• 37
  • 1 minute read

भीमा-कोरेगाव लढा : जातीअंताच्या संघर्षाची नांदी!

भीमा-कोरेगाव लढा : जातीअंताच्या संघर्षाची नांदी!

भीमा-कोरेगाव लढा : जातीअंताच्या संघर्षाची नांदी!

कोरेगाव-भीमाची लढाई ही केवळ दोन सैन्यांमधील युद्ध नव्हतं, तर ती मानवी हक्क, स्वाभिमान आणि सामाजिक समतेसाठी पुकारलेली एक ऐतिहासिक क्रांती होती. १ जानेवारी १८१८ रोजी भीमा नदीच्या काठी घडलेल्या या थराराने भारताच्या सामाजिक इतिहासाला एक वेगळी कलाटणी दिली. ऐतिहासिक लढाईचे महत्त्व आणि त्याठिकाणी उभ्या असलेले क्रांती स्मारक सामाजिक समतेच्या क्रांतीचा जिवंत साक्षीदार आहे.
 
पुणे जिल्ह्याातील भीमा-कोरेगाव येथे उभा असलेला ‘विजयस्तंभ’ हा केवळ दगडाचा खांब नसून तो पिचलेल्या, उपेक्षित आणि अन्यायग्रस्त समुदायांच्या उत्थानाचे प्रतीक आहे. १८१८ च्या १ जानेवारीला झालेल्या लढाईत केवळ ८३० सैनिकांनी – ज्यामध्ये ५०० सैनिक महार होते. या महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८,००० सैन्याचा पराभव केला होता. ही लढाई एका राजसत्तेविरुद्ध दुसऱ्या राजसत्तेची नसून ती ‘अस्पृश्यतेच्या’ बेड्या तोडण्यासाठी दिलेला एक निर्णायक लढा होता. ज्या संधीला त्यांनी विजयात रूपांतर केले. 
त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला प्रचंड जाच सहन करावा लागत होता. अमानवीय प्रथेविरुद्ध हा एक उठाव होता. जेव्हा इंग्रज सैन्यातील महार रेजिमेंटच्या शूरवीरांनी पेशव्यांच्या बलाढ्य फौजेला धूळ चारली, तेव्हा तो विजय केवळ लष्करी विजय नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठेचा विजय होता.
 
या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी १८२२ मध्ये भीमा नदीच्या काठी हा विजयस्तंभ उभारला. या स्मारकावर शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत. या विजयस्तंभाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कोरलेली २२ सैनिकांची नावे. हे ते सैनिक आहेत ज्यांनी १ जानेवारी १८१८ च्या युद्धात वीरमरण पत्करले होते. स्तंभावर कोरलेल्या नावांपैकी बहुतांश नावे ही ‘नाक’ या उपनावाने संपतात (उदा. सोमकनाक, रायनाक, गणनाक). हे नाव प्रामुख्याने महार समुदायातील योद्ध्यांसाठी वापरले जात असे.
 
स्तंभावर केवळ एकाच समाजाची नाही, तर महार, मराठा, मुस्लीम अशा विविध जाती-धर्माच्या सैनिकांची नावे आहेत. हे स्मारक खऱ्या अर्थाने ‘भारतीय शौर्याचे’ प्रतीक आहे.
 स्तंभावर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत या युद्धाचा संक्षिप्त इतिहास आणि युनिटची माहिती (2nd Battalion, 1st Regiment of the Bombay Native Infantry) कोरलेली आहे.
 १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या स्मारकाला भेट दिली आणि या जागेचा इतिहास जगासमोर आणला. तेव्हापासून हे ठिकाण ‘शौर्य दिन’ म्हणून साजरे केले जाते. आज भीमा-कोरेगाव हे केवळ एक गाव राहिलेले नसून ते क्रांती तून स्थापित समतेचे प्रतिक बनले आहे. दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी या स्मारकासमोर नतमस्तक होण्यासाठी येतात. हे स्मारक आपल्याला आत्मसन्मान म्हणजे कोणत्याही संकटावर मात करून आपला हक्क मिळवण्याची जिद्दीची प्रेरणा देते. जातिअंताच्या लढाईची खरी पायाभरणी या लढ्यातच झाली. समाजात सर्वांना समान वागणूक मिळावी या चळवळीची ही पायाभरणी होती.
सर्व भेदाभेद विसरून अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन एल्गार पुकारण्याची प्रेरणा ही हा विजयस्तंभ देतो.
 
भीमा-कोरेगावचा हा रणसंग्राम इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे. येथील क्रांती स्मारक आजही आपल्याला सांगते की, जेव्हा मानवाचा स्वाभिमान जागा होतो, तेव्हा कोणतीही सत्ता त्याला रोखू शकत नाही. हे स्मारक केवळ विजयाचे नाही, तर मानवी मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. हा स्तंभ अंदाजे ६५ फूट उंच आहे. हा स्तंभ वालुकामय दगडात कोरलेला असून त्याची रचना अतिशय भव्य आहे. याचे स्वरूप ब्रिटीश ‘व्हिक्टोरिया’ काळातील लष्करी स्मारकांशी मिळतेजुते आहे. स्तंभाचा पाया चौकोनी असून वरचा भाग निमुळता होत गेलेला आहे.
शौर्य चिन्हे: स्तंभाच्या वरच्या भागात आणि बाजूला लष्करी शौर्याची प्रतीके कोरलेली आहेत, जी त्या काळातील बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या पराक्रमाचे दर्शन घडवतात.
सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून पाहिले तर, भीमा कोरेगावचा लढा हा ‘मानव म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी’ दिलेला लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये या स्तंभाला भेट दिल्यानंतर या घटनेला नवीन वैचारिक परिमाण मिळाले.
याउलट, १८५७ चा लढा हा ब्रिटिशांना घालवून देण्याची प्रबळ इच्छा असणारा होता; परंतु, अंतर्गत सामाजिक विषमतेवर हा लढा मौन होता. म्हणूनच, सामाजिक न्यायाच्या परिप्रेक्षात भीमा कोरेगावची लढाई ही ‘जातिअंताच्या संघर्षाची नांदी’ मानली जाते.
 
चंद्रकांत सोनवणे 
0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *