ॲड. प्रकाश आंबेडकर : औरंगाबाद मतदारसंघात प्रचार सभा
औरंगाबाद : आपल्याला मराठवाड्याचा विकास करायचा असेल, तर सत्तापरिवर्तन झाले पाहिजे. सत्तापरिवर्तन झाले, तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद येथील सभेत व्यक्त केला. ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादीचे अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार यांचे उमेदवार पाहिले, तर एकाच समाजाचे आहेत. ते नात्यागोत्यातील देखील आहेत हे आपण लक्षात घ्या. ते सर्व मराठा समाजाचे आहेत. जरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठा समाज जो आहे त्यातील एकही उमेदवार यांनी दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, काल मोदी म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर उपकार आहेत म्हणून उध्दव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन आणि पाहिजे ती मदत करेन. ही उद्याच्या राजकारणाची नांदी आहे. वाटाघाटी चालल्या तेव्हा मी म्हणालो होतो की, आपण सेक्युलर मतांवर निवडून येणार आहोत. त्यामुळे त्यांना आश्र्वासित करू की, पुन्हा पाच वर्षे भाजपसोबत समझोता करणार नाही.
ॲड. आंबेडकरांनी या वेळी एमआयएमला देखील सुनावले. ते म्हणाले की, ओवैसी असतील किंवा इतर कोणी असेल त्यांना सांगतो की, युती केल्यानंतर युतीचा धर्म पाळावा लागतो. तो पाळता येत नसेल, तर युती आघाडी करू नका.
चंद्रपूरमधील उमेदवार धानोरकर यांनी स्टेटमेंट असे केले की, आमदारकीची सत्ता, जिल्हा परिषदेची सत्ता, खासदारकीची सत्ता ही कुणबी समाजाकडेच असली पाहिजे. चंद्रपूरमधील या उमेदवार आता तिसऱ्या क्रमांकावर गेल्या आहेत. एकजातीय राजकारण यशस्वी होत नाही या मुद्द्याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले.