• 10
  • 2 minutes read

अंबरदादा अमर रहे

सातपुड्याच्या कुशीतील भील आदिवासी समाजातील जून्या-नव्या पिढीतील अशी माणसं,
ज्यांना अर्ध शतकापूर्वी ह्या क्षेत्रातील भील आदिवासीची स्थिती काय होती ह्याची,
आणि ही परिस्थिती बदलण्याचे श्रेय ज्याला द्यावे लागेल, त्या वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी
शहीद झालेल्या श्री अंबरसिंग महाराज वा अंबरदादाच्या जीवनकार्याची माहीती आहे असे
भील आदिवासी स्त्री व पुरूष, वयोवृद्ध व जवान, आज अंबरसिंग महाराजांचा स्मृतीदिन साजरा करतील.
आपल्या समाजासाठी आपले आयुष्य पणाला लावून, ज्यानं आपल्या अल्पकालीन कार्यातून
आपल्या समाजाच्या परिस्थितीत दीर्घकालीन बदल घडवून आणले असा राजकीय नेता नसलेला अंबरसिंग सुरतवंती हा महाराष्ट्रातील गेल्या दोन शतकातील
एकमेव कार्यकर्ता असावा.
मालमत्तेविषयी आसक्ती नसलेल्या आणि भोळ्या स्वभावाच्या बिगरआदिवासी समाजाच्या व्यक्तींकडून आदिवासींची होणारी फसवणूक लक्षात घेऊन ब्रिटीशांनी आदिवासींच्या जमीनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुणाही बिगरआदिवासी व्यक्तीला विकत घेता येणार नाही, असा कायदा १९०२ सालीच केला होता. अर्थात रानावनात वास्तव्य असलेल्या आदिवासीच्या जंगलावर असलेला परंपरागत मालकीहक्काला मर्यादित करणे व साम्राज्यवादी शासनाचा अधिकार अबाधित राखणे हाही हेतू त्यात होताच. पण ह्या कायद्यामुळे आदिवासींच्या जमीनी बिगरआदिवासीच्या वाढती गरज व हावरेपणापासून सुरक्षित राहिल्या हेही मान्य करावेच लागेल.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा कायदा रद्द व्हावा असे प्रयत्न झाले. परंतु त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी कायदा रद्द करण्याची चूक केली नाही. तरीही आदिवासी क्षेत्रांच्या भवतालच्या क्षेत्रात संख्येने व ताकदीने प्रबल असणाऱ्या सधन शेतकऱ्यांनी आदिवासींच्या जमीनी आपल्या कब्जात घेण्यासाठी शासकीय नोकरशाहीच्या साह्यानं वेगवेगळ्या वाटा शोधल्या. ह्याचे एक मोठे आणि ढळढळीत उदाहरण म्हणजे सातपुडा आणि तापी नदीच्या मधील सुपीक जमीनीच्या पट्ट्यामधील शहादे, तळोदे ह्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात झालेले बेकायदेशीर हस्तांतरण. १९७० साली ह्या दोन तालूक्यात केलेल्या अशासकीय सर्वेक्षणात कमितकमी १०००० एकर आदिवासींची जमीन सधन शेतकऱ्यांच्या ताब्यात गेली होती. हा सर्व व्यवहार बेकायदेशीर होता, असे असून सपाटीवरील गावांगावांत आदिवासींना स्वतःच्याच परंतु दुसऱ्याच्या ताब्यात असलेल्या जमीनींवर सालदार वा शेतमजूर म्हणून काम करून जगावे लागत आहे, अशी परिस्थिती होती.

येथे ऐन तारुण्यात अत्यंत बिकट परिस्थितीत जीवावर उदार होऊन केलेल्या अंबरसिंगच्या कार्याबद्दल आणि आदिवासींच्या परिस्थितीबद्दल सविस्तर लिहिता येणार नाही. परंतु ह्या बेकायदेशीर जमीन हस्तांतरणामुळे, सधन शेतकऱ्यांच्या संघटीत दबावयंत्रणेमुळे ह्या क्षेत्रात जी स्फोटक स्थिती निर्माण झाली होती त्याकडे, त्या परिस्थितीत आदिवासींना लढाऊपणे ह्या संकटाशी सामना करायला उद्युक्त करणाऱ्या अंबरसिंगच्या कार्याकडे, त्याला पाठींबा देणाऱ्या सर्वोदयी स्थानिक नेतृत्वाकडे लक्ष वेधून तेथील भयावह वास्तव उघड करण्याचे कार्य त्यावेळी साप्ताहिक माणूस आणि माणूसचे संपादक श्री.ग. माजगावकर ह्यांनीच विशेषांक काढून केले.
मी येथे अंबरसिंगच्या स्मृतीदिनानिमित्त त्याच्या कार्याची आणि त्याच्या अनपेक्षित अकाली मृत्यूने आदिवासीवर आलेल्या संकटावस्थेचे वर्णन करणारे श्री.श्री.ग.माजगावकर आणि अंबरसिंगच्या खांद्याला खांदा लावून लढा देणारे श्रमिक संघटनेचे कार्यकर्ते श्री. कुमार शिराळकर ह्यांचे लेख देत आहे.
——————————————————-
गड आला, सिंह गेला!
लेखक श्री.श्री.ग.माजगावकर
(साप्ताहिक माणूस)
तरुण मित्राचे प्रेत घेऊन गाडी शहाद्याकडे निघाली.
हा हन्त हन्त ! पुढचे मागचे बराच वेळ काही आठवले नाही.
मग हळुहळू एकेक चरण आठवत गेला.
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं,
रात्र संपेल, पहाट उजाडेल.
भानुरुदेश्यति हसिष्यति कमल श्री :
सूर्य वर येईल, सगळी कमळे उमलतील.
इत्थं विचारयति कोषगते द्विरेफे
रात्रभर कमळात अडकलेला भ्रमर अशी स्वप्ने रचित होता
हा ! हन्त ! हन्त ! नलिनीं गज उज्जहार
हाय ! हत्तीने देठासकट कमळच उपटून नेले…
———-
तरुण मित्राच्या आयुष्याची आज अशीच शोकांतिका झाली होती.
आत्ताच कुठे शहाद्यातील हे कमळ उमलू लागले होते. येथल्या आदिवासींची शतकानुशतकांची रात्र सरली होती.
नव्या आश्याआकांक्षा उमलत होत्या. मनोरथ धावू लागले होते.
भ्रमर स्वप्ने पाहत होता-छवकरच आपण मुक्त होऊ; जंगलात गाऊं, नाच; शेतात काम करू. ”
पण हाय ! स्वप्ने निखळली. मनोरथ कोसळले. अगदी देठासकट कमळ उपटले गेले.
पुन्हा रात्र. पुन्हा तो बंदिवास. ” पुढची पहाट आता केव्हा उजाडेल !
———-
गाडी पुढे धावत होती. पहिली साखळी मध्येच केव्हातरी तुटली. मन इतिहासात गेले.
आजवरची मोहिम तर यशस्वी झाली होती. शहाद्यातील आदिवासींना जमिनी तर मिळाल्या होत्या.
पण मोहिमेचा सेनापती, या भूमुक्ती आंदोलनाचा नेता लढाईत कामास आला होता.
गड मिळाला पण सिह गमवावा लागला.
असे मरण तरी किती जणांच्या भाग्यात असते? लढाईतले मरण !’
हतो वा प्राप्स्यसि स्वगंम्‌…अंबरसिंगला हे मरणभाग्य लाभले आहे…
पांढरी चादर. त्यावर निघताना कुणोतरी वाहिलेली कण्हेरीची ताजी फुले.न आतले निश्‍चेष्ट, गोठलेले, थंड शरीर.’
ही प्रथा का पडली असावी! प्रेतावर ही प्रसन्नतेची पखरण कशासाठी?मृत्यूची भीषणता कमी जागवावी म्हणून !
मरण दु:खदायक आहे, पण जीवन तरी कुठे थांबते आहे? लांबरुंद पांढऱ्या चादरीवर तांबडी फुले हसतातच आहेत.
न जायते न्रियते वा कदाचित्‌…
————
कल्लोळ. लाटा. बेभान शोक. किंचाळ्या. आक्रोश. हंंबरडे, शववाहिनी शहाद्यात पोचली होती.
असे वेढून टाकणारे दुःखदृश्य यापूर्वी कधी पाहिले नव्हते. अश्या गदारोळात कधी सापडलो नव्हतो.
ऐकले होते, वाचले होते, की आंबेडकरांच्या वेळी लक्षावधी अनुयायी असेच घाय मोकलून रडले,
महाशोक उसळला-सागरासारखा. तो सागर मुंबईला उसळला होता.
हा एक महाराष्ट्राचा कोपरा. होता-हाच काय तो फरक.
लाटांवर लाटा. दु:खाच्या, शोकाच्या.कार्यकर्ते गांगरून गेले. कसा आवरायचा हा समुद्र !
लोंढे येतच राहिले. चहूदिशांनी. बातमी पसरत गेली तसतसे. शहाद्यातून, आसपासच्या गावातून, लांबलांबहून. वाहनांनी, पायी,
धावतपळत, हातातली कामे टाकून, जेवणखाण सोडून.
कुणी आल्याआल्या जमिनीवर कोसळत. मातीत गडबडा लोळत. मिठ्या मारमारून, कुणी हंबरडत. कपाळ बडवीत. छात्या पिटत.
बायांचा तर कहरच उसळला होता.
तास झाला. दोन तास झाले. समुद्र शांत होत नव्हता. या शोकसमुद्रात सापडणे,
लाटांनी वेढले जाणे, त्यात बुडणे आणि वर येणे हा एक महानुभव होता.
आपली “सुविहित* मरणे, टापटिपितली !आदिवासी समाज सगळे कसे बेभानपणे करत असतो !
उत्सवानंदात रात्ररात्र बेहाय नाचतो, शिकारीमागे दोन दोनदिवस पळत राहतो.
दु:खावेगालाही मर्यादा नाही. बांध नाही. आवर नाही. सगळेच अफाट. छात्या फुटून तिघाव्यात इतके.
———-
पाडळद्याला… अंबरसिंगच्या गावी. शहाद्यापासून पाच मैलावर.
ज्या झाडाखाली भजने म्हणत, स्वत:ची रचत अंबरसिंग लहानाचामोठा झाला तेथे सगळेजण जमलेले आहेत.
झाड लहानसेच. अशोकाचे की पिंपळाचे?
भाऊंती तो अशोक सांगितला. भाऊ मुंदडा, अंबरसिंगला ज्यांनी आपला मुलगा मानले होते. सभेत त्यांनी अंबरसिंगचे ऐकलेले पहिले
भजन म्हणून दाखवले होते-थोड्या वेळापुर्वी.
या दिव्यात तेल नाही- तरीही तो जळतो आहे !
जवळ सत्ता नाही, संपत्ती नाही, कुठलीही साधने नाहीत. तरीहीआदिवासी समाजाला नवा प्रकाश हा अंबरदिवा देत राहिला.
अगदी काल-परवापर्यंत. जेमतेम चार-पाच वर्षं ही ज्योत तेवली, पण तिने मागच्या पुढच्या कित्येक वर्षांचा अंधार उजळून टाकला.
———–
सूर्यास्ताची वेळ झाली. झाडाखालचे विवर खणून तयार होते.यात अंबरसिंगचा देह ठेवायचा,
त्यावर नंतर एक लहानसे देऊळ बांधायचे असे सर्वांनी अगोदरच ठरवलेले होते.
देवळातल्या देवाचे लोकांनी नावही ठेवले- श्रमदेव. आमचा अंबरदादा, आमचे महाराज, आमचा श्रमदेव.
सातपुड्यातील आदिवासींचा जुना वाघदेव होताच-अजूनही आहे. अंबररक्षिग आता त्यांचा नवा श्रमदेव होणार !
तेहतीस-चौतीस वर्षांचे सारे आयुष्य ! माणसाचा देव होऊ शकतो !
————-
विवरात बाजूला आणखी एक कोनाडा केला होता. त्यात बसलेल्या स्थितीत अंबरसिंगला अगदी हळूवार हातांनी ठेवले गेले.
बायांची शेवटची शोकगीते… भाऊंची रामधून, गीता… . अमर रहे, अमर रहे, हा जनकंठनिनाद…
मिठाची रास वाढत होती. लिंबाचा पाला पसरून झाला. शेवटचा नैवद्य ठेवला. आरती झाली. सुर्य मावळला.
मातीचा एक थर.. दुसरा थर.. भराभर माती लोटली जात होती.
आम्हीही एकेक मूठ माती वाहिली. नमस्कार केला आणि निघालो.

————————————————————————————-
अंबरदादा गेला
लेखक कुमार शिराळकर
मागोवा – एप्रील १९७४

असे नेते क्वचितच होतात. ज्या मातीत जन्म त्या मातीशी इमान राखणारे. अंबरासिग अशापैकी एक होता, सालदाराच मुलगा.
‘पाडळदा नावाच्या छोटयाशा गावात त्याने अक्षरे गिरवली. झोपडीत तो जन्माला आला ती आजही तशीच आहे. त्य़ाच्या आईने मजुरी करून त्याला भाकरी
देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वडिलांनी औताला जुंपून ‘घेतले. आणि त्याला शाळेत घातला. आईवडीलांनी त्याला शिकवण्यासाठी कष्टांची पराकाष्ठा केली. पण त्याचे शिशिण अपुरे राहिले, देशातल्या हजारोंची राहाते तसेच.
‘धडगावला सातपुडा सर्वोदय मंडळात भाऊ मुंदडांशी अंबरदादाचा संबंध आला. सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगात शासकीय औषध पुरवठा होणे शक्यच नव्हते.मंडळाने तो करायचे ठरवले, परकीय देशातील. भूतदयावादी संस्थांनी सातपुड्यातील गरीब आदिवासींना मदत दिली. गाडी होती. पण ड्रायव्हर नव्हता. अंबरदादा ड्रायव्हिंगचे शिक्षण घेऊन आपल्या गरीब बांधवांसाठी रात्री अपरात्री गाडी चालवली. वेळ पडताच सगळी कामे केली. मंडळाचे दुकान चालवले, कारकून म्हणून ऑफिसमध्ये काम केले, शाळेत शिकवले. मिळण्याऱ्या वेतनाचा विचार केला नाही. गरीबांची सेवा करणे हाच हेतू ठेवला.
अन्यायाचा प्रतिकार
पण त्याचा पिंड केवळ सेवेत रूजणारा नव्हता. धडगाव पहाडात होते.पहाडाखाली सपाट भुप्रदेशावर रहाणाऱ्या त्याच्या
भावांचे भयानक शोषण चालले होते. त्याच्या मायाबहिणीवरचे अत्याचार पिसाटत होते.
अन्यायांने पिळल्या जाणाऱ्या कष्टकरी गरोब जनतेच्या दुःखाचे टाहो धडगावला राहून स्वस्थपणे पहाणे रक्ताला मानवत नव्हते. हे रक्त तापणारे होते.
पाटीलवाडीचे गाजलेले रावणायन ह्याचवेळी घडले. अंबरसिंगवर वाटेल ते खोटेनाटे आरोप ठेवले गेले. चॅप्टर केसेस भरण्यात आल्या. डांबून ठेवण्यात आले. पोलीस कारवाया करण्यात आल्या. शासकीय दमनयंत्रणेचे किळसवाणे क्रूर दर्शन झाले. पाडळद्याच्या भिलाटीतील घरे अंबरसिंगने जाळली असा अत्यंत विपर्यस्त आरोपही करण्यात आला. काहीही करून नव्याने उदयास येत असलेले नेतृत्व सत्ताधारी राजकीय शक्तींना व येथील सधन शेतकऱ्यांना मुळातच खुडून काढायचे होते. पण अंबरसिंगामागे शेकडो गरीब जमा होत होते.
धडाक्यानं घेतलेल्या प्रचंड जाहीर सभा सधन शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करू लागल्या. खेड्यापाड्यातून पायी भटकत अंबरसिंगन आदिवासींच्या प्रश्नांचा अभ्यास केला. गोविंदराव शिंदे व इतर सर्वोदयी नेते ह्यांच्याबरोबर विचारविनिमय करून अनेक राजकीय पक्षांना एकत्र आणून बहात्तरच्या जानेवारीत आदिवासींचा प्रचंड भुमूक्ती मेळावा भरविण्यात आला आणि मेळाव्यानंतर शहरात वाढलेली, शिकलेली पण अस्वस्थ असलेली आम्ही तरुण अंबरसिंगला येऊन मिळालो. भूमुक्ती आंदोलन झपाट्यानं पुढे सरकले. पाच हजार एकर जमीन सावकारी पाशातून मुक्त झाली. भूमीहीन मजूरांचा प्रश्न हाती घेतला गेला. श्रमिक संघटना स्थापली गेली. सालदारांना सुट्टी मिळू लागली.फॉरेस्टच्या पडीत जमीनींवर सत्याग्रह झाले. तरुण मंडळे व समित्या नेमल्या. स्त्रियांची शिबीरे झाली. संघटनेच्या जोरावर चळवळ वाढू लागली. चळवळीचा पाया रोवणारा नेता आपल्या अंगभूत शक्तींनी विरोधी शक्तींना मेटाकूटीस आणू लागला.
चाकू जवळ ठेवा
सभेतून अंबरसिंगानी केलेली भाषणे हत्त्यारी भूषण होते. चार चार तास सतत, अस्खलितपणे, प्रभावी भाषेच्या टणत्काराने,श्रमिक जनतेला खिळवून ठेवणे, अंबरसिंगला नेहमीच साधले. अंबरदादाची सभा हा गरीबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. दादाच्या सभा हे श्रमिकांचे सण होते. सभा अशी सजायची, डफ वाजवून, मंडप घालून, तोरणे बांधून, गुलाल उधळून सभा रंगत असे. जनतेच्या गळ्यातील ताईत असा हा धडधाकट नेता जेव्हा भाषणास उभा राही तेव्हा त्याचे शब्द ऐकण्याकरता सगळे कानांत जीव आणून शांत बसत. शब्दांवर स्वार होऊन अंबरसिंग जेव्हा बोलायचा तेव्हा आसपासच्या हवेल्यांतून राहाणारे सधन शेतकरी चपापून जायचे. एकेक शब्द तीरासारखा सुटायचा. लक्ष्य घायाळ झालेच पाहिजे. त्याचा आवाज निनादत राह्यचा. गरीबीचे जिणे स्वतः जगलेले असल्यामुळे त्या जीवंत अनुभव हजारो श्राेत्यांचेही अनुभव असायचे. हिमत देताना अंबरसिंग म्हणे, जन्माला आले की कावळे, चिमण्याही जगतात. तुम्ही कुणाला घाबरता, ह्या रक्तपिपासूंना ? हे मजूरीला बोलावणार नाहीत म्हणून घाबरून लाचार होता? तसे असेल तर तुमची जिंदगी येथेच खतम् झाली पाहिजे. लाचारीने जगणाऱ्याला जगण्याचा हक्क नाही. उठा.. हक्कांसाठी लढा.
स्त्रियांवर होणारे अत्याचार अंबरसिंगला अस्वस्थ करीत असत. तो असा संतापून जात असे. एकदा स्त्रियांच्या शिबीरात हा बोलून गेला..
इंदिरा गांधीला संरक्षणासाठी बंदुकधारी सैनिक दिले जातात. तिची इतकी काळजी घेतली जाते. मग शेतात निंदणी करायला जाणारी, जंगलात मोळी आणायला गेलेली, बांधावर चारा आणायला गेलेली माझी बहीण अत्याचाराला बळी पडत असेल तर शासन काय करते ? शासन ह्यासाठी काही करणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. कारण ते शासन माझ्या गरीब बहिणीचे नाही. ते तिच्यासाठी नाही. म्हणून आयाबहिणीने, प्रत्येकाने आपल्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठी एक एक रामपूरी चाकू जवळ ठेवा. उपाशी राहून पैसे साठवा पण चाकू घेतल्याशिवाय राहू नका. हा चाकू तुमचे संरक्षण करेल. जो अत्याचार करेल त्याचा कोथळा बाहेर काढा..
अंबरसिंगच्या ह्या आदेशावर खूपच गहजब माजवला गेला. पण मी असे म्हटलेच नाही, अशी शरमिंदी लाचार माघार त्यानं घेतली नाही. चाकूच काय, चळवळ मोडून काढण्यासाठी येथे लष्कर आणण्याचा प्रयत्न कुणी केला तर आम्हालाही बंदुका ठेवाव्या लागतील. शांतता हा आमचा मार्ग आहे. पण शांततेचा भंग कुणी करेल आणि गरीबांचे आंदोलन दडपून टाकण्याचे कारस्थान कुणी आणेल तर ते आम्ही सर्वशक्तीनिशी ठोकरून लावू.
अंबरसिंग असाच एकदा कायद्यांसंबंधी बोलत होता, हे कसले कायदे आहेत? कुणी केले हे कायदे? गरीबांवर अन्याय करणारे हे कायदे आम्ही मानणे म्हणजे आमच्याच पायांवर आम्ही घाव घालण्यासारखे आहे. आमचा कायदा आमच्यातून निघायला पाहिजे. राष्ट्रपती कायदा करणारा कोण? त्याला आमच्या झोपडीतले दुःख कसे कळेल? इंदिरा गांधी निंदणी कधी करते का? मग निंदणी करणाऱ्यांसाठी ती कोण कायदा करणारी? निवडून गेलेल्या लोकांनी दिल्लीला वा मुंबईला बसून कायदे करणे आम्हाला पसंत नाही. जनतेचा कायदा जनतेतून आला पाहिजे. आम्हाला हवा असेल तो कायदा आम्हीयेथे करू. मुंबई – दिल्लीला कायदा करण्याचा अधिकार ह्या शासनाला दिलाच कुणी? आणि असा तिथे झालेला कायदा कोर्टात निकाल देण्यासाठी वापरणार. पण निकाल दिला म्हणजे न्याय मिळाला असे होत नाही. जनता कोर्टे असायला हवीत. अशा जनता कोर्टातच खरा न्याय गरीबांना मिळेल.
माणसे जोडण्याची कला
आदिवासींच्या व्यसनमुक्तीविषयी अंबरसिंग सारखा बोलत राह्यचा. जोपर्यन्त व्यसने सुटत नाहीत तोपर्यन्त संघटना पक्की होणार नाही, असे तो नेहमी म्हणायचा. रात्री भिलाटत घेतलेल्या सभातून, शहाद्याच्या ऑफिसवर भजने म्हणून झाल्यावर, एकेक विषय चर्चिला जायचा. जाहीर सभेत बोलायची आणि दहा पंधरा लोकांच्या बैठकीत बोलायची त्याची ढब वेगळी वेगळी होती. जाहीर सभेत सरकारी अधिकारी, सधन शेतकरी, अधिकारी ह्यांना अंबरसिंग उलटासुलटा घेत असे. तर बैठकीत, सरकार कसे असते? ते कुणाच्या बाजूचे आहे, आपण गरीब का आहोत, गरीबी हटवण्यासाठी काय केले पाहिजे, कष्टकऱ्यांचे राज्य कसे येईल, ह्याबाबत लोकांना समजावून देई. उदाहरणे देऊन अडाणी माणसाला शहाणे करणे, संघटनेसाठी माणसांना तयार करणे हा अंबरसिंगचा उपजत गुण होता. माणसे जोडण्याची कला अप्रतिम होती. खेड्यापाड्यातील तरुणांशी त्याचे प्रेमाचे संबंध असत. राजकीय पक्षाच्या नेत्यांशी तो अतिशय मुत्सद्दीपणे वागे. अन्याय करणाऱ्याशी गुळमुळीत भाषेत बोलणे त्याला बिलकूल जमत नसे. घे की हाण असे धोरण होते. शोषण आणि अत्याचार याचे वर्णन करून सांगताना त्याचा चेहरा लालबुंद होई. हाताचा पसरलेला पंजा पुढे फेकून थरकाप उडवणारी वाक्ये तो बोले तेव्हा समोरचा थक्क होई. आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना ह्याची वाणी अतिशय मृदू होई. संघटनेच्या कार्यकर्त्यांना सख्ख्या भावाप्रमाणे तो वागवे. कोणताही आणि कसलाही नवीन कार्यकर्ता कोठूनही आला तरी काही तासांतच अंबरदादाशी त्याची मैत्री होत असे. स्पष्ट बोललेले त्याला आवडत असे. कार्यकर्त्यावर तो कधीही रागावला नाही. लोकशाही कार्यपद्धतीवर त्याचा विश्वास होता. नेतेगिरी करून टेंभा मिरवणे हे त्याला कधीच जमले नाही. सभेत चौकारावर चौकार मारणारा हा गडी अनेकवेळा मीतभाषी होई, अबोल होई. पण एकदा खुलला की, मग हरत नसे.
स्वतःच्या संसाराची कटकट त्यानं निर्माण होऊ दिली नाही. बायकामुलांची काळजी वाहणे हा एक चळवळीचा भाग आहे, असे त्यानं ठरवले असावे. कारण व्यक्तीगत चिंतेने ग्रस्त झालेला तो कधीच दिसला नाही. त्यानं बायकोला कायमचे सांगून ठेवले होते, माझी चिंता करू नकोस. मी तळहातावर शीर घेऊन रणांगणात लढायला उतरलेला सैनिक आहे. माझ्यापासून सैनिकाची पत्नी करेल इतकीच अपेक्षा कर. अंबरसिंगाच्या पत्नीने त्याला ह्या लढ्यात वीरपत्नीसारखी साथ दिली.
उगवता सूर्य मावळला
धीरोदात्त, दिलदार, मोकळा, उमदा आणि तरुण असा हा कष्टकऱ्यांचा नेता २५ फेब्रूवारीला पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पीटलमध्ये शांत झाला. शहाद्याला त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील झाले होते. आसवे, हुंदके, आक्रोश, छाती बडवून रडणाऱ्या आयाबहिणी, बाहीनं डोळे पुसणारी तरुण पोरं, फाटके, मळके कपडे घातलेले म्हातारे कोतारे, दादा..दादा असे ओरडत दुःखाने व्याकूळ झालेली चिमुकली. भील्ल,पावरा,कोळी, हरीजन, मराठा आणि गरीब गुजरसुद्धा.. हुंदक्यांतून शब्द फुटत होते, गरीबांचा वाली गेला. पण ही अंत्ययात्रा राजकीय पुढाऱ्याची नव्हती. कष्टकऱ्यांच्या राजकीय चतूर नेत्याची होती. त्याची अंत्ययात्रा त्याला शोभेल अशीच होती. अंत्ययात्रेत बायाबापड्या त्याच्या मृतदेहाला बजावून सांगत होत्या, सबके दिलमे अंबर है.. दादा तू गेलास तरी ही चळवळ कधी थांबणार नाही..आमच्या प्रत्येकात तू आहेस. कष्टकऱ्यांचे राज्य आणण्याचे तुझे स्वप्न पुरे करीपर्यन्त आता विश्रांती नाही. तू गेलास आमच्यासाठी, आम्ही झगडू तुझ्या ध्येयासाठी. चळवळ न थांबवण्याच्या घोषणा देत आपल्या नेत्याला अंतिम निरोप देणारी ही जनता नेत्याच्या समर्थ नेतृत्वाची साक्ष देत राहील.
अंबरदादा, तू गेलास चळवळीला नवी दिशा देऊन, नवा जोम देऊन. कायदेभंग करायला सांगून तू गेलास. जेव्हा हवा होतास तेव्हाच तू नाहीस. आंदोलनाला दडपून टाकण्याचे विरोधकांचे मनसूबे आकार घेत असताना तुझ्या प्रभावी फटक्यांनी त्यांना फटकरायला तू हवा होतास. कष्टकऱ्यांची संघटीत शक्ती चिरडण्याच्या पोकळ वल्गनांची विल्हेवाट लावायला तू हवा होतास. शोषणकर्त्यांच्या कावेबाज झुंडशाहीला नामोहरम करणारी ही जनता तुझ्या नावाचा जयजयकार करत अफाट उत्साहाने बेहोश झालेली पहाण्यासाठी तू हवा होतास. तू गेलास तरी जनता तसे मानावयास तयारच नाही. तू सांगायचास की, प्रत्येक झोपडीत अंबरसिंग झाला पाहिजे म्हणून. तसेच घडत आहे. तू तापवलेली मूठ कष्टकऱ्यांच्या विरोधी शक्तीचा चूराडा केल्याशिवाय राहाणार नाही. तू बांधलेली संघटना असंख्य अश्रापांना जीवन देणारी आहे. सगळ्या जमीनीची मुक्ती झाल्याशिवाय इथल्या जनतेला स्वस्थ बसणे शक्य नाही. तू निधनानंतर मोठा झाला नाहीस, जिवंत असतानाच तू मोठा होतास. मातीला जागणारा होतास. म्हणूनच तू अमर आहेस. जोवर ही महान कष्टकरी जनता लढते आहे व तुझ्या मार्गावर वाटचाल करत आहे तोवर, व त्यानंतर हिचे राज्य आल्यावरही, तू तिच्यामध्ये राहाशील.

0Shares

Related post

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत कांबळे करतांना दिसत आहेत.

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत…

सध्या भारतीय वेब विश्वात धमाकेदार प्रयोग होतांना दिसताहेत. एका बाजुला हिंदी इंडस्ट्रीतल्या मात्तब्बर निर्मात्यांच्या बिग बजेट…
स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *