- 121
- 1 minute read
मनोज जरांगे कुणाच्या खोपडीची उपज…?
प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आंदोलनात घुसखोरी ते आंदोलनावर कब्जा…!
ब्राह्मणी पौराणिक कथेत नारद नावाचे एक पात्र आहे. सर्वत्र संचार पण कर्तृत्व शून्य. कळ्या लावणे, कांड्या करणे, हा या पात्राचा खास गुणधर्म म्हणून यास कळीचा नारद असे म्हणतात. कुणालाही नको नकोसे वाटणारे पात्र. आपली गरज नसताना, आपणाला कुणी विचारत नसताना नारद मुनी पोहचतात व सल्ले देतात. पण ते कळलाव्या असल्याने त्यांना कुणी तसे गंभीर घेत नाही. तसेच एक पात्र महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकरांच्या रूपात आपण पाहत आहोत. त्यांचा एक पक्ष आहे, ते येणाऱ्या विधानसभेत किती जागा लढणार ? त्यांना माहित नाही. कुणाशी् युती करणार ? हे आजपर्यंत त्यांनी सांगितले नाही. निवडून येऊ शकतात, असे उमेदवार त्यांच्या पक्षात आहेत का ? तर याचे उत्तर नाही असे आहे. पण त्यांना ते भाजप पुरवतो. त्यांचे उमेदवार मिळविण्याचे केंद्र भाजप आहे. अन त्या उमेदवारांना निवडून आणण्यापेक्षा मविआचे उमेदवार पाडणे हा अजेंडा. आता हा अजेंडा राबविण्याचे कार्य त्यांना एकट्याला पेलावत नसल्याने त्यांनी जरांगेला उसकावायला सुरु केले आहे. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागा लढविण्याचा सल्ला ते जरांगेला देत आहेत. यामुळे मविआला मिळणारी मतं कुजतील, भाजपचा फायदा होईल. स्वतः आंबेडकरी समाजाची व विचारांची भाजपच्या विरोधात पडणारी मतं ते कुजवित आहेतच, हे नारद मुनी.
राज्यातील मराठा म्हणजे राजकीय सत्तेतील रुलिंग समाज. सत्तेचा गैरवापर करून त्याने सर्वच साधनांवर आपली मक्तेदारी स्थापित केली आहे. राज्याच्या आर्थिक नाड्या व आर्थिक बजेटवर तोच डल्ला मारतोय. बजेटमध्ये वंचितांसाठी तरतूद असली तरी तोच पळवतोय. अशी स्थिती. पण सत्तेतील ही काही मूठभर घराणी. बाकी मराठा गरीब. त्यामुळे तो विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडतोय. आरक्षण मागतोय अन त्याला राज्यकर्ते फसवत आहेत. या स्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करीत आहेत. पण हे करताना त्यांचे हात अन पाय दोन्ही डगरीवर आहेत. आज त्याला सध्याचे सत्ताधारी फसवत असल्याने तो जरांगेच्या नेतृत्वात सत्तेशी लढतो आहे. तर सत्तेशी लढणारा, आरक्षण मागणारा गरीब मराठा निवडणुकीच्या राजकारणात नक्कीच मविआच्या बाजूने उभा राहणार. त्याला अन्य कुठला पर्याय ही नाही. अन असला तरी तो यशस्वी होणारा नाही. तोच यशस्वी न होणारा पर्याय म्हणजे सर्वच्या सर्व जागा लढविणे अन त्या हारणे. पण हा पर्याय म्हणजे भाजप व मित्र पक्षाला अप्रत्यक्ष मदत करणारा . पण त्यासाठी मराठा आंदोलक तयार नाही. तर प्रकाश आंबेडकर याच साठी त्याला तयार करीत आहेत. म्हणजे भाजपला मदत करण्याची ही त्यांच्याकडून होणारी धडपड आहे.
जरांगे व मराठा आरक्षणाबद्दल सहानुभूती बाळगत असताना समस्त मराठा ज्यांना शत्रू मानत आहे, त्याच ओबीसी आंदोलना सोबत प्रकाश आंबेडकर आहेत. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्यभर बचाव यात्रा काढायची व ओबीसीतूनच आरक्षण मागणाऱ्या मराठा आंदोलनाला पाठींबा द्यायचा, ही प्रचंड विसंगतीपूर्ण भुमिका आहे. मराठा व ओबीसी हा संघर्ष आता केवल राजकीय राहिलेला नाही की आरक्षणा पुरता ही मर्यादित राहिलेला नाही. तर मराठा अन ओबीसी समाजामध्ये उभी फूट पडली असून गावा – गावात हा संघर्ष उभा राहिला आहे. गावे यादवी युद्धाच्या उंबरट्यावर उभी आहेत. अशा स्थितीत दोन्ही आंदोलनाला पाठींबा द्यायचा व आगीत तेल ओतायचे हे काम प्रकाश आंबेडकर करीत आहेत. याबद्दल त्यांना मिडियाने काही विचारले की ते सरळ उत्तर देत नाहीत. माझी भुमिका समजून घेतली जात नाहीत, असे एक पठडीतील उत्तर ते देतात. पण भुमिका समजवून सांगत ही नाहीत. अन सत्य हे आहे की, त्यांचे दोन्ही डगरीवरची भूमिका ही चुकीचीच आहे. तिचे समर्थन होऊच शकत नाहीत. अन मोदीची गोदी मिडियात ही अशी विसंगत भुमिका घेऊन ही ते हिरोच आहेत.
जरांगे कुणाच्या खोपडीची उपज आहे, हे समजत नाही. पण अतिशय चलाखीने त्यांचे नेतृत्व मराठा समाजावर थोपविण्यात आले आहे. राज्यातील मराठा नेते म्हणजे मविआ हे करू शकत नाही. मग उरले कोण जरांगेचा कर्ताकरविता ते स्पष्ट होईल ? मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण, सगे सोयऱ्यांना जातींचे दाखले, ही मागणी मराठा आरक्षण आंदोलनाची कधीच नव्हती. याबाबतची चर्चा ही कधीच नसायची. पण राज्यात घटनाबाह्य शिंदे – फडणवीस सरकार आले अन त्याच दरम्यान जरांगेचे नेतृत्व अन ही मागणी ही. मग जरांगेचे चोचले सुरु झाले. त्यांचे उपोषण व उषा पायथ्याला शासन, प्रशासन. हे चित्र पहिल्यांदा राज्यातील जनतेने पाहिले. 24 तास मुख्य चॅनेलवरून लाईव्ह. अन जरांगे मराठ्यांचा नेता. इतके सोपे नसते नेता बनने पण ते झाले. जसे भीमा कोरेगाव दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर झाले होते. एका मागोमाग झालेल्या या नेत्यांचा उदय अन भाजपचे राजकारण व राज्यातील सत्ता यांचा परस्पर संबंध आहेच. जरांगेच्या या मागणीमुळे राज्यात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ही आंदोलन उभे राहिले, ती गरज ही होती. त्यावेळी ही त्या आंदोलनात प्रकाश शेंडगे यांच्या मार्फत प्रकाश आंबेडकर अगदी घुसखोरीच केली. या ही आंदोलनाला त्यांनी निवडणूक मैदानात उतरवून मत विभाजन करणारी टीम बनविली अन वाऱ्यावर सोडून दिले. अन आता तर यातीलच काही ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन हे आंदोलनच ताब्यात घेतले आहे. उस्फुर्त अन ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी उभ्या राहिलेल्या एका आंदोलनाला संपविण्याचे काम प्रकाश आंबेडकर करीत आहेत.
देशात युती / आघाडीचे राजकारण अपरिहार्य झाले आहे. त्यांना मविआकडे यायचे नाही, अन महायुतीकडे गेले तर समाज स्वीकारणार नाही, अशा चक्रव्युहात ते अडकले आहेत. थोडक्यात त्यांची कोंडी झालेली आहे. पण त्याचा कल मविआला नुकसान करणे व भाजपला मदत करणे हाच राहिला आहे. 2019 च्या लोकसभा व विधानसभा अन 2924 च्या लोकसभेत हे प्रकर्षाने दिसलें. त्यांची व वंचितची भाजपची बी टीम म्हणुन हेटाळणी झाली व सुरु ही आहे. पण गडी भुमिका बदलायला तयार नाही. त्यांचे उमेदवार भाजपच्या कळपातून येतात, हे पुराव्यानिशी सिद्ध होत असताना ही ते त्यावर बोलत नाहीत. सर्वांची उणीधूनी काढणारे प्रकाश आंबेडकर यावर का बोलत नाहीत. अन त्यांना डोक्यावर घेऊन फिरणारा गोदी मिडिया त्यांना यावर कोंडीत का पकडत नाही. काही सौदा आहे आपापसात हे कळत नाही.
2019…. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारिप बहुजन महासंघाची व पदाधिकाऱ्यांची कोंडी करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना खेदजनक असली तरी राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी घटना होती. त्यात ओवेशीची एंट्री म्हणजे चार चांद लागण्यासारखी गोष्ट. लोकसभेला भरीव मतदान. मत विभाजनाचा भाजपलाझालेला फायदा. आंबेडकरी नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचे एकत्र येणे आदी चांगल्या गोष्टी एकाच वेळी घडून आल्या होत्या. पण हेतू, उद्देश प्रामाणिक नव्हता. त्यामुळे ते सर्व टिकविता आले नाही. लोक, मतदार समूहाने कुणाच्या जवळ जातो, नेतृत्व स्वीकारतो, तेव्हा त्याचा कॉमन इंटरेस्ट असतो. पण फसवणूक झाली की ते सोडून जातात. प्रकाश आंबेडकरांना सोडून जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण अधिक जण त्यांच्या सोबत ही नव्याने येतात, ते कुणीतरी, काही ठराविक वेळेपूरते, अन कार्यापुरते पाठवलेले असतात. हे खरे.
——————————
– राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र राज्य