परिचयोत्तर विवाह मंडळाची व्यवस्थापकीय संरचना कशी असावी ? ★★★★★★★★★★★★★★★★
संचालक स्वतः निधर्मीयता, विज्ञाननिष्ठता, लिंगभावी समानता व मित्रता (लोकशाही) ही मूल्ये मानणारा असावा. भारतीय कुटुंबसंस्थेचा इतिहास व वर्तमानातील सहजीवनाच्या येऊ घातलेल्या नव्या संकल्पना याची त्याला जाण हवी. त्यासंबंधातील साहित्याची यादी, संकेतस्थळांचे पत्ते-लिंक इत्यादी मंडळात उपलब्ध हवे.
मंडळात नाव नोंदणी करणारांची जी मूलभूत ‘कुंडली’ जाणून घ्यायची आहे त्यातूनच तयार होणारे उपप्रश्न म्हणजे विहित नमुन्यातील फॉर्म असेल. त्यासाठी ‘कुंडली’तील १३घरे जाणून घेऊ. म्हणजे नोंदणी फॉर्मची साधारण कल्पना येईल.
१) जन्मदिनांक २) जात ३) रक्तगट ४) वजन उंची ५) शिक्षण ६) आर्थिक स्थिती ७) आहार : शाकाहारी-मांसाहारी ८) आरोग्य इतिहास-अनुवंशिक आजार ९) आईवडीलांचे निर्वाहाचे साधन १०) वास्तव्याचा इतिहास ११) कौटुंबिक माहिती १२) घरकामातील कौशल्ये (पुरुषांनीही सांगायची आहेत) १३) धार्मिक धारणा.
मंडळाकडे तज्ज्ञांची पुढील विषयावरील व्याख्यानांची ध्वनीचित्रफीत व स्क्रीन हवा. जी विवाहेच्छूंना ऐकता येतील.
१) भारतीय विवाह व दत्तकविधान कायदा २) सुदृढ आरोग्य ३) निरामय कामजीवन ४) पाकशास्त्र व आहार नियोजन ५) अर्थ साक्षरता ६) बाल संगोपन व ज्येष्ठांशी संवाद ७) क्रीडा, सहल, मनोरंजन यांचे जीवनातील स्थान ८) कुटुंबसंस्था, निसर्ग व पर्यावरण यांचा परस्पर संबंध. *(ही यादी किमान आवश्यक अशी आहे. त्यात आणखी भर पडू शकेल)
उभयतांचे सहजीवन व कौटुंबिक जीवनाचे चार स्तंभ आहेत. ते जाणून घेणे परिचयोत्तर विवाह संकल्पनेसाठी अनिवार्य आहे.
१) आरोग्य : आयुष्य वयाने नाही आरोग्याने मोजले जाते २) आर्थिक : दारिद्रय हे बीभत्स असते. आर्थिक पाया मजबूत असावा व चंगळवादमुक्त संपन्न आर्थिक नियोजन केले पाहिजे ३) भावनिकता : आपले भावजीवन जेवढे समृद्ध तेवढेच आपण सुखी असतो ४) नैतिकता : व्यक्तीगत व सामाजिक जीवनात नैतिकतेचे पालन केले नाही तर त्याची किंमत मोजावीच लागते.
*विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन याविषयी पुढील लेखात.