- 5
- 1 minute read
“मराठी अस्मिता vs स्थलांतराचा प्रश्न”
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 16
“मराठी अस्मिता vs स्थलांतराचा प्रश्न”
अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकहो.. खरं तर यापुढे बांधवांनो आणि भगिनींनो असं लिहिण्याची माझी इच्छा आहे. पण महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी माणसावर अजिबात प्रेम न करणाऱ्या आणि त्याची लाज न वाटता अभिमान वाटणाऱ्या लोकांना बांधव म्हणणं जवळपास अशक्य आहे. वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवरून असं दिसतं की, तुम्ही आणि तुमचे तोतया समाजवादी पुढारी ४ मे २०२६ पासून संपावर जाणार आहात. सर्वप्रथम या निर्णयाबद्दल मी तुमचं स्वागत करतो. तुमच्यापैकी बहुतेकांच्या मनामध्ये महाराष्ट्राने तुम्हाला पोटाला लावूनही महाराष्ट्राबद्दल तुम्हाला किंचितही कृतज्ञतेची भावना नाही. याची आम्हाला जवळपास खात्री होतीच; ती खात्री एक हजार टक्क्यांमध्ये परावर्तित केल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार.
खरं तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. या देशाची रचनाच तुमच्या स्वागतासाठी आम्ही पायघड्या घालाव्यात, या हेतूने झाली आहे. आम्ही कधी कधी रागावून बिमारू प्रदेशाला ‘गायपट्टा’ असं म्हणत असलो, तरी तुम्ही या भारतमातेचे पवित्र अपत्य आहात आणि आम्ही म्हणजे सगळे कामधंदे सोडून हिमालयाच्या मदतीला वेळी-अवेळी धावून जाणारे लोक—तुमच्या दीर्घकालीन वसाहतीतील मांडलिक आहोत. एवढं तर आम्हाला कळायला पाहिजे.
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. घटनेच्या कलम १९ प्रमाणे सगळ्यांना सगळीकडे जाण्याचा-राहण्याचा हक्क आहे. पण तुम्ही लोक फारच कामसू आहात आणि तुमच्या राज्यकर्त्यांनी तुमच्या कामसूपणाला प्रेरणा देत अशा दारिद्र्य आणि वंचिततेची सोय तुमच्या राज्यात पुरेशी करून ठेवली आहे. या देशातल्या रेल्वेचे नाव कागदोपत्री भारतीय रेल्वे असलं तरी प्रत्यक्षात ती उत्तरभारतीय रेल्वे आहे. हे उत्तर भारतातून देशभर जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येवरून तर कळतंच; पण प्रत्येक रेल्वेतल्या प्रत्येक संडासात हिंदीतून लिहिलेला फलक वाचल्याशिवाय कोणत्याही भारतीय माणसाला मोकळं होता येणार नाही, याची निर्विवाद सोय मायबाप सरकारने करून ठेवली आहे.
तुम्ही म्हणाल की आम्हाला तुमचा राग येतो. खरं तर तुम्हालाच आमचा राग यायला पाहिजे. मुळात महाराष्ट्रासारख्या राज्याची निर्मिती तुमची वसाहत म्हणूनच झाली आहे. मात्र, शालेय शिक्षणापासून मराठी लोकांच्या अभ्यासक्रमात या गोष्टीचा अनिवार्यपणे समावेश न केल्यामुळे आम्हा लोकांना हे राज्य उगाचच आमचं वाटतं आणि मग तुमच्याशी खुमखुमी येते. आमच्या दुर्दैवाने शिवाजी महाराजांसारखा एक महान माणूस येथे होऊन गेल्याने आम्हाला सारखं आरशात बघून लाजीरवाणं वाटतं आणि मग संघर्षासाठी आम्ही आमच्या गंजलेल्या तलवारींना धार काढतो. पण खरी धार तुमच्या रिक्षा आणि टॅक्सी, तुम्ही अनधिकृतपणे उभ्या केलेल्या झोपडपट्ट्या, त्याचं झोपु योजनेतून काडीपेटीच्या इमारतींमध्ये झालेलं रूपांतर, भाज्यांपासून पाणीपुरीपर्यंत सर्व उद्योगांमधलं तुमचं अस्तित्व यावरून आम्हाला खरं तर कळायला पाहिजे की या देशात काम करायचं शिकावं ते उत्तर भारतीयांकडून. पण आम्हीतरी कोणाकोणाकडून काय शिकणार? जैनांकडून आम्हाला शाकाहार शिकावा लागतो, मारवाड्यांकडून भांडवलाची उभारणी शिकावी लागते, दाक्षिणात्यांकडून डोसे शिकावे लागतात, सगळ्या लोकांना सांभाळून घ्यायचं म्हणून सहिष्णुता शिकावी लागते. तुमच्यातल्या हिंदू मंडळींना सांभाळून घ्यायचं म्हणून छटपूजेचे, निर्माल्याचे कलश भरून ठेवावे लागतात; तुमच्यातल्या वहाबी आणि देवबंदी मुसलमानांना सांभाळायचं म्हणून आम्हाला हमीद दलवाईंना बाजूला ठेवावं लागतं. थोडक्यात, तुम्ही एवढे महत्त्वाचे आहात की मराठी बोलणारा हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, गावगाड्यातला जैन—या सगळ्यांच्या अस्तित्वाची सुरळी करून ती कोपऱ्यात ठेवावी लागते आणि हा देश सांभाळण्याचा ठेका आम्हीच अंगावर घेतला आहे, असं समजून कॉस्मॉपॉलिटन होत, फक्त क्रियापद मराठीत असलेलं मराठी बोलावं लागतं.
महात्मा फुल्यांनी अविद्येने काय अनर्थ केले आहेत हे आम्हाला सांगून ठेवलं आहेच. पण परप्रांतीयांनी काय अनर्थ केला आहे, तो अनुभवायचा; पण त्याबद्दल आवाज करायचा नाही, अशी शिक्षा आम्हाला मिळाली आहे. आमचे मराठी रिक्षा-टॅक्सीवाले काही देवदूताचा अवतार नाहीत; पण ते या राज्याचा, इथल्या मातीचा भाग आहेत. तुम्ही दोन हजार मैलांवरून येथे येता. आधार कार्ड आणि अधिवासाचं प्रमाणपत्र कसं मिळवता हे जगजाहीर आहे. त्याच्या आधारे तुम्हाला रिक्षा-टॅक्सीचे परवाने कसे मिळतात हेही सहज कळण्याजोगं आहे. हे सगळं दलालखोरी करणाऱ्या मराठी लोकांच्या मदतीने होत असल्याने तुमची भीड चेपलेली असणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे गुवाहाटीच्या टोळीतल्या प्रताप सरनाईकांनी कधी नव्हे तो मराठीधार्जिणा निर्णय घेण्याचा विचार केला. आम्हाला एवढं तर कळतं की पाशवी बहुमतवाल्या आणि गुवाहाटी टोळीवाले यांच्यात सध्या जी रक्तरंजित लढाई सुरू आहे, त्या लढाईचा एक भाग म्हणजे मराठीच्या आग्रहाचं धोरण आहे. काही का कारण असेना, ‘मिरा-भायंदरला आल्यावर काही का असेना माझ्या तोंडातून आपसूक हिंदी येतं,’ असं लाजीरवाणं विधान करणारा माणूस मराठीच्या आग्रहाची जाहीर भूमिका मांडतो, हे काव्यात्म न्यायासारखंच आहे.
स्वाभाविकच तुम्हाला हे नको आहे. तुम्ही उत्तरभारतीय हिंदू असाल तर ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा’ असं म्हणत गायपट्ट्यात जो उन्माद सुरू झाला आहे, त्याचे तुम्ही वारस आहात. उत्तर भारतीय मुसलमान असाल तर देवबंदी आणि वहाबी पद्धतीचे आहात; लोकशाही वगैरे गोष्टी तुमच्या गावी पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे भाषावार प्रांतरचना झाल्यावर त्या त्या राज्याची राजभाषा शिकणं अनिवार्य आहे, असं तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला मिरच्या झोंबतात, मूळव्याध उठतं आणि मग लष्कर-ए-नोएडा मधले गोदी मीडियाचे अँकर मराठी लोक प्रतिगामी, संकुचित, राष्ट्रद्रोही आहेत असं सगळ्यांना सांगत राहतात. काही अपवाद वगळता आमची माध्यमं ‘नरो वा कुंजरो वा’च्या भूमिकेत असल्यामुळे आणि आमचे मराठीवादी राजकीय पक्षांसह जवळपास सर्व राजकीय पक्ष निर्णायक आणि टोकाची भूमिका घेत नसल्यामुळे, स्थलांतरित आणि परप्रांतीय असूनही तुम्ही आमचे बाप झालेले आहात. त्यातही चळवळी चालवणारे आमचे मित्र ‘या गरीबांविरुद्ध संघर्ष करून काय करायचं? आपली खरी लढाई भांडवलदारांविरुद्ध असली पाहिजे,’ असं सांगून आम्हाला हतोत्साहित करतात; पण भांडवलदारांविरुद्धची लढाई लढताना ते सोबत असतील याची खात्री देता येत नाही. जागतिक भांडवल आणि धार्मिक मूलतत्त्ववाद यांचा समसमा संयोग झाल्यानंतर जी फॅसिस्ट राजवट उभी राहते, ती एखाद्या देशात उभी राहिल्यावर तिला भाषासंस्कृतीच्या राजकारणाने कसा छेद द्यायचा, हे कोणाला कळतही नाही; आणि आणि ज्यांना कळतंय, त्यांचं म्हणणं समाजापर्यंत पुरेसं पोहोचतही नाही.
अशा परिस्थितीत तुमच्या लाखोंच्या मोर्चाला आमच्या शुभेच्छा! हे दृष्ट महाराष्ट्र सरकार मराठी सक्ती करणार असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून तुम्ही तुमच्या १५ लाख रिक्षांमधून किमान ४५ लाख लोक भरून तीव्र वेगाने आपल्या गावाकडे कूच केले पाहिजे. युद्धाचा काळ आहे; त्यामुळे मध्ये डिझेल-पेट्रोल-सीएनजी न मिळण्याची शक्यता आहे. प्रवास वाटेत थांबून परत यावं लागू नये म्हणून पुरेसे बॅरल भरून तुम्ही आपला प्रवास सुरू करावा. अजित पवारांच्या विमानात जर काही बॅरल इंधन असू शकतं, तर गरीब रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडे असे इंधन असायला काय हरकत आहे? तो इंधन समानतेचाच भाग आहे, असं आम्ही मानतो. मजलदरमजल करत तुम्ही अत्यंत सुखासीन, प्रगत आणि धर्माची छत्रछाया असलेल्या बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड या देवभूमीतील प्रदेशांमध्ये आनंदाने परत जावं. मराठी लोक वाईट आहेत, त्यांची खोड मोडलीच पाहिजे. हवं तर हे आळशी लोक तुमच्या जागी रिक्षा चालवू शकतात का? इथल्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे त्यांनाही पाठदुखी होते की नाही, हे सगळं तुम्हाला नोएडातील चॅनलवरून नियमित कळण्याची व्यवस्था झाली पाहिजे.
तुम्ही कपड्यांना इस्त्री केली नाही तर मराठी लोकांवर नागडं फिरण्याची वेळ येईल. तुम्ही पाणीपुरी तयार केली नाही तर मराठी लोक उपाशी राहतील आणि त्यांना विड्रॉल सिम्प्टम्स येतील; तुम्ही फळं विकली नाहीत तर मराठी लोक फळांची नावं विसरून जातील; तुम्ही मासे विकले नाहीत तर मराठी कोळणी कोट्यवधींचा फायदा करून घेतील; तुम्ही एमआर झाला नाहीत तर डॉक्टर लोकांना चैन पडणार नाही. तुम्ही प्लंबिंग आणि इंटेरियरची कामे केली नाहीत तर महाराष्ट्रभरातील मराठी लोक पत्रे टाकून राहतील. आणि या अर्थव्यवस्थेत जे अब्जावधी रुपयांचं योगदान तुम्ही देत आहात ते तुमच्या अनुपस्थितीमुळे बंद झालं, तर मराठी लोक आणि पर्यायाने महाराष्ट्र देशोधडीला लागेल आणि मग इथले लोक तुमच्या राज्यामध्ये रोजगार करायला येतील. तेव्हा तुम्ही त्यांच्यावर हिंदीची सक्ती केली पाहिजे आणि ‘आता कशी अद्दल घडवली’ असंही म्हटलं पाहिजे.
तर मराठी लोकहो, आता आपण पुन्हा एकदा घाबरून जाण्याची वेळ आली आहे. गुजराती-मारवाड्यांचा पैसा नसेल तर मराठी माणूस भिकारी ठरतो; दाक्षिणात्यांसारखं इंग्रजी येत नाही, उत्तर भारतीयांसारखं कष्ट करत नाहीत—म्हणजे थोडक्यात आपण एक स्वतंत्र भाषक समाज म्हणून जगायलाच पात्र नाही आहोत. हे सगळं आपल्याला समजावून सांगण्यासाठी नियतीने शशांक राव, रामदास आठवले, वर्षा गायकवाड, संजय निरुपम अशा अमराठी आणि मराठी भैय्यांची नियुक्ती केली आहे. तर आता आपल्यापुढे दोन मार्ग आहेत—सपशेल माघार घ्यायची आणि मराठीचा आग्रह धरल्याबद्दल १०७ उठाबशा काढून या आदरणीय परप्रांतीयांची आणि मराठी भैय्यांची माफी मागायची; किंवा महाराष्ट्र धर्मावर आधारित मराठीकरणाची पूर्ण नव्याने सुरुवात करायची.
काय करायचं, ते ठरवूया येत्या १ मे रोजी. कारण अद्याप तरी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र दिनही आहे.
डॉ. दीपक पवार
(अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र)
0Shares