- 25
- 1 minute read
ईव्हीएम जोरावर !
जानेवारीची २२ तारीख जशी जशी जवळ येत आहे, तसं तसं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाची चर्चा एका बाजूला वाढत असताना, दुसऱ्या बाजूला हिंदू धर्माचे प्रमुख धर्मगुरू शंकराचार्य यांच्याकडून विरोधाची तीव्रता वाढत आहे. अशातच भारतीय जनता पक्ष हा राम मंदिर उभारणीचा श्रेय घेण्यासाठी अधिकाधिक राजकारण करीत असल्याचा आरोप होत असताना, तिकडे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे ईव्हीएम मशीनच्या विरोधात, गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठे आंदोलन उभारण्यात आले आहे. ऍड. भानु प्रताप सिंग आणि ऍड. मेहमूद प्राचा यांच्या नेतृत्वात उभे राहिलेले हे आंदोलन, आता देशभरात पसरते आहे. या आंदोलनात अमेरिकेहून आलेल्या एका इंजिनीयरने ज्या पद्धतीने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चा डेमो दाखवला ते पाहता सत्ताधारी पक्ष देखील हादरल्याचे जाणवते आहे. कारण, जंतर-मंतरवरील आंदोलकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याच्या दरम्यानचा दाखवलेला डेमो यानंतर थेट निवडणूक आयोगाला देखील आता जनतेमध्ये ईव्हीएम घेऊन उतरावे लागले आहे. याचाच अर्थ जंतर-मंतरवर झालेला डेमो हा निवडणूक आयोगाला इतका जिव्हारी बसला आहे की, त्यांनी आतापर्यंत विरोधी पक्षांनी वेळ मागूनही वेळ देण्याचे टाळाटाळ केले असताना, जंतरमंतरच्या आंदोलनानंतर मात्र त्यांनी लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली. अर्थात, ही भूमिका घेण्यासाठी केंद्र सरकारनेच त्यांना बाध्य केलेले असावे. देशामध्ये ईव्हीएम वापरात आल्यापासून संशय व्यक्त केला जात आहे! परंतु, गेल्या दहा वर्षात या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, ही वाढ आता एवढी मोठी झाली आहे की, कदाचित २२ जानेवारी नंतर या देशांमध्ये एक मोठे जण आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही! सध्या ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यामागे जी काही कारणे आहेत, त्यातील एक कारण हे देखील आहे की, आज पर्यंत भारताच्या राजकीय निवडणुकांमध्ये ज्या ज्या वेळी मतदानाची टक्केवारी वाढली, त्या त्या वेळी सत्ताधारी पक्षांच्या विरोधातच मतदान गेल्याचा अनुभव आणि इतिहास आहे. परंतु, नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका संपन्न झाल्या. त्यामध्ये मध्यप्रदेश सारख्या राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी ही मोठ्या प्रमाणात वाढली. मतदानाची टक्केवारी वाढलेली असताना सगळ्यांची खात्री झाली की, सत्ताधारी असणारे शिवराज चव्हाण सरकार हे निश्चितपणे कोसळेल! म्हणजे भाजपाचे सरकार कोसळेल! परंतु, प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये सत्तेवर आला; आणि इथूनच ईव्हीएम च्या संशयावर अधिक जनमत एकत्र झाले. कारण, आधुनिक जगाच्या इतिहासात राजकीय निवडणुका जगामध्ये कोणत्याही देशात असल्या तरी, त्या निवडणुकांमध्ये, ज्या ज्या वेळी मतदानाची टक्केवारी वाढते, त्या त्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातच ते मतदान जात असते. देशातील राजकीय विश्लेषक देखील मानतात. देशात आता मिस कॉल मोहीम आणि प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होण्याची एक रणनीती आखण्यात आली असून, लवकरच प्रत्यक्षात लोकांमध्ये हे आंदोलन सुरू होईल. आता एका बाजूला राम मंदिराचा वातावरणाचा भाग, दुसऱ्या बाजूला जिथे राम मंदिर उभे राहते आहे, त्यापासून अवघ्या २५ किलोमीटरवर भारतातील सर्वात मोठी मशीद उभी राहण्याचे प्रस्तावित आहे. तिसऱ्या बाजूला ईव्हीएम आंदोलन आहे. अशा या वातावरणात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी वक्तव्य केले. त्यांच्या मते आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पक्ष असेल. पण, सत्तेवर येण्या इतपत त्यांना पाठबळ मिळणार नाही, असे वक्तव्य करून त्यांनी एकंदरीत राजकीय खळबळ उडविली आहे.अर्थात राजकारणामध्ये अशा प्रकारची वक्तव्य होत असली तरी राजकारणात दीर्घकाळ मुरलेले नेते, जेव्हा अशा प्रकारचे विधाने करतात तेव्हा त्यात गांभीर्य निश्चितपणे असते, असा आजपर्यंतचा राहिला आहे.
-सीव्हीएस