- 38
- 1 minute read
चक्रधर स्वामी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
चक्रधर स्वामी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! महान क्रांतिकारक सर्वज्ञ चक्रधर स्वामी !
भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती घडविणारे महान तत्त्वज्ञ सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा जन्म भडोच या ठिकाणी इसवीसन ११९४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विशालदेव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव कमळाईसा होते. चक्रधर स्वामी यांचे पूर्वाश्रमीचे नाव हरिपाळदेव असे होते. कुमार वयामध्ये हरिपाळदेव यांनी एका युद्धात सहभाग घेतला होता, पण युद्धावर त्यांचा विश्वास नव्हता. हरिपाळदेव जसे शूर, पराक्रमी होते तसेच ते प्रेमळ आणि संवेदनशील मनाचेदेखील होते. हिंसा त्यांना मान्य नव्हती. ही त्यांची धारणा होती. निराधार लोकांना मदत करणे, हाच खरा धर्म आहे, असे त्यांचे मत होते
अत्यंत तरुण वयात चक्रधर स्वामी यांच्या मनात संसाराबद्दल विरक्ती निर्माण झाली. आपण तीर्थाटन करावे, हा त्यांचा मनोदय होता. तो मनोदय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना बोलून दाखवला. तीर्थाटणाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. पण तो विरोध डावलून चक्रधर स्वामी तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत- करत ते अमरावती या ठिकाणी आले. एकांतामध्ये त्यांनी राजवस्त्राचा त्याग केला आणि ते एकटेच पुढे निघाले. प्रवासात ते ऋद्धिपुर या ठिकाणी येऊन पोहोचले. ऋद्धिपुर याठिकाणी श्रीगोविंदप्रभू नावाचे महान सत्पुरुष त्यांना भेटले. हरिपाळदेव हे गोविंदप्रभू यांच्या पुढे नतमस्तक झाले. गोविंदप्रभू यांनी चक्रधर स्वामी यांना अनुग्रह दिला आणि हरिपाळदेव यांना ते चक्रधर म्हणाले. हरिपाळदेव यांचे चक्रधर हे नामकरण श्रीगोविंदप्रभू यांनी केले.
सर्वज्ञ चक्रधर स्वामी विदर्भ-मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश असा प्रवास करत- परत मराठवाड्यात आले. पाथर्डी जवळील येळी या ठिकाणी आले. त्यांच्या स्मृती महानुभाव मंदिराच्या रुपांने आज देखील तेथे कायम आहेत. तेथून ते मेहकर या ठिकाणी आले. तेथे बोणेबाईसा यांना त्यांनी अनुग्रह दिला. आपल्या शिष्यगणांसह चक्रधर त्रंबकेश्वरला निघाले. पण वाटेत पैठण या ठिकाणी ते थांबले आणि त्र्यंबकेश्वरला जाण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला. पैठण याठिकाणी चक्रधर स्वामी यांचे प्रदीर्घ वास्तव्य राहीले. तेथे त्यांनी बाईसा, आबाईसा, महदाईसा, उमाईसा, नागदेवाचार्य असे अनेक शिष्य घडविले. शिष्यांना ते महात्मे म्हणत असत.
सर्वज्ञ चक्रधरांच्या महानुभाव संप्रदायाने भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र क्रांती केली. महिलांना हक्क अधिकार दिले. महादंबा ही सतत विचार करायची, प्रबोधन करायची, तत्वज्ञान सांगायची, चिकित्सा करायची, चक्रधरांना काहीतरी सतत विचारत राहायची, म्हणून चक्रधर स्वामी म्हणाले “महदाइसा चर्चक, चिकित्सक, सतत काहीतरी पुसतसे”. महदंबा ही ज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत अधिकारी होती.
चक्रधर स्वामी यांनी लिंगभेदाला तिलांजली दिली. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही अधिकार असला पाहिजे, ही चक्रधर यांची भूमिका होती. ते म्हणाले “पुरुष म्हणजे जीव आणि स्त्री म्हणजे काय जिवलिया आहे काय?” म्हणजे स्त्री – पुरुष असा भेदभाव बाळगू नये असे ते प्रदिपादन करतात. धर्माच्या नावाखाली स्त्रियांना बंधनात ठेवणाऱयांचा त्यांनी समाचार घेतला. शुचितेच्या गप्पा मारणाऱ्यांना चक्रधर स्वामी म्हणाले “नाकाला येणारा शेंबूड आणि मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे, ती अपवित्र किंवा अशुद्ध नाही” तेराव्या शतकात म्हणजे आतापासून सुमारे आठशे वर्षांपूर्वी असे विचार मांडणारे चक्रधर स्वामी समाजक्रांतीकारक आहेत.
चक्रधर स्वामी यांनी वर्णव्यवस्थेला विरोध केला. शूद्रातिशूद्रांना ज्ञानाच्या क्षेत्रात अधिकार दिला. तेलीनिच्या हातची भाकर खाल्ली व म्हणाले “या भाकरीवरती कोणत्याही जातीचे नाव नाही, ही भाकरी तेलीनीची नव्हे, तर बाजरीची आहे. सर्व माणसे समान आहेत. भेदभाव बाळगणे मूर्खपणा आहे,” असा त्यांचा क्रांतिकारक विचार होता. ते जसे बोलत तसेच वागत. मातंगाच्या हातचा लाडू त्यांनी शिष्यगणाला प्रसाद म्हणून दिला. विकार विकल्पाचा त्याग करावा, हे त्यांनी निक्षून सांगितले.
चक्रधर स्वामी हे अहिंसावादी होते. त्यांना युद्ध अमान्य होते. अत्याचार मान्य नव्हते. अन्याय -अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कडाडून विरोध केला. चक्रधर स्वामी म्हणाले “तुमच्याने मुंगीदेखील रांड न व्हावी” म्हणजे मुंग्यालादेखील मारू नका. मुंगीला देखील विधवा करू नका. म्हणजे सर्व प्राणीमात्रांना जगण्याचा अधिकार आहे, असे चक्रधर स्वामी यांचे विचार होते. जेथे हिंसा होते तेथे वास्तव करू नये, असे ते सांगत असत.
चक्रधर स्वामी यांनी पारतंत्र्याचा धिक्कार केला. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असले पाहिजे. स्वातंत्र्यात सर्वांगीण प्रगती होते. स्वातंत्र्य असेल तरच मानव विचार करू शकतो आणि त्याने विचार केला तरच वैज्ञानिक, शैक्षणिक, कृषी-औद्योगिक प्रगती होईल. स्वातंत्र्याचे महत्त्व सांगताना चक्रधर स्वामी म्हणतात “स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष आहे आणि पारतंत्र्य हेच खरे बंधन आहे”. मोक्ष याचा अर्थ मोकळेपणा, स्वातंत्र्य असा होतो. त्यांच्या संप्रदायाला महानुभाव संप्रदाय असे म्हणतात.
चक्रधर स्वामी यांनी कर्माठांना विरोध केला. वर्णव्यवस्था मोडली, शूद्रातिशूद्रांना, महिलांना, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे कर्मठ त्यांच्यावरती प्रचंड चिडले. चक्रधर स्वामी मागे हटले नाहीत, त्यांनी आपले निरुपणाचे व समाजक्रांतीचे कार्य कायम ठेवले. पुढे ते उत्तरापंती गेले असे महानुभाव पंथाचे मत आहे. ते मागे हटले नाहीत. ते सुंदर होते. ते निर्मळ होते. निर्भीड होते. कणखर होते, अशा महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथी प्रयाणानंतर(१२७४) त्यांचे चरित्र म्हाइंभट यांनी लिहिले. हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ आहे. याला लीळाचरित्र म्हणतात. तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय जीवनाचे यथार्थ वर्णन या ग्रंथात आहे. त्याकाळातील शेती, पिके, आहार, प्रवासाची साधने, स्त्रीजीवन याचे यथार्थ दर्शन या ग्रंथात होते. त्याकाळातील अस्सल मराठी भाषेचा खजिना म्हणजे लीळाचरित्र आहे. अभिजात मराठी भाषेचा ठेवा म्हणजे लीळाचरित्र आहे. हे चक्रधर स्वामींचे समग्र चरित्र आणि तत्त्वज्ञान आहे.
– डॉ.श्रीमंत कोकाटे