- 42
- 1 minute read
मेंदूचा भुसा झालेली काॅर्पोरेट पिढी !
भाजपाचा सगळ्यात मोठा हक्काचा भक्त म्हणावा असा मतदार हा शहरी भागातला कॉर्पोरेट इंडिया मधला पन्नाशी / साठी च्या आतला आहे. यात ३० ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या लक्षणीय आहे.
या पिढीने आधुनिकतेचे तंत्र जगण्याच्या भौतिक व्यवहारात उतरवले असले तरी, ही पिढी बिनडोक आणि मेंदूचा भुसा झालेल्या बहुसंख्यकांची अधिक आहे.
मी स्वतः टिपिकल कॉर्पोरेट इंडियाचा गेली १८ वर्षे भाग आहे. त्यामुळे काही गोष्टी अतिशय बारकाईने निरीक्षण केल्या आहेत.
या पिढीत भारताच्या राज्यघटनेबद्दल कमालीचे अज्ञान आहे, आरक्षणाच्या पॉलिसी बद्दल पराकोटीचा द्वेष आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे सर्वाधिक उपभोग घेणारे हे तरुण वैचारिकतेच्या बाबतीत संघ भाजपाने प्रसवलेल्या विषावर किक अनुभवत आहेत.
हे नेमके का घडले ? कसे घडले ? याचा विचार करणे भाजप विरोधी राज्यकर्त्यांना आवश्यक असणार आहे.
मला हे तरुण झोंबी फॅक्टरी मध्ये मनुफॅक्चरिंग केलेले प्रॉडक्ट भासतात. वरकरणी सभ्य सोज्वळ दिसणारी, मात्र अंतरंगात राक्षसी साच्यात घालून तयार केलेली ही फौज भाजपाचे बलस्थान आहे.
माझे पूर्वाश्रमीचे अनेक मित्र, अनेकानेक ऑफिस सहकारी ह्या झोंबी लँडचा एक भाग म्हणून गेली दहा वर्षे अभिमानाने मिरवत आले आहेत.
देशविदेशातील पंचतारांकित ठिकाणी काम करणारी, उच्च पदावर विराजमान असणारी, पुणे, मुंबई, बेंगलोर येथे हमखास स्वतःच्या मालकी हक्काचे एक दोन फ्लॅट असणारी, बुडाखाली आलिशान गाडी असणारी, हातात महागडा फोन टॅब्लेट असणारी , नवरा बायको दोघे खोऱ्याने पैसे ओढत असणारी, पोरं वार्षिक दोन अडीच लाख रुपये फी असणाऱ्या फाईव स्टार हॉटेल ला थोबाडीत हानेल अशा लॉबी असणाऱ्या शाळेत घातलेली, एका क्लिकवर जगातील वाट्टेल त्या सुख सोयीचे अमाप consumption करू शकणारी ही तरुण मंडळी, भाजपाच्या विखारी राजकारणाचे प्रमुख अंग आहे.
वरकरणी निरुपद्रवी भासणारी ही जनता एखाद्या ड्रग अँड्डीक्टपेक्षा कमी झिंगलेली नाही.
ही झिंग कसली आहे ? आणि हा हँगओव्हर कसा मोडायचा ? याचा भाजपेतर राजकारण्यांनी विचार करणे अत्यावश्यक आहे.
जागतिकीकरणाचा सर्वात मोठा फायदा मिळालेली ही पांढरपेशी पिढी वरकरणी पोशाखी, फाडफाड इंग्लिश बोलणारी, त्यातून फायदे उपटणारी असली तरी मुळात तिच्यात देशाच्या सनातनी संस्कृती बद्दल, हुकुमशाही बद्दल, अफाट आकर्षण असणारी आहे.
ऑफिसच्या किंवा वैयक्तिक कामासाठी मॅकबुक वापरताना व्हॉटसअप विद्यापीठात प्रसवल्या जाणाऱ्या वैदिक छद्म विज्ञाना बद्दल, वेदात कसं क्वांटम कम्प्युटिंग बद्दल आधीच लिहून ठेवलं आहे अशा गाढवलेंढ्याची माळ गळ्यात घालून तावातावाने मिरवणारी ही पिढी आहे.
साधं रस्त्यात ट्रॅफिक जाम झालं तरी, देश सुधरावयाला हुकूमशाहच पाहिजे. अशा स्वरूपाचे अत्यंत उथळ आकलन असणारी ही लोकं आहेत.
जे जे खाजगी ते ते उत्कृष्ट, जे जे सरकारी ते ते निकृष्ट अशा प्रोपोगंडाला बळी पडलेली ही सामाजिक राजकीय निर्बुद्ध आर्मी भाजपाचा फ्रंट लाईन डिफेन्स आहे.
तो मोडून काढणे महत्वाचे आहे.
काही वर्षापूर्वी ,सन २०१८ च्या आसपास कामानिमित्त अमेरिकेला जाताना एक कलिग मुलगी मला म्हणाली होती की, “अगर तुम US जा रहे हो तो, वहा के लोग इन जनरल हमारे इंडिया के पॉलिटिक्स बारे मे बहोत निगेटिव्ह राय रखते है, खास करके भाजपा के बारे मे, तुम उनको ऐसा वैसा कुछ बोलने का चांस मत देना, हमारा देश रिप्रेझेंट करना…” तिने बाय डिफॉल्ट मला मी तिच्याच फौजेचा भाग आहे असे गृहीत धरले होते.
मोदी किंवा भाजप म्हणजेच आपला देश, मोदी विरोध किंवा भाजप विरोध म्हणजे देशद्रोह अशी अडानचोट धारणा घेऊन ती मला शहाजोगपणे सल्ले देत होती.
वर्णव्यवस्था ही कशी छान यंत्रणा होती ? आणि जातीचे भेद इंग्रजांनी निर्माण केले ? यावर तिचा ठाम विश्वास होता.
त्यानंतर काही काळाने तिला माझं पॉलिटिक्स माहिती पडलं, आणि माझ्या कडून वादात चार दोन शाब्दिक झापडा खाल्ल्यानंतर तिने माझ्या नादाला लागणे सोडले. हे एक केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी असंख्य व्हाईट कॉलर लोकं आपल्या आसपास आहेत.
जय श्रीराम बोंबलत अमेरिकेतल्या रस्त्यांवर धिंगाणा करत हिंडणारे हे लोकं आहेत. त्यात तुमचे माझे मित्र, नातेवाईक अनेक आहेत.
हा माज हा इग्नोरंस मुळात यांच्यात कुठून आला ?, तो कुणी वाढू दिला ?, कसा वाढला ?, स्वातंत्र्या नंतर या माजााला कुठल्या सांस्कृतिक रचनेत खतपाणी घातले गेले ? याचे सखोल विश्लेषण विरोधी पक्षांनी केले पाहिजे, तरच या पॉश विषारी फौजेचे वैचारिक मानसिक नसबंदीकरण केले जाऊ शकते.
निवडणुका जवळ आल्या की, पैशासाठी मते विकू नका हा सल्ला गरिबांना दिला जातो, मात्र भाजपासाठी आपला आत्मा विकलेल्या या सुशिक्षित उच्चभ्रू जिवंत मुडद्या गर्दीचे काय करायचे ? हा मोठा प्रश्न आहे.
– मयूर लंकेश्वर.