• 280
  • 1 minute read

अमित शहा-एकनाथ शिंदेच्या संभाषणातून उघड:

अमित शहा-एकनाथ शिंदेच्या संभाषणातून उघड:

निवडणूक आयोग,न्याय व्यवस्था संविधानुसार नाहीतर भाजपच्या दबावापोटी निर्णय देतात..!

         राष्ट्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना व सेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना बेकायदेशीर रित्या दिल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ शिवसेना ही शिंदेंची, हे कायदेशीर दृष्ट्या सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला.तर यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात अद्याप ही सुनावणी सुरू आहे. पण याच काळात लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. शिवसेना शिंदे गट धनुष्य बाण याच चिन्हावर निवडणूक लढला. उपलब्ध कागद पत्र तपासून , ज्येष्ठ वकिलांचे ऑर्ग्युमेंट ऐकून ही सर्वोच्च न्यायालयाला गेल्या तीन वर्षात निर्णय घेता आला नाही. यामुळे न्यायालयाची कार्य पद्धती, विश्वासहर्ता व न्याय व्यवस्था संविधानाची संरक्षक आहे, यावरच प्रश्न चिन्ह उभी राहिली आहेत. शिवसेनेची हीच कागदपत्रे बघून निवडणूक आयोगाने अतिशय तातडीने शिवसेना हे नाव व चिन्ह शिंदेंना देवून टाकले. न्यायालय व निवडणूक आयोग या दोन्ही संवैधानिक संस्था असून दोन्ही भारतीय संविधानानुसार चालतात. मग कार्य पद्धतीत हा फरक व विसंगती का ? तर याचे उत्तर आहे या दोन्ही व्यवस्था संविधानानुसार चालत नाहीत, तर संघ, भाजपच्या इशाऱ्यावर चालतात. हे सांगण्यासाठी आता घटनातज्ञ अथवा राजकीय अभ्यासकांची गरज उरलेली नाही. सर्वांना सर्व माहित आहे.
        शिवसेना नाव व चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय व न्यायालयाकडून यासंदर्भात होत असलेला वेळ काढूपणा याची उलटसुलट चर्चा देशभर सुरू असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदेसोबतच्या एका संभाषणात शिंदेला स्पष्टपणे सांगितले की, तुमचा पक्षच आम्ही स्थापन केला आहे. याचा अर्थ सरळ आहे की, निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या दबावापोटी शिंदेंना शिवसेना हे नाव व चिन्ह दिले आहे. हे करताना घटनाबाह्य जे जे करता येईल ते ते सर्व करण्यात आले असून यामुळे संघाचे व भाजपचे चारित्र , चरित्र व संविधान विरोधी भूमिका स्पष्टपणे समोर आली आहे. तसेच हे सारे करताना व त्या विषयी जाहीरपणे बोलताना संघ, भाजपच्या नेत्यांना, गृहमंत्रीपदासारख्या महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्तीला कसली लाज ही वाटत नाही, हा इतका बेशमपणा केवळ रेशीम बागेतील शिक्षणातूनच मिळू शकतो. हे ही अमित शहा यांच्या शिंदेसोबतच्या या संभाषणातून स्पष्ट होत आहे. हे संभाषण पहाटे ४.०० वाजताचे आहे. भाजप व शिंदे रात्री आणि पहाटेच्या अंधारातच कृष्णकृत्य करीत आलेले आहेत.
           २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लढणे धोक्याचे असल्याने तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढण्याची सावध भुमिका भाजपने घेतली. अन् अभूतपूर्व यश मिळविले. हे यश मतांच्या चोरीमुळे मिळाले असले तरी त्याचे दावेदार आपण आहोत, असा समज एकनाथ शिंदे यांचा आहे. तर निवडणुकीनंतर शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असे आश्वासन ही भाजपने शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढविताना अप्रत्यक्षपणे राज्यातील जनतेला व शिंदेंना दिले होते. पण २८८ पैकी १३२ जागा जिंकल्यानंतर भाजपने २०१९ प्रमाणे पलटी मारत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना ज्या फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास नव्हता त्यांनाच मुख्यमंत्री बनविले . तेव्हापासून शिंदे नाराज आहेत. पण ते काही ही करू शकत नाहीत. भाजपला आज त्यांची गरज ही नाही. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून बहुमतासाठी भाजपला केवळ आता १३ आमदारांची गरज असून शिंदेच्या शिवसेनेतील अनेक आमदार भाजप प्रवेशासाठी गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलेले आहेत. काही आमदार तर भाजपने शिंदेच्या कोट्यातून निवडून आणले आहेत. हे वास्तव शिंदेंना माहित आहे. थोडक्यात राज्यातील सत्ता मिळविण्यासाठी भाजपने शिंदेंचा जसा वापर केला, तसाच वापर भाजप आपल्या पक्षातील नेत्यांचा करू शकतो, हे ही शिंदेला चांगलेच माहित आहे. त्यामुळे ते रूसतात, फुगतात व लगेच नीट ही होतात.
         
तुमचा पक्ष आम्हीच स्थापन केलाय ; अमित शहाची शिंदेंना धमकी…!
 
         मराठीत एक म्हण आहे…. तोंड दाबून बुक्यांचा मार. आज शिंदे हा मार खात आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते मुख्यमंत्री असले तरी अधिकार नाहीत. त्याशिवाय त्यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. या प्रकरणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे सरळ तक्रार केली. NDTV, मराठीने अमित शहा व एकनाथ शिंदे यांच्यातील संभाषणाची एक क्लिप नुकतीच वायलर केली आहे. त्यात शिंदे अमित शहा यांना आपण नाराज असल्याचे सांगतात. त्यावर शिंदे म्हणतात मी देवेंद्रशी बोलतो. पुढे शिंदे म्हणतात की, विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही मला आश्वासन दिले होते की, मुख्यमंत्री तुम्हीच असाल, मग त्या आश्वासनांचे काय झाले ? त्यावर शहा म्हणतात, आमचे जास्त आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री आमचाच. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे असेल तर अगोदर भाजपामध्ये सामिल व्हा. पक्षाबाहेरच्या कुणाला ही आम्ही मुख्यमंत्री करणार नाही. त्यावर शिंदे म्हणतात, मग आमच्या पक्षाचे काय ? तेव्हा अमित शहा म्हणतात…. तो पक्षच आम्ही स्थापन केलेला आहे. या संभाषणातून हे स्पष्ट होत आहे की, राज्यातील सत्ता मिळविण्यासाठी भाजपने शिवसेना तोडली. दोन गट पाडले. शिंदेच्या गटाला निवडणूक आयोगावर दबाव टाकून बेकायदेशीर रित्या अधिकृत ठरविले. नाव व चिन्ह शिंदेला दिले.
       हे वायलर संभाषण फेक नाही. नसणार. कारण ते अदानीची मालकी असलेल्या NDTV ने वायलर केले आहे. भाजपकडे माज ही आहे. तो माज दाखवून आपल्या मित्र पक्षांना गप्प करण्यासाठी गोदी मिडियाचा वापर ही भाजप करीत आहे. ईडी, सीबीआय करवी चौकशीच्या नोटीसा देवून भाजपने ज्यांना आपल्या सोबत घेतले आहे, त्यांच्यावर या चौकशीची टांगती तलवार आज ही आहेच. शिंदेच काय जे जे जेलमध्ये जाण्याच्या भितीने भाजपसोबत गेले आहेत, त्यातील कुणीच भाजपला सोडू शकत नाही. सोडले की नोटीसा अन् जेल आहेच. मग जेल पेक्षा काटेरी असला तरी सत्तेचा मुकुट बरा. हे धोरण शिंदे व त्याच्या सारख्या अनेकांनी स्वीकारले आहे.
           ” शत प्रतिशत भाजप” हा सत्तेसाठी भाजपने दिलेला नारा आहे. महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा व आशीर्वादाने राज्यातील सत्तेत सहभागी होत असताना ही भाजप हा नारा देत आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावीत होते. खुद्द बाळासाहेब ठाकरे व अन्य सेना नेत्यांना हा भाजपचा डाव कधीच कळला नाही. दर पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने अधिक जागा पदरात पाडून घेतल्या व निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या ही वाढती ठेवली. नेमकी या विरुद्ध स्थिती सेनेची राहिली आहे. हाती असलेल्या जागा कमी कमी होत गेल्या व निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या ही घटत गेली. अन् आज तो दिवस आलाय की भाजपला सेनेची गरज उरली नाही. शिंदे सेनेची ही नाही. अजित पवार यांच्यावर ही वेळ येणार आहेच. शिंदे जात्यात आहेत, तर शिंदे सुपात…!
 
 …………………
 
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *