पुणे : येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांना अधिक दर्जेदार व सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या सोहळ्यातील सुविधांमध्ये वाढ करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
शौर्य दिनाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, नियोजन, सुरक्षा आणि सुविधांबाबतची संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी अनुयायांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता सुधारावी, त्या दर्जेदार, अचूक आणि सर्वसमावेशक असाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.
त्यांनी सांगितले की,
“जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा सातवा उत्सव होत आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अधिक परिपूर्णतेकडे जात आहे. प्रशासनाने देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अधिक सक्षम कराव्यात. यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाशी सातत्याने पाठपुरावा करणार आहोत.”
बैठकीत एकूण २५ प्रतिनिधींनी विविध सूचना व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सर्व मागण्या अंतिम नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा सादर करून अनुयायांकडून येणाऱ्या अपेक्षा आणि अडचणी जाणून घेतल्या. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, निवारा, प्रकाशयोजना आदी सर्व सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.