१९६२ मध्ये हिवाळी सुट्यांत अवघा २० वर्षे वयाचा तरूण आपल्या गावी येतो.एक दिवस अचानक त्रास होऊ लागतो म्हणून उपचारासाठी डॉक्टरांकडे दाखवतो. पण रोगाविषयी काहीच माहिती मिळत नाही. मग रोगाचा जोर वाढत जातो. ८ जानेवारी १९६३ रोजी आपला २१ वा वाढदिवस साजरा करत असतानां त्याला एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट होते. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते.
हा तरूण जेमतेम दोन वर्षे जगेल असे सांगण्यात येते. हा तरूण प्रचंड निराश होतो पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून त्यालाही आशेचे किरण दिसू लागतात..
अत्यंत बुद्धीमान असणाऱ्या या तरूणाची लढाई सुरू होते. ही लढाई एकाचवेळी शारीरीक व मानसिक अशा कात्रीत तो लढत राहतो. त्याला आयुष्य हवं असतं पण वेगळ्या कारणासाठी. या अफाट विश्वाच्या पसाऱ्याचं रहस्य त्यालाही शोधायचं असतं. पण शरीराचे दगा देण्याचे सत्र थाबंत नाही. हळूहळू त्याला चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागतो. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडून व फक्त एक बोट वापरून तो संगणकावर हवे ते काम करू लागतो. रोगही असे दरीद्री की तेही लपून छपून हल्ले करू लागतात. १९८५ मध्ये त्याला न्यूमोनिया होतो. डॉक्टर म्हणतात श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया करावी लागेल…. तशी शस्त्रक्रिया मग यांच्यावर करण्यात येते पण त्यामुळे तो आपला आवाज कायमचा गमावून बसतो. पण आता तोही मागे हटायला तयार नसतो. मग संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन त्याच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून देतात. आता तो संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलू लागतो…
जणू जीवन मृत्यूचा खेळ सुरू होतो. तो काही हार मानायला तयार होत नाही आणि मृत्यू त्याच्या जीवाशी खेळायचे सोडत नाही………एवढे सगळे होऊन अन् अख्खा व्हील चेअरवर खिळूनही त्याचा मेंदू मात्र अबधित राहतो….…मृत्यूला वैषम्य वाटण्या सारखीच गोष्ट होती……मग तो विश्वाचे रहस्य उलगडत राहतो अन् शरीराने कण कण मिटत राहतो… अशा अवस्थेत तब्बल ५५ वर्षे मृत्यूला दारावर अडवून ठेवण्याची जिद्द त्याला कोणत्या शक्तीने दिली असेल? माहित नाही.
विश्व पसाऱ्यातील अनेक कोडी सोडवून शेवटी तो मृत्यूला म्हणाला असेल का? – “आगोदर तुझे धन्यवाद मित्रा !!! फार ताटकळत ठेवले तुला……..पण मी तरी काय करू? ज्या कामासाठी मी येथे आलो ते पूर्ण नको का करायला?” मृत्यू ओशाळला असेल का? !!!!!!!
महान वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग यानां या विश्वाच्या पसाऱ्यात हरवुन ६ वर्षे झाली.पण विश्व तर अमर्याद..विश्वाच्या वयाचा अंदाजही घेता येत नाही…