गेली काही दशके अर्थव्यवस्था विषयक ज्या चर्चा होतात त्यांचा मागोवा घ्या. आपल्याला हे जाणवेल की अशा चर्चा खालील अक्षांभोवती “फिरत्या” ठेवल्या जातात.
मुक्त बाजाराधिष्टित अर्थव्यवस्था विरुद्ध शासन नियंत्रित अर्थव्यवस्था
खाजगी क्षेत्र विरुद्ध सार्वजनिक क्षेत्र
शेती क्षेत्र विरुद्ध औद्योगिक क्षेत्र
शहरे विरुद्ध ग्रामीण भाग
नफा कमावणे म्हणजे कार्यक्षमता विरुद्ध तोटा होणे म्हणजे अंकार्यक्षमता
श्रीमंत विरुद्ध गरीब
भांडवलशाही विरुद्ध समाजवाद विरुद्ध कामन्यूनीझम
सहृदयी मालक / भांडवलदार विरुद्ध निर्दयी मालक/ भांडवलदार
भांडवलदार विरुद्ध कामगार
शिस्त पाळणारा कामगार/ कर्मचारी विरुद्ध आळशी कामगार / कर्मचारी
भ्रष्टाचारी राजकारणी विरुद्ध शुद्ध चारित्र्याचा राजकारणी
पर्यावरण विरुद्ध आर्थिक विकास
चर्चांचे असे दळण दळत ठेवले की दोन्ही बाजू एकमेकात शिंगे अडकवून बसतात. प्रश्न तेथेच राहतात. शब्दांचा किस पडत राहतो. हस्तक्षेपाच्या ठोस जागा समोर येऊच शकत नाहीत.
आर्थिक चर्चा अशा द्वि अक्षांभोवती फिरत ठेवणे त्यांनी रचलेला सापळा असू शकतो. त्यांना ते सोयीचे आहे. कारण खरे इश्यू पुढे येत नाहीत. उदा. कॉर्पोरेट, वित्त भांडवलाची हैजमोनी, प्रभुत्वसत्ता, हिंसक दादागिरी याबद्दल ते कधीही बोलत नाहीत. खरा गेम तर तो असतो. त्यांची वैचारिक मांडणी दाखवण्यासाठी असते. आपण त्या वैचारिक मांडणीला फेस व्हॅल्यू वर घेतो.
सत्य हे आहे की ,
कायदे / नियामक मंडळांचे नियम असे बनवले जतात की जे कॉर्पोरेट / वित्त भांडवलाच्या हिताचे रक्षण आणि संवर्धन करतील. अनेक कायद्यात अशा तरतुदी असतात की मंत्री / नोकरशहा / नियामक मंडळाचे प्रमुख यांना शेवटचा निर्णय देण्याचा / फिरवण्याचा अधिकार / डिस्क्रिशनरी पॉवर दिलेला असतो
अनेक गैरसोयीच्या विषयांवर शासन गप्प राहते.
कामगार , कष्टकरी, शेतकरी ,या आदिवासी यांचे मूलभूत अधिकार गदा आणणारे कायदे केले जातात.
लोकशाहीत मते मिळवण्यासाठी अनेकानेक टोकन कल्याणकारी योजना आखल्या जातात. भांडवल बाजारातील अनुत्पादक सट्टेबाजीला लगाम घातला जात नाही.
वित्त भांडवलाला कोट्यवधी गरिबांना / स्त्रियांना / विद्यार्थ्यांना लाखो कोटी रुपयांची कर्जे वाटण्यास आणि त्याची निष्ठुर वसुली करण्याचा अधिकार दिला जातो.
आणि अगदी हाताबाहेर गेले की क्रूर दंडसत्ता वापरली जाते
ही यादी परिपूर्ण नाही.
हे विषय पुढे आणले पाहिजेत. वरील प्रचलित प्रत्येक गोष्टीला आव्हान देण्यास भरपूर वाव आहे. त्यासाठी त्यांचा सापळा ओळखला पाहिजे. चर्चा आपल्या अंगणात झाल्या पाहिजेत. त्यांच्या अंगणात नव्हे.
संजीव चांदोरकर