आई आणि तिची पिले हाच सर्व प्राणीमात्रांचा पहिला समाज. जातीधर्म तर फार नंतर आला. नीरज हिंदू घरात जन्मला आणि नदीम मुस्लिम घरात जन्मला म्हणून दोघांच्याही आईला, एक दुसरा परका वाटत नाही. नदीमच्या आईने नीरजच्या गोल्ड मेडलसाठी अल्लाकडे दुवा मागीतली. तर नीरजच्या आईने नदीम आमचाच मुलगा असल्याची ग्वाही अगदी सहजपणे दिली. जातीधर्मात तेढ पसरवून भारतीय समाजाला गेले दशकभर वेठीस धरणाऱ्यांचे द्वेषाचे फुत्कार आपण रोजच ऐकतो आहोत. या माताही ते फुत्कार ऐकत असणार. पण वेळ आल्यावर त्यांनी आपला मातृत्वाचा मूल्यगर्भ समतावादी हस्तक्षेप ज्या साधेपणाने पण बिनतोड केला आहे ते काम, मोठा प्रबंध लिहूनही साधणार नाही. अशावेळी, साधारण भासणारी कुठलीही माता जगन्मातेच्या भूमिकेत आपलं वैश्विक शहाणपण आदा करते. मातृसत्तेकडून आलेला माणूसपणाचा हाच शाश्वत सौंदर्यबोध आहे !