भारत 1947 साली स्वतंत्र झाला. त्याआधी भारतीय समाजात मनुस्मृतीचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात होते आणि त्यात विदित केल्याप्रमाणे लोक व्यवहार सुरू होता. पण स्वातंत्र्यानंतर संविधान निर्मिती केली गेली आणि सर्वांना समानतेचा हक्क दिला गेला. त्यामुळे वर्णवर्चस्ववाद्यांचे वर्चस्व संपुष्टात आले. 2014 नंतर देशात हिंदुराष्ट्राचे वारे वाहू लागले. राज्यकर्ते बहुसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याचा नादात या देशात जे इतर धर्मीय राहतात त्यांच्यावर ‘आम्ही सांगू तीच संस्कृती’ अशी बळजबरी करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. म्हणूनच आता अट्टाहासाने अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृती यातील काही भाग समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, हे अभ्यासक्रमाच्या आराखड्यावरून स्पष्ट होतेय.
संविधानाच्या 25व्या कलमानुसार प्रत्येक धर्मियांना आपापल्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार असला तरीही ती उपासना इतर धर्मीयांवर लादण्याचा अधिकार मात्र दिलेला नाही. मनाचे श्लोक, गीतापठण स्पर्धा या आतापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमातून घेतल्या जातच होत्या. त्यावर कोणाचा आक्षेपही नव्हता. पण आता त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा घाट घातला जात आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा असेल तर नमाज पठण स्पर्धा, बायबल मधील टेन कमांडमेंटस् या गोष्टीही शिकवायला काय हरकत आहे?
मनुस्मृतीत महिला आणि शूद्र यांना अत्यंत कमीपणाचा दर्जा देणारे निषेधाहार्य श्लोक आहेत; तर गीतेमध्ये चातुर्वण्याचा उद्घोष केलेला आहे. रामदासांच्या दासबोधामध्ये ब्राह्मणी धर्माचा उदो उदो केलेला आहे. अशाप्रकारे विषमतेला खतपाणी घालणाऱ्या आणि मुलांवर विषमतेचे संस्कार करणाऱ्या गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे कोणत्याही सुज्ञ माणसास वाटल्या वाचून राहणार नाही. त्यापेक्षा ‘भेदाभेद अमंगळ’ म्हणून समतेचा उद्घोष करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही अभंग अभ्यासक्रमात घेतले तर जास्त योग्य राहील नाही काय?
संविधानातील अनुच्छेद 51(ज) अनुच्छेदानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे, तसा संस्कार रुजवणे, हे नागरिकांच्या हक्कात नमूद केलेले आहे. ते राहिले बाजूलाच, पण आजच्या विज्ञान युगात आपण आपल्या पुढच्या पिढीला मागास विचारांनी संस्कारी करून देशाला प्रगती पथावर नेणार आहोत, असे आजच्या शैक्षणिक धोरण आखणाऱ्यांना वाटते काय? त्याचबरोबर इतर धर्मियांना बळजबरीने एकाच धर्माचा अभ्यास करायला लावणे असा याचा अर्थ होत नाही काय?
जेव्हा धर्मालाच राष्ट्रीयत्व समजले जाते तेव्हा सगळ्यात पहिला हल्ला हा शैक्षणिक धोरणावर केला जातो. राज्यकर्त्यांना त्यांचे वर्चस्व आबादीत राहावे म्हणून पुढच्या पिढीत ही ‘धर्म हाच श्रेष्ठ, राष्ट्र दुय्यम’ असा संस्कार रुजवण्याची आवश्यकता वाटते. म्हणूनच मनाचे श्लोक, मनुस्मृती आणि गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करून त्याच दिशेने भारताची वाटचाल सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.