मुंबई : ड्रग्सचा साठा नाशिक ते लोणावळा या दरम्यान आहे. परंतु, अजूनही तिथे छापा होत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावं की, त्यांना केंद्रातील कोणत्या मंत्र्यांकडून सूचना आहे की, यावर कारवाई करू नये? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. हे ड्रग्स कमी किमतीचे नाहीत, तर दहा हजार कोटींचे हे ड्रग्स असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, १९९३ मध्ये ब्लास्ट झाला त्यावेळी ड्रग्सचा पैसा वापरण्यात आला होता. ड्रग्सचा जो व्यवहार चालला आहे तो एक संघटित गुन्हा आहे आणि दहशतवादाशी संबंधित आहे. २०२१ मध्ये मुंद्रा पोर्टवर एनआयएमार्फत नार्कोटीक्स सिझ झाले होते. त्याच्यामध्ये अतिरिक्त चार्जशीट दाखल करण्यात आली. त्या अतिरिक्त चार्जशीटमध्ये एनआयएने सिद्ध केले आहे की, ड्रग्सचा पैसा हा लष्कर- ए – तोयब्बा या संघटनेसाठी पुरवला गेला होता.
मध्यंतरी एक बातमी आली होती की, पोर्ट बंदरवर १८ हजार कोटींचे ड्रग्स सापडले होते. हे ड्रग्स कोणत्या एजन्सीच्या ताब्यात आहेत ? नार्कोटीक्सच्या ताब्यात आहेत, एनआयएच्या ताब्यात आहे, ईडी की सीबीआयच्या ताब्यात आहे याची कुठेही माहिती मिळत नाही. हा दहा हजार कोटींचा ड्रग्स साठा नाशिक – लोणावळा येथे आहे. तो यापैकी आहे का ? याचा खुलासा झाला पाहिजे. तरुण पिढी याला बळी पडत आहे या मुद्याकडेही आंबेडकर यांनी लक्ष वेधले.
ड्रग्स तस्करीचा मोठा प्रयत्न भारतात झाला आहे. मुशर्रफ यांनी पाकिस्तानातील सत्ता जेव्हा हातात घेतली आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले नव्हते त्याआधी युद्धजन्य परिस्थिती भारतासोबत झाली होती. त्या दरम्यान त्यांचे विधान होते की, ते दहा दिवसांचा निधी युद्ध लढण्यासाठी देतील.असे त्यांनी म्हटले.
कारवाई का झाली नाही, जनतेला सांगा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्स प्रकरणावर कारवाई का झाली नाही याची माहिती जनतेला सांगावी, अशी मागणीही त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली.