- 47
- 1 minute read
मी माझ्या मुलाला तुरुंगात भेटले!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 49
माझा मुलगा उमर खालिद याला तुरुंगात भेटल्यावर माझ्या जीवाला नवी ताकद मिळाली.
मागच्या दोन आठवड्यांपासून उमरचा व्हिडिओ कॉल नाही आला. माहिती पडलं की तांत्रिक कारणामुळं तो कॉलवर बोलू शकत नव्हता. माझी अस्वस्थता वाढायला लागली होती कारण त्याच्याशी बोलण्यासाठी तेवढ्याच गोष्टीचा तर आधार होता. हृदय जड झालं, डोळे वाहायला लागले होते. मग अचानकच त्याला समोरासमोर भेटण्याचा विचार मनात आला.
नवऱ्याला म्हणाले तर त्यांनी काहीतरी निमित्त सांगितलं. मी अवसान गळू दिलं नाही आणि एकटीच जेलकडे निघाले.
वयाच्या या वळणावर जेलमध्ये जाणं फारच कठीण आहे.
पण जेव्हा माणूस देवावर विश्वास ठेवतो तेव्हा या खडतर वाटाही सोप्या होऊन जातात.
गेल्या अनेक महिन्यानंतर मी मुलाला प्रत्यक्ष भेटायला निघाले होते. मनात एक वेगळीच भीती होती. खरं तर याला समोरासमोर भेटणं म्हणतात, पण ही किती विचित्र गोष्ट आहे की आमच्या दोघांच्या मध्ये दोन काचेच्या भिंती होत्या. एका बाजूला मी, दुसऱ्या बाजूला उमर. न स्पर्श करू शकतो, ना एकमेकांना नीट बघू शकतो. फक्त एक धूसरसा चेहरा दिसतो आणि इंटरकॉमवर बोलणं होतं.
शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडले. तिहार जेल जामियापासून खूप दूर आहे. रस्ता पण खचाखच भरलेला असतो. मला पोहोचायला एक तास लागला. उमरसाठी एक कातड्याची चप्पल घेतली. पण चेकींगच्यावेळी मला चप्पल आत नेण्यापासून थांबवण्यात आलं. मी खूप विनवण्या केल्या पण त्यांनी ऐकलं नाही.
चप्पल तिथंच सोडून द्यावी लागली.
आतमध्ये आपल्या माणसाला भेटण्यासाठी भेटायला आलेल्यांच्या लांबच्या लांब रांगा होत्या- स्त्रिया, पुरुष, लहान मुलं. आज तर जास्तच गर्दी वाटत होती. मी पण एका रांगेत उभी राहिले. मागे दोन स्त्रिया त्या भेटायला आलेल्या कैद्यांविषयी बोलत होत्या—एकीचा मुलगा बलात्काराच्या केसमध्ये आत होता तर दुसरीचा दीरपण त्याच कारणासाठी कैदेत होता. मी गप्प बसले.
मनात विचार आला, कसं सांगू की माझा मुलगा कोणताही गुन्हा न करता गेली पाच वर्षे जेलमध्ये सडतो आहे?
डोक्यात उमरला दोनवेळा मिळालेल्या पॅरोलची आठवण आली- बहीण आणि चुलत भावाच्या लग्नात सात सात दिवस. ते आनंदाचे क्षण लगेच विरून गेले. याच विचारात हरवलेली असतानाच माझा नंबर आला. मग पुन्हा उमरच्या खर्चासाठी पैसे जमा करण्यासाठी आणखी मोठी रांग.
रांगांमध्ये जेवढा वेळ गेला, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळ उमरसोबत बोलण्यासाठी मिळाला.
त्यानंतर जेलच्या आतमध्ये जाण्यासाठीची रांग लागली.
पहिल्यांदा चप्पल एक्सरे, मग बॉडी चेकअप झालं. पुन्हा जेल नंबर दोनपर्यंत पायी चालावं लागलं.
भेटण्याच्या जागी एका महिला स्टाफनं हातातली पावती पाहिली आणि प्रेमानं विचारलं, ” ओह! तुम्ही उमरची आई आहात? मी त्याच्या मित्रांना पाहिलं आहे, तुम्हाला पहिल्यांदाच पाहते आहे.” त्यांनी अंगठा लावून घेतला आणि वेटींग रूममध्ये बसवलं. त्यांच्या बोलण्यात उमरबद्दलचा आदर दिसत होता.
मी विचार केला की कदाचित उमरच्या चांगल्या वागण्याचा हा परिणाम असावा. तुरुंगात जिथं शिव्या देणं साधी बाब आहे तिथं सभ्य वागणारा कैदी सगळ्यांची मनं जिंकतो. उमरला राग तसा कमीच येतो. आता तुरुंगात सगळ्यांना माहिती झालं आहे की उमर निर्दोष आहे, सरकारी अन्यायाचा बळी आहे.
वेटींग एरियामध्ये चिमण्यांच्या किलबिलाटानं मन प्रसन्न झालं. शहरांमध्ये आपण निसर्गाच्या या करामतीपासून दूर राहतो. असं वाटलं की तुरुंगातील भिंतींच्या आत उडणाऱ्या चिमण्या जणू काहीं म्हणत असाव्यात:
“आम्ही इथे पण स्वतंत्र आहोत.”
मनात विचार आला-भिंतीच्या या बाजूला आपण स्वतःला स्वतंत्र समजतो आणि भिंतीच्या पलिकडे उमरसारखे अगणित लोक असहाय कैदेत आहेत.
उमरसारखा माणूस जो जंतर मंतरवर ओरडत होता, न्यायासाठी देशभर फिरत होता, त्याच्यासाठी हा तुरुंगवास म्हणजे अतिशय खडतर सत्वपरीक्षा आहे.
ती लांबलचक पाच वर्षे…
जर त्याला पुस्तकांचं वेड नसतं तर कदाचित वेळ घालवणं खूप अवघड होतं. त्यानं या पाच वर्षात तीनशेपेक्षा जास्त पुस्तकं वाचून काढली आहेत.
तेवढ्यात लाऊड स्पीकरवर उमर खालीदचं नाव पुकारलं गेलं. मी धावतच खिडकीजवळ गेले. उमरनं माझ्यासाठी तुरुंगाच्या आतल्या एका झाडाचं एक छोटसं फुल तोडून आणलं होतं.
माझ्यासाठी ते फुल एखाद्या मौल्यवान भेटीपेक्षा कमी नव्हतं.
काच आणि सळयांच्या मागून इंटरकॉमवर बोलणं झालं:
“आई, खूप उशीर केलास गं यायला! मी कधीचा वाट पाहतो आहे….”
मी म्हणालं, “बाळा, खूप लांब रांग होती रे.”
त्यानं घरातील प्रत्येक माणसाविषयी विचारलं-अब्बूची तब्बेत, बहिणीची ख्याली खुशाली, मुलांची चौकशी केली. तुरुंगाच्या आतल्या आयुष्याचे किस्से ऐकवले. मी नेहमीप्रमाणे त्याच्या खाण्यापिण्याला आणि तब्बेतीला घेऊन काळजीत होते.
“तब्बेत ठिकाय ना? काय वाचतो आहेस सध्या? जास्त उकडत तर नाही ना??
त्यानं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि विचारलं, “अब्बूच्या कार्यक्रमांबद्दल पेपरात वाचत असतो. त्यांना सांग जास्त नका फिरू, स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्या.”
बोलता बोलता वेळ कसा निघून गेला कळलंही नाही. जाताना उमर बाहेर पडण्याच्या दरवाज्याच्या खिडकीपर्यंत आला. मी मागे वळून पाहिलं, पण काचंच्या पलीकडंलं काही स्पष्ट दिसलं नाही.
बहुतेक मला पाठमोरं जाताना तो पाहत होता.
मी जड अंतःकरणानं हळूहळू बाहेर पडले.
मात्र तुरुंगातून परत येताना माझी मान गर्वानं उंचावली होती.
मला या गोष्टीचा अभिमान वाटत होता की माझा मुलगा कोणत्याही गुन्ह्यामुळं
नाही तर अन्यायग्रस्तांची साथ दिल्यामुळं आणि जुलमी सरकारच्या कायद्यांचा विरोध केल्यामुळं तुरुंगात आहे. त्यानं आमच्या त्या पूर्वजांच्या वारसाला जीवंत ठेवलं आहे, जे इंग्रजांच्या अन्यायाच्या विरोधात तुरुंगात जात होते मात्र ते कधी त्यांच्यासमोर झुकले नाहीत.
“ये रुतबा-ए-बुलंद मिला जिसको मिला
हर मुद्दई के वास्ते दारो-रसन कहाँ”
(ती सर्वोच्च ध्येयप्राप्ती प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही- फाशीचा दोर प्रत्येकासाठी नसतो.)
त्याचं बलिदान, त्याचा संयम, त्याचं शांततापूर्ण लढणं याचं फळ एक ना एक दिवस मिळेल. आज तुरुंगात बंद असणाऱ्या क्रांतीच्या प्रत्येक आवाजालाही.
माझं मन त्या सगळ्या आयांपर्यंत पोहोचतं आहे, ज्या आपल्या लेकरांपासून वेगळं होऊन गुपचूप त्रास सहन करतात. जेव्हा काळ लिहिला जाईल तेव्हा आमच्या मुलांची गणना त्या लोकांमध्ये केली जाईल ज्यांनी अन्यायाच्या विरोधात झुकले नाहीत.
जोहरान ममदानी सारख्या माणसांचा पाठिंबा बघून मला अभिमान वाटला. प्रकाश राज, स्वरा भास्करसारखे कलाकार आमच्या घरी आले. एक दिवस जुनैदची आईसुद्धा(जिच्या सतरा वर्षांच्या मुलाची हत्या हरियाणात करण्यात आली होती)घरी आली होती.
उमर त्या आवाजांमधून ऐकायला येत होता, ज्यांनी द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध आवाज उठवला होता. ते मला हिंमत आणि सदिच्छा देण्यासाठी आले होते.
माझ्याकडे त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द नाहीत.
हे सगळं मला विश्वास देतंय की या अंधाराचे मळभ दूर होतील आणि शेवटी प्रेम, न्याय आणि एकतेच्या गोष्टी बोलणारेच जिंकतील.
— सबीहा ख़ानम (दिल्ली)
उमर खालिदची आई
भावानुवाद: लक्ष्मी यादव
0Shares