- 51
- 1 minute read
आज बाबासाहेब आंबेडकर असते तर…?
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अचानक बाळासाहेब आंबेडकर यांनी ‘वंचित आघाडी’च्या तिसऱ्या उमेदवार यादीची घोषणा करुन आपण स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने त्याचा फायदा फायदा भाजपाला होणार हे स्पष्ट आहे.यातून वंचितांना ‘मविआ’च्या पराभवाचे आत्मिक समाधाना मिळण्याव्यतिरिक्त कोणता फायदा होणार आहे? कारण बाळासाहेबांसहीत वंचितचे सर्व उमेदवार ‘मविआ’ची मते मिळविल्याशिवाय निवडून येऊ शकत नाहीत.दोन निवडणुकांत पाडण्याची प्रक्रिया झाली.आता किमान काही निवडून आले पाहिजेत की नाही?
कुणाला पटो ना पटो बाळासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र,स्वावलंबी राजकारण आहे;जे दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर अन्य दलित नेत्यांना जमले नाही.बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या नेतृत्वाची दखल घ्यायला भाग पाडले,हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.केवळ भावनिक प्रश्नांच्या मागे न जाता शेतीपासून विद्यार्थांच्या शिष्यवृत्त्या,मागास महामंडळांचा कारभार..अशा अनेक प्रश्नांना हात घालून त्यांनी व्यापक जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न केला,हे खरेच.मुद्दा या जनाधाराचे पुढे काय झाले,हा आहे?
१९८२ साली वकिली व्यवसायातून बाजूला जाऊन त्यांनी ‘भारतीय बौध्द महासभा’ ‘,सम्यक समाज आंदोलन’ अशी पारंपारिक सुरुवात करुन ओबीसी,बहुजन राजकारणाला हात घातला.
१९८४ साली भारतीय रिपब्लिकन पक्ष ‘भारिप’ची स्थापना करताना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाचीच संकल्पना त्यांच्या डोक्यात होती परंतु अवघ्या ९ वर्षांच्या काळातच त्यांनी ‘बहुजन महासंघा’ची स्थापना करीत ‘माधव’ अर्थात माळी, धनगर,वंजारी यांची यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला.त्यात त्यांना अल्प यश आले.अलिकडे ‘वचित’ च्या माध्यमातून त्यांनी अनु.जाती,अनु.जमाती,हिंदू ओबीसी, भटके-विमुक्त,बौध्द, मुस्लिम…यांचे संघटन उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिका व्यापक असतात,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारणाची त्यांना उत्तम माहिती आहे.त्याचप्रमाणे देशातील व महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची नस त्यांना चांगली समजते;हे सर्व खरे आहेच,पण मुद्दा वंचित समूह सत्तेच्या पायऱ्या चढत असताना निर्णायक क्षणी बाळासाहेबांचे निर्णय का बदलतात? थोडक्यात बाळासाहेब मोठ्या मेहनतीने इमारत उभी करतात इमारतीचा शेवटचा मजला पूर्ण होतानाच तळाला खालून सुरुंग लावतात.असे का होते?कोण घडवतो हे?हा त्यांचा वैयक्तिक स्वभाव आहे की,त्यांचे हितसंबंध यावर माध्यमांत चर्चा होतात/ राहतील.
बाळासाहेब आंबेडकरांवर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप खोटा ठरवला तरी प्रश्न उरतो तो हा की तीन नंबरची मते घेऊन,’मविआ’ चे १२ उमेदवार पाडून वंचितांचा फायदा आहे की,पाच उमेदवार निवडून येऊन?
यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात..
१)बाळासाहेब आंबेडकरांनी २७ ठिकाणी आम्ही तयारी करत आहोत व त्यातील दहा मतदारसंघात ते निवडून येतील असे सांगितले. ‘मविआ’ त्यांना ५ जागा द्यायला तयार झाली.तशा मुलाखतीपण दिल्या गेल्या.आंबेडकरांनी ‘मविआ’ ने मान्य केलेल्या या ५ जागानुसार या या ठिकाणच्या ५, जागांवर उमेदवार देऊन उर्वरित ठिकाणी आम्ही ‘मविआ’ ला पाठींबा देऊ असे परस्पर जाहिर केले असते तर ‘मविआ’ वर दबाव आला असता व कुणालाही संभ्रम पसरवायला संधीच मिळाली नसती.तुमची भांडणे चालू द्या या जागांवर तडजोड नाही,असेही त्यांना सांगता आले असते.पण तसे झाले नाही व संभ्रम निर्माण झाला व होत आहे.
२) आरेसेसला बाळासाहेबांनी प्रस्ताव दिला तो बहुजन महासंघाचाच जूना प्रस्ताव आहे.बहुजन महासंघाने बहुजनातील शंकराचार्य करण्याचा प्रस्ताव दिला होता.आता बहुजन पुजारी करण्याची वंचितची मागणी आहे.पण यातून धार्मिक, मानसिक शोषण करणारी पुरोहीत ही संस्था तशीच राहणार असून ब्राह्मणांच्या जागी फक्त बहुजन पुरोहीत होतील इतकेच!
३) बाळासाहेब आंबेडकरांनी तिसरी यादी प्रसिद्ध केली असून त्यातील बरेचसे उमेदवार वंचित च्या व्याख्येत बसणारे नाहीत.उदा.पुण्यातील वसंत मोरे या माजी मनसैनिकाला वंचित कसे म्हणता येईल? हे महाशय दीर्घकाळ मनसेत नगरसेवक होते.आता त्यांना लोकसभा लढवायची आहे.मनसेने तिकीट द्यायला नकार दिल्यावर ते काॅंग्रेस,राष्ट्रवादी,उबाठा शिवसेना अशी वारी करीत ‘वंचित’ मध्ये आले व त्यांची उमेदवारी जाहिर झाली.यामध्ये कोणता निकष लावण्यात आला? मग दीर्घकाळ तिष्ठत बसलेल्या निष्ठावान वंचितांचे काय? पुण्यात वसंत साळवे,म.ना.कांबळे,वैशाली चांदणे….असे कितीतरी वंचित प्रतिक्षेत आहेत,त्यांच्यावर हा अन्याय नाही का? खरे उमेदवार आयात करण्याची प्रस्थापितांची संस्कृती नष्ट करुन वंचितांची सत्ता आणण्याचा दावा करत असताना उमेदवारी देताना मात्र आपण प्रस्थापितांचेच अनुकरण करत नाही ना?
५) बाळासाहेब यांच्याबद्दल महाराष्ट्रभर जी कुजबूज चालू असते,ती म्हणजे त्यांच्या अवतीभोवती असणारी मंडळी.हीच मंडळी निर्णायक क्षणी त्यांचा घात करत असावेत,अशी गल्लीबोळातील कार्यकर्ते कुजबूज करतात.
बाळासाहेब आंबेडकर जसे संजय राऊतांमुळे चर्चा यशस्वी झाली नाही असा आरोप करत असतील तर हेच त्यांनाही लागू होते.त्यांनी आपल्या आजूबाजूच्या मंडळींमुळे चर्चेत व्यत्यय आला काय याचा विचार करावा.
६) गेल्या काही महिन्यांतील बाळासाहेबांच्या भाषणांत त्यांनी मोदी,आरेसेसवर घणाघात केला.ते म्हणाले,आम्ही सत्तेवर आलो तर मोदी,शहा,भागवत यांना तुरुंगात टाकू.त्यांच्या वक्तव्यावर कितीतरी टाळ्या पडल्या आहेत.आता त्याचे काय करायचे?
७) ओबीसींच्या ताटातले न घेता मराठ्यांना वेगळे ताट देता येणे शक्य आहे.आम्ही सत्तेवर आल्यावर त्याची व्यवस्था करु,हा त्यांचा या दोन्ही समूहांत निर्माण झालेल्या आशावादाचे काय करायचे?
८) इंडिया आघाडी हरली व बाळासाहेब पडले तर त्यांनी गेल्या काही महिन्यांत जी आश्वासने दिली त्यांचे काय करणार?
९) शेवटी,
आज बाबासाहेब असते तर या प्रश्नाला तसे महत्व नाही,पण जर असते तर….?
घटना समितीत जाताना बाबासाहेब आंबेडकरांनी काॅंग्रेसशी असलेले मतभेद सोडून दिले नव्हते,बाजूला ठेवले होते.कारण त्यांच्या दृष्टीने संविधान निर्माणाची जबाबदारी काॅंग्रेसची नाही तरआपली आहे,असे त्यांनी मानले होते.आज संविधान वाचविण्याची जबाबदारी बाळासाहेब काॅंग्रेसवर किंवा ‘मविआ’वर कशी सोपवू शकतात?
१०) बाळासाहेब आंबेडकरांच्या एका पुस्तकाचे शीर्षकच’आंबेडकरी चळवळ संपली आहे’असे होते.आरपीआयच्या एकजातीय नेत्यांना उद्देशून त्यांनी असे म्हटले होते.आज त्यांच्याकडे अपेक्षेने बघणारे वंचित पुन्हा मोदी सत्तेवर आले तर बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ संपली आहे’ असे पुस्तक लिहितील काय?
– महादेव खुडे
(नाशिक)