खाजगी, विना अनुदानित शाळा व विद्यापीठातील आरक्षण रद्द करण्याचा केंद्र व भाजप शासित राज्यांचा धोरणात्मक कार्यक्रम…!

खाजगी, विना अनुदानित शाळा व विद्यापीठातील आरक्षण रद्द करण्याचा केंद्र व भाजप शासित राज्यांचा धोरणात्मक कार्यक्रम…!

मविआ आघाडीतील नेत्यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी…!!

 
                     राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप अन संघाच्या परिवारातील  शेकडाभर संघटना हिंदूच असणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी अन भटक्या, विमुक्त जातींना मिळणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात का आहेत ? हा प्रश्न इथल्या ब्राह्मण वगळता अन्य जाती समूहांना पडेल अन त्याबाबत त्यांना काही कळेल,वळेल, तेव्हा हा देश खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गांवर असेल.
    ब्राह्मणी जाती व्यवस्थेच्या रहाटगाडग्यात खितपत पडलेल्या या जातींना आरक्षण देवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे तर या हिंदुत्ववाद्यांचे महानायकच ठरायला हवेत. पण उलटेच घडत आहे. संघ, भाजप ज्या हिंदू राष्ट्रा विषयी बोलत आहेत, ते खरे हिंदू राष्ट्र नाही.तर ते ब्राह्मणी राष्ट्राविषयी बोलतात. अन ब्राह्मणी राष्ट्रात या बहुजनांना सन्मानाने जगण्याचा अधिकार, हक्क नाही. तो अधिकार, हक्क संविधान व आरक्षण देते म्हणून या धर्मांध ब्राह्मणी शक्तींचा संविधान व आरक्षण व्यवस्थेला विरोध आहे. संसदीय मार्गाने आरक्षण रद्द करता येत नाही, येणार नाही, हे संघ, भाजपला माहित असल्याने केंद्रीय सरकार व भाजपशासित राज्यात खाजगीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व भटक्या – विमुक्त समाजाला मिळणारे आरक्षण संपविण्याचा धोरणत्मक कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी शक्य असेल तर संसदीय राजकारणाच्या चौकटीतच कायदे ही केले जात आहेत. 
                  ब्राह्मणी व्यवस्था अनेक धर्म ग्रन्थ अन पुरणे याच्या आडोशाने, आधारावर उभी आहे. पण ते कालवाह्य वाटतात. या धर्मांध शक्तीच्या दृष्टीने ही ते कालबाह्यच ठरले आहेत. आता त्यांचा धर्म ग्रन्थ हा गोलवळकर लिखित ” Banch of thought ” हे पुस्तक असून तोच आता या ब्राह्मणी राष्ट्राचा अजेंडा आहे. त्यातच शिक्षणाच्या भगव्याकरणाचा कार्यक्रम आहे. बहुजनांना मिळत असलेल्या शिक्षणावर हमला आहे. त्याच आधाराने आज ब्राह्मणी व्यवस्थेने देशाच्या सत्तेची सूत्र हातात आल्यावर पहिला हमला शिक्षण व्यवस्थेवर केलेला आहे. शिक्षणच नसेल तर आरक्षण काहीच कामाचे राहत नाही. आता लाडकी बहिण, लाडका भाऊ यासारख्या रेवड्या योजनांच्या गाजावाज्यात वंचित, बहुजन समाज घटकांना शिक्षण व नोकऱ्यापासून वंचित करणारे कायदे भाजपशासित राज्यात केले जात आहेत. महाराष्ट्रात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात खाजगी विद्यापीठातील आरक्षण रद्द करण्याचे विधेयक विरोधकांच्या संगनमताने म्हणजे सर्व पक्षीय आमदारांच्या संगनमताने मंजूर करण्यात आले. या आमदारांममध्ये एससी, एसटी, ओबीसी आमदार ही होते. विशेष म्हणजे अनुसूचित जाती, जमातीच्या राखीव जागावरून निवडून आलेले सर्व पक्षीय 54 आमदार विधानसभेत आहेत. पण या विधेयकाचा विरोध करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. इतके ते स्वतः विद्यमान राजकीय सत्तेच्या राजकारणातील गुलाम झाले आहेत.
          तसेच या विधेयकाच्या मंजूरीनंतर ओबीसी विद्यार्थ्यांचे ही आरक्षण रद्द होणार आहे. मात्र ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी एल्गार परिषदा घेवून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या ओबीसी नेत्यांना या विधेयकांचा गंघ ही नाही. आपल्या स्वतःचे राजकारण व राजकीय अस्थित्व कायम टिकविण्यासाठी दलित, ओबीसी व बहुजनवादी पक्षांचे नेते केवळ दिखावटी आंदोलन करतात. खाजगीकरणाच्या आडून शिक्षण व नोकऱ्यातील आरक्षण काढून घेतले जात आहे, पण याबद्दल हे बहुजनवादी नेते बोलायला तयार होत नाहीत,कारण ते याच विद्यमान सत्तेचे या त्या प्रकारे लाभार्थी आहेत. तर ते बोलणार कसे ? त्याशिवाय खाजगी अन विना अनुदानित शाळांमधील आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश ही राज्यातील भाजप सरकारने राज्यपाल बैस यांना हाताशी धरून काढला. पण मा. उच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली आहे. ही त्यातल्या त्यात बहुजन वर्गाला दिलासा देणारी गोष्ट आहे. या  अध्यादेशाला स्थगिती मिळाली नसती तर प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागले असते. राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा इतका खेळखंडोबा सुरु असताना विरोधी पक्षात कशी शांतता नांदत आहे. हे फारच आश्चर्यकारक आहे. हे पाहून असे वाटते की, हा संगनमताचा कार्यक्रम आहे.
           2014 साली मोदी सत्तेवर येईपर्यंत अनुसूचित जाती,, जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जातींना प्राथमिक व माध्यमिक स्तरावर मिळणारी शिष्यवृत्ती एकदम वेळेवर मिळत होती. मात्र मोदी सत्तेवर येताच पहिल्यांदा ही शिष्यवृत्ती बंद केली गेली. या विरुद्ध ना विरोधकांनी आवाज उठविला, ना जे लाभार्थी होते, ते समाज घटक या विरोधात उभे राहिले. मग विद्यापीठाकडे मोर्चा वळविला गेला. रोहित वे्मुला प्रकरण यातूनच घडले. त्याचा बळी गेला. पण लाभार्थी समाज घटक सरकारला जाब विचारत रस्त्यावर उतरला नाही. रस्ते,सडका जाम झाल्या नाहीत. मोर्चे आंदोलने झाले नाहीत. रोहितच्या बलिदानाचा वापर मात्र काही दलित, वंचित, बहुजनवादी नेत्यांनी जरूर केला. पण हेतू खुपच वयक्तिक होता. शिक्षण व नोकऱ्यातील आरक्षण वाचविण्यासाठी लढणाऱ्या अनेक संघटना आहेत. पण निवेदने देण्या पलिकडे ते काहीच करीत नाहीत. शिवाय या संघटनाचे कर्तेच शासनाचे या ना त्या प्रकारे लाभार्थी आहेत. त्यामुळे त्यांच्या लढण्याला व लढ्याला मर्यादा आहेत.
            अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती व आर्थिक मागास समाजातील विद्यार्थांसाठी उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य बार्टी, टार्टी, महाज्योती, सारथी या संस्थाच्या माध्यमातून केले जाते. अन साऱ्या संस्था समाजकल्याण मंत्रालयाच्या अधीन आहेत. पण बजेटमध्ये या मंत्रालयाला पुरेसे बजेट दिले जात नाही. जे काही मिळते, ते ही इतर योजनासाठी वळविले व पळविले जाते. ही वस्तुस्थिती आहे. याचा फटका संशोधक विद्यार्थ्यांना बसत आहे. गेली तीन वर्ष हे विद्यार्थी महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहेत. मात्र सरकार त्यांची दखल घेत नाही. शिक्षण घेण्यासाठी मिळत असलेल्या थोड्याशा अर्थ सहाय्याच्या मदतीने बहुजन समाजातील विद्यार्थी शिकून विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर शिक्षणाचे भगवेकरण करीत या समाज घटकाला शिक्षणापासून वंचित करण्याचा धोरणत्मक कार्यक्रम भाजप सरकारे राबवित आहेत. हे केवळ भाजपशासित राज्यातच घडते आहे, असे नाही. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये ही हिच परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापना होण्या अगोदर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारच्या वेळी ही अशीच परिस्थिती होती. तरी ही निवेदने, मोर्चे, आंदोलने करून काही मिळेल, अशी आशा मविआ सरकारकडून होती. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून तर ती ही वाटत नाही.
           शिक्षणाचे भगवेकरण, बाजरीकरण, खाजगीकरणामुळे    आरक्षण हे केवळ कागदपत्री राहणार आहे. आरक्षण हवे तर घ्या. पण आरक्षण मिळू शकते, अशी कुठलीच व्यवस्था शिल्लक ठेवायची नाही, हे केंद्रातील व भाजप शासित राज्यांतील सरकारने ठरविले आहे. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. खाजगी विद्यापीठातील आरक्षण रद्द करण्याचे विद्येयक मंजूर करून खाजगी व विना अनुदान शाळांमधील 25 % आरक्षणाचा कोटा रद्द करण्याचा अद्यादेश आणून राज्यातील भाजप सरकारने आपला इरादा जाहीर केला आहे. बहुजन वर्गाला शिक्षणापासून वंचित करण्याचा हा अजेंडा आहे. आता काय करायचे हे या बहुजन समाजाने ठरविले पाहिजे. सरकारच्या विरोधातील लढ्याची तयारी तर केलीच पाहिजे. पण हे कायदे मंजूर होत असताना राखीव जागावरून निवडून गेलेले सर्वपक्षीय 54 आमदार काय करीत होते ? याचा जाब ही त्यांना विचारला पाहिजे.
         तसेच या संदर्भात राज्यातील मविआची नेमकी भुमिका काय आहे ? हे विधेयक मंजूर होत असताना मविआचे आमदार गप्प का होते ? शिक्षणाचे भगवेकरण, बाजारीकरण, खाजगीकरण अन विना अनुदानित शाळांमधील आरक्षण रद्द करण्याबाबत सरकारच्या भूमिकेशी मविआ सहमत आहे की विरोधात ? यावर मविआमधील घटक पक्ष व त्यांच्या नेतृत्वाला ही जाब विचारलाच पाहिजे. लाख मोलाचे मतं आपण त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिले आहे, ते भाजपसारख्या धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी दिले आहे. भाजपसोबत संगनमत करून बहुजनांचे वाटोळे करून घेण्यासाठी दिलेले नाही. शैक्षणिक आरक्षण वाचले तरच नोकऱ्यातील आरक्षणाला महत्त्व आहे. त्यामुळे हे शैक्षणिक आरक्षण वाचविण्याची चळवळ, लढा उभा करणे, हिच काळाची गरज आहे. आंबेडकरवादी बहुजन समाजाने ठरविले तर ही चळवळ ही उभी राहू शकते व लढा ही. अन तो लढा जिंकता ही येवू शकतो. भाजप व मोदीला बहुमतापासून रोखण्याची ऐतिहासिक लढाई आपण आता आताच जिंकलो ही आहोत…. आपल्यासाठी ही लढाई अवघड नाही. 
………………………
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *