• 128
  • 1 minute read

राजकारण करा, त्याचा धंदा करा, वाट्टेल ते करा…,पण आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतोय याचा ही जरा विचार करा …!!

राजकारण करा, त्याचा धंदा करा, वाट्टेल ते करा…,पण आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतोय याचा ही जरा विचार करा …!!

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत वंचितच्या अनेक उमेदवारांनी लाखाच्या आसपास अथवा लाखापेक्षा अधिक मतं घेतली होती. पण आज २०२४ निवडणुकीत त्यापैकी प्रकाश आंबेडकर यांचा अपवाद सोडला तर एक ही उमेदवार निवडणूक मैदानात दिसत नाही. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीला वाढविण्यासाठी अफाट कष्ट घेतलेल्या एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर झालेली नाही. या दोन्ही गोष्टी वंचितसाठी गौण असतील तर त्याबद्दल काही बोलायला नको. पण मग वंचित समाज घटकाला राजकीय हिस्सेदारी मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लढत आहे, अशा गमजा त्यांनी मारू नयेत. यातील दुसरा अन अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे निवडूण येण्याची कुठलीच शक्यता नसताना वंचितची उमेदवारी घेण्यासाठी उमेदवारांमध्ये लागलेली चढाओढ. जी महाविकास आघाडी व महायुतीत ही दिसत नाही. अन या चढाओढीच्या मागचे राजकारण ही समाजाला कळत नाही, असे वंचितच्या नेत्यांना वाटत असेल तर मूर्ख समाज नाही आपण स्वतः आहोत, हे ही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
निवडणुका या जिंकण्यासाठीच लढविल्या जायला हव्यात. त्या कुणाला फायदा व कुणाचे नुकसान करण्यासाठी लढविल्या जात असतील तर तो राजकीय धंदा असून मतांचे ठेकेदार हा धंदा अगदी छाती ठोकून करीत असल्याचे आजचे हे भयानक चित्र लोकशाहीला घातक आहे. याचा अनुभव या देशाला अनेक वेळा आला आहे. गेल्या निवडणुकीत ही आला व यावेळी ही येणार आहेच. यात काही शंका नाही.
संघटन नसताना, कुठलाही कार्यक्रम नसताना, जनतेच्या न्याय, अधिकारांसाठी सरकारच्या धोरणांविरुध्द जन आंदोलन व लढे लढत नसताना, तसेच इलेक्ट्रोरल बॉण्ड विकत घेणारे हात ही सोबत नसताना. अन मतदार ही नाहीत. तरी ही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या तोडीस तोड निवडणुका लढविणे सोपे नाहीतर अशक्य आहे. पण वंचित त्या लढवित असेल तर हा लोकशाहीचा खेळखंडोबा करण्याचाच प्रकार आहे. अन हा खेळखंडोबा संविधानाचे शिल्पकार व लोकशाही राज्य व्यवस्थेवर अफाट निष्ठा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन होत असेल तर यासाखे दुर्दैव दुसरे काहीच असू शकत नाही. खूप वेदना अन यातना देणारा हा प्रकार आहे. यासाठीच का डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक मेहनत घेऊन या देशात लोकशाही व संविधानाचे राज्य स्थापित केले ? हा प्रश्न अगदी खेदाने विचारावा वाटतो.
भ्रष्टाचारी, लूच्चे, लफंगे, दंगलखोर, गुन्हेगार, बलात्कारी उमेदवारांना धर्मांध, जातीयवादी, भांवलदारी व फॅसिस्ट विचारांचे पक्ष निवडूण येण्याचा निकष लावून उमेदवारी देत असतील तर ते आपण समजू शकतो. पण तसेच उमेदवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पक्ष देत असतील तर काय ? याचा विचार आपण करणार आहोत की नाही ? याचा ही विचार झाला पाहिजे. आंबेडकरी समाजाने तो केला पाहिजे. वंचितने शिरुरमध्ये दिलेला उमेदवार मोक्काचा आरोपी आहे. पुण्यातील हातोडा फेम वसंत मोरे दंगलखोर मिलिंद एकबोटेचा शिष्य आहे. अन २०१९ मध्ये उत्तर मध्य मुंबईतील वंचितचा उमेदवार अब्दुल रहमान अंजारिया हा तर धोकेबाज अन् बलात्कारी होता. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. असे उमेदवार दिले अन् ते निवडूण आले तर ते वंचित समाजाचे प्रतिनिधीत्व करतील, यावर आंबेडकरी विचारांचा अनुयायी विश्वास कसा काय ठेवेल व ठेवू शकतो ?
शेवटी एकच……राजकारण करा, राजकारणाचा धंदा करा. स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा सौदा करा. त्याला विका, कुणाच्या ही दावणीला, वळचणीला बांधा. हे सारे बिनधास्त करा. तुमच्याकडे ती कला आहे. पण ही कलाकारी करीत असताना आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत आहोत, याचा तरी किमान विचार करा. अन् काही मनाची, जनाची वाटतेय का ते ही बघा.


– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *