वकिलांवरील हल्ल्यांचा निषेध — वकील संरक्षण कायदा तातडीने पारित करण्याची मागणी
धुळे, दि. ३ नोव्हेंबर (यूबीजी विमर्श-संहिता) राज्यात वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा निषेध नोंदवत आज धुळे जिल्हा न्यायालयात वकिलांनी लाल फीत लावून कोर्ट कामकाज केले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एकजुटीने शांततेत आंदोलन केले. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलांनी न्यायालयीन परिसरात “वकील संरक्षण कायदा पारित झालाच पाहिजे” अशी मागणी करत अध्यक्ष ॲड.राहुल पाटील यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. या आंदोलनादरम्यान कोणत्याही न्यायालयीन कामकाजात अडथळा न आणता वकिलांनी नियमित उपस्थिती दर्शवून प्रतीकात्मक निषेध नोंदवला. यावेळी वकिलांनी सांगितले की, राज्य शासनाने वकिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा तातडीने लागू करावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल. या प्रसंगी वकिलांनी शेवगांव (अहिल्यानगर) येथील वकिलावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली.धुळे जिल्हा न्यायालय परिसरात आजचा दिवस “लाल फीत आंदोलन” या स्वरूपात पार पडला आणि संपूर्ण न्यायालय परिसरात एकजुटीचा संदेश दिला गेला. यावेळी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील,जेष्ठ विधीज्ञ ॲड.दिलीप पाटील,ॲड.शामकांत पाटील,ॲड. जितेंद्र निळे,ॲड. विजय रवंदळे,ॲड.हितेश कबाडे,ॲड.राहुल भामरे,ॲड.नितीन जाधव,ॲड.प्रशांत चौधरी,ॲड.सचिव बळीराम वाघ,ॲड.सचिव उमेशकांत पाटील,कार्यकारणी सदस्य ॲड. उमाकांत घोडराज ,पदाधिकारी,जेष्ठ विधिज्ञ व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.