोर विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली ८० संघटनांनी जनजागृती केली होती. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला
असून भाजपच्या पराभवासाठी राज्यभरात हे काम आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सर्वत्र जोरात सुरू केले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पार्टी मैदानात
—————–
या लोकसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवण्याचे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला अस्सल रिपब्लिकन पक्ष उभा ठाकलेला दिसेल. त्यासाठी प्रागतिक रिपब्लिकन पक्षाची उभारणी आम्ही सुरू केली आहे, अशी घोषणा श्यामदादा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
तब्बल चार तास बैठक
पत्रकार परिषदेपूर्वी रिपब्लिकन – आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची बोलावण्यात आलेली बैठक बेल्लॉर्ड इस्टेट येथे तब्बल चार तास चालली. मुंबई, ठाणे जिल्हा, नवी मुंबई, नाशिक येथून आंबेडकरी कार्यकर्ते य बैठकीसाठी आले होते. त्यात पँथर नेते सुरेश केदारे, प्रा.एम. ए.पवार, डॉ. संपत सकपाळ, ऍड.किरण चन्ने, ऍड . राजय गायकवाड, अरविंद सोनटक्के, राजू रोटे, सतीश डोंगरे, चंद्रकांत जगताप, गुणाजी बनसोडे, जयवंत हिरे, प्रकाश हिवाळे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, महेंद्र पंडागळे, रमेश मोकळ, रमेश चक्रे, सुनील कदम, हेमंत मोकळ,कैलास सरोदे, अश्वजित सोनावणे, स्वप्नील कदम, तुकाराम माने, राहुल गायकवाड, प्रकाश सोनावणे, पोपट आधांगले, व्हीं. डी. म्हेत्रे, प्रवीण पाटील,
हिरामण गायकवाड, गौतम सांगळे,विजय बागुल,आश्विन कांबळे, छबू घुगे,सुधाकर बर्वे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
– महेंद्र पंडागळे
(कार्यालयीन सचिव
प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पार्टी)
महाराष्ट्र राज्य.