- 21
- 1 minute read
लक्ष लक्ष सह्याद्रीच्या… सातमाला पर्वत रांगातील…. वाघुरा नदीच्या वळणावर… कोरलेली जगप्रसिद्ध.. अजिंठा बुद्ध लेणीतील अविस्मरणीय क्षण…
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 46
लक्ष लक्ष सह्याद्रीच्या... सातमाला पर्वत रांगातील वाघुरा नदीच्या वळणावर कोरलेली जगप्रसिद्ध.. अजिंठा बुद्ध लेणीतील अविस्मरणीय क्षण...
संपूर्ण जम्मू-दीपातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात कोरलेल्या असंख्य लेण्या त्यांत जपलेला धम्म कालाच्या ओघात आज जरी नष्ट झाला असला तरी गतवैभव असलेल्या या विरान खंडार लेण्या आज आपण सर्वीकडेच पाहतो स्वकीयांच्या परकीयांच्या आक्रमणात युद्धाचे केंद्र झालेल्या घोडे बांधण्यापासून सैन्याच्या छावण्या झालेल्या त्या कधी कुठे कुठे दिसतात अतिक्रमण परिवर्तन या सर्वांची साक्ष असलेली ही हजारो प्राचीन बौद्ध स्थळे… पुरातन खात्याच्या ताब्यात आजही आहेत… काही ठिकाणी त्यात देवी देवतां स्थापन झाल्यात… यात्रा जत्रा सुरू झाल्यात… पालख्यांमधून मिरवणूक निघतात…. लेणीला नवी ओळख मिळाली आहे…. कित्येक लेण्या जागृत देवस्थान झाली आहेत… त्यावर विश्वस्त मंडळ स्थापन झाली असून… लेणी परिसरात मोठ्या मोठ्या इमारती स्थापन झाल्या आहेत… हजारो भाविक दर्शनाला येऊ लागले आहेत… लेणी परिसरात मंदिरे उभारली गेली आहेत… मूर्तीची स्थापना केली… मुखवटे लावले गेले आहेत.. या सर्वांपासून अलिप्त असलेल्या… एका लेणीच्या चैत्यगृहामध्ये… सह्याद्रीच्या डोंगरकड्यांत, शांत सावलीत, उंच कड्यांच्या कुशीत
इथे धम्माची पावलं इतिहास म्हणून नाही, तर अनुभव म्हणून ठामपणे उमटलेली आहेत… तो पाहण्याचा मला योग आला…. त्या दिवशी मात्र काहीतरी विलक्षण घडलं….
पहाटेचं कोवळं ऊन चैत्यात शिरलं… गवाक्षातून उतरलेले सूर्याचे सुवर्ण किरण थेट स्तूपावर स्थिरावले… क्षणात संपूर्ण लेणी सोनेरी तेजाने न्हाऊन निघाली… तो प्रकाश केवळ सूर्याचा नव्हता… तो दोन हजार वर्षांच्या साधनेचा, मौनाचा आणि करुणेचा प्रकाश होता…. मी चैत्यगृह मध्ये उभा होतो… भिंतींवर कोरलेली बोधिसत्त्वांची चित्रं शांतपणे माझ्याकडे पाहत होती… सारं काही अद्भुत.. नेत्र दीपक.. मोहक… भारावून टाकणार अविस्मरणीय अप्रतिम … तेजस्वी होतं… मी जरा डोळे बंद केले… दोन हजार वर्षापूर्वी कसं असेल हे समजून घेण्याकरता…. आणि क्षणार्धात, दोन हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध धम्म माझ्या अंतर्मनात जिवंत झाला….
चैत्याच्या थंड दगडांना हात टेकवता… त्या स्पर्शातच स्थैर्य उतरलं…. हवेत पटिमोक्ख सूत्राचा मंद गूंज ऐकू आला…
पहाट उजाडत होती… उपोसथ शिस्तीनुसार भिक्षू रांगेत बसले होते… डोकी मुंडन केलेली होती… काषाय वस्त्र अंगावर होतं… प्रत्येकाचा श्वास आनापानसति ध्यानात स्थिर होता… मन निर्मळ होतं… एकाग्र होतं… विनयपिटकाच्या नियमांनुसार प्रत्येक भिक्षूने भिक्षापात्र उचललं… भिक्षाटनासाठी पावलं चैत्याबाहेर वळली… लेणीच्या पायथ्या जवळील दरीतल्या गावांकडे निघाले…
*“भवन्तु सब्बे भिक्खू सुखीत्ता”*
हा मंगल उद्घोष हवेत दरवळत होता… घराघरांतून भात, भाकरी, भाज्या मिळाल्या इत्यादी भोजन भिक्षापात्रात घेऊन… लेणीच्या मार्गाने चालू लागले होते… त्या अन्नाचा सुगंध जंगलातील त्या छोट्याशा पायवाटेत दरवळत होता… झाडे पशु पक्षी त्या सुगंधात उल्हासिक मंत्रमुग्ध होऊन गेले…
भिक्षू परतले… प्रातरान भोजन झालं… भोजनानंतर सर्वजण विहारात बसले… थोडीशी विश्रांती घेतली.. त्या क्षणी मला धम्माचं पहिलं तत्त्व स्पष्ट जाणवलं… शुद्धता, संयम आणि सम्पसादनियं कर्म…
दुपार झाली… ध्यानाची वेळ आली… मशालांचा सौम्य प्रकाश स्तूपाभोवती फिरत होता… परिभ्रमण सुरू होतं… भिंतींवरून धम्मचक्कप्पवत्तन सुत्ताचे शब्द प्रतिध्वनित होत होते….
वितक्क-विचार विरले… अंतर्मन प्रसन्न झालं…. त्या क्षणी भिंतीवरील पद्मपाणी बोधिसत्त्व जणू हलकेसे हसले…
करुणा आणि मैत्री ध्यानात सामील झाल्यासारखी वाटली…
इथे धम्माची शिस्त स्पष्ट दिसत होती… अष्टांगिक मार्ग प्रत्यक्ष जीवनात उतरलेला होता.. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयास, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी….
साधेपणात जगणं… काम, द्वेष आणि मोहापासून दूर राहणं…
मग दृश्य बदललं.
हत्तींवर बसून शाही परिवार आपल्या सर्व सेवकांसह लेण्यांकडे निघाला दिसू लागला… एका मागोमाग एक… एका मागोमाग एक.. असंख्य हत्ती रांगेत चालले होते… हत्तींच्या पायांवर, अंगावर, कपाळावर सोन्या-रुप्याची आभूषणं झळकत होती… घंटांचे मंद नाद दरीत गुंजत होते.. शाही परिवाराने शाही आभूषणं परिधान केली होती… रेशमी वस्त्रं, मुकुट, हार.. पण चेहऱ्यावर गर्व नव्हता; नतमस्तक भाव होता… ते स्तूपाला वंदन करायला आले होते… राजसत्ता, संपत्ती, सैन्य.. सगळं बाजूला ठेवून धम्मासमोर लीन होण्यासाठी आले होते… तोच तो क्षण होता…
जिथे सत्ता झुकते आणि सत्य उभं राहतं… आणि मग… ती गहिरी शांतता… आकाशातून फुलांची उधळण सुरू झाली…
पांढऱ्या कमळांच्या पाकळ्या, चाफ्याचा मंद सुवास,
मोगऱ्यांचे कोमल देठ…फुलं जमिनीवर पडत नव्हती…
ती हवेत तरंगत होती… जणू गंधर्व पुष्पवृष्टी करत होते… त्या पुष्पवृष्टीच्या मध्यभागी भगवान बुद्ध विराजमान होते… डोळे अर्धवट मिटलेले… करुणेने भरलेली शांत मुद्रा…. सर्व दुःख सामावून घेणारी स्थिरता… चरणांखाली नागराजे…
दोन्ही हातांनी कमल पुष्पा चा देठ पकडलेले, पण भाव समर्पणाचा; मुच्चलिंद कथेसारखं रक्षण… बाजूला विदेशी राजे नतमस्तक… भगवान बुद्ध विराजमान झालेल्या कमळाच्या फुलाच्या देठाला पकडलेले.. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी वस्त्रं.. पण भाव एकच… इथून एकच सत्य स्पष्ट होतं.. धम्म सार्वत्रिक आहे….
माझ्या आजूबाजूला बोधिसत्त्व प्रकट झाले… अवलोकितेश्वर… करुणेचं सजीव रूप… पद्मपाणी… हातातील कमळात प्रज्ञेची चमक….वज्रपाणी…. धम्माचं अजेय बळ, पण रागरहित….तारा… मातृत्वाची शांत उपस्थिती… क्षितिजगर्भ… अंधारात आशेचं बी पेरणारे… मैत्रेय… भविष्यबुद्ध; आजच्या मनात जागं होणारं धम्मबीज…. इत्यादी… आणि.. पुढे अंधार दिसू लागला… गतवैभव… आपल्याच लोकांच्या हातातून परकीयांच्या हातात हस्तांतरित होताना पाहिलं… दहशत लूट.. हिंसा.. पलायन… युद्ध.. विरान… खंडर… सारस दिसलं… कालानी त्यावर मातीचा थर चढवला… ऊन पाऊस वाराने हा थर अजून जाड झाला… धरतीने लेणी आपल्या पोटात सामावून घेतली… कित्येक वर्ष कोणीच फिरकल नाही… एका इंग्रज अधिकाऱ्याच्या बंदुकीच्या गोळीने… सन १८१९ मध्ये लेणीमध्ये घर करून बसलेले असंखपक्षी आकाशात उडाले… इंग्रज अधिकारी पक्षी कोणत्या दिशेला उडत आहेत त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पाहिले… एका डोंगराच्या छोट्याशा भोकामधून असंख्य पक्षी एका मागे एक उडत होते… त्याने सोबत असलेल्या लोकांना आजूबाजूची माती बाजूला करण्याचा आदेश देऊन स्वतःही मातीचा थर उपसू लागला… त्याला लेणीचे भव्य प्रवेशद्वार दिसले… तो त्या विशाल लेणीमध्ये गेला… लेणीतील आतील दृश्य पाहून तो अचिंबित झाला… अद्भुत, नेत्र दीपक, अप्रतिम… अप्रतिम… अप्रतिम… मोहक, भारावून टाकणारी लेणी पाहून खूप आनंदी झाला… लेणीच्या दहाव्या खांबावर.. त्यांनी त्याची सही केली… John Smith, 28th Cavalry, 1819… कित्येक वर्ष एका मागून एक पुढे सरली… रॉबर्ट गिल.. जॉन ग्रिफिथ्स… लेडी हेरिंगहॅम… अजिंठा चित्रांच्या रंगछटा… जपून प्रतिकृती तयार करताना… सातत्याने दहा वीस तीस… वर्ष… कित्येक शतक.. शतके.. आज देखील.. लेणीतील प्रत्येक शिल्प आपल्या हाताने कागदावरती उतरून घेताना दिसले… इंग्लंडला त्याचे भले मोठे प्रदर्शन भरले… जगभरात पुन्हा एकदा बौद्ध धम्म आणि त्याचे शिल्प पोहोचले… कित्येक राजे नबाब यांनी या अविस्मरणीय लेण्यांना भेट दिली… दान दिले… लेणी पूर्ण स्थितीत आणण्याचे प्रयत्न केले…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील… या लेणीत आलेले दिसले… पुढे समतेचा बुद्ध धम्म… पुन्हा भारतात प्रस्थापित करताना.. 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमीवर बाबासाहेब दिसले.. 15 ऑक्टोबर 1956 च्या भाषणातले… बाबासाहेब दिसले… सहा डिसेंबर 1956 च्या.. महापरिनिर्वानातले बाबासाहेब दिसले… त्यांच्या महापरिनिर्वानाला साक्ष मानून गावाकुसा बाहेरील दीन दलित… समाजाने नाकारलेल्या.. पिढ्यान पिढ्यांच्या उपेक्षित… समाजात.. माझ्या माय बापासह… माझे सर्व पूर्वज पुन्हा बौद्ध धम्मात धर्मांतर करताना दिसले… संपूर्ण भारत बौद्धमय होत असल्याचे दिसते… मी माझ्या सारखे असंख्य माझे बांधव लेण्यांवरती पुन्हा बुद्ध वंदना घेताना दिसले… *”…नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस…”*
मशालांचा प्रकाश मंद झाला… भिंतींवर सावल्या हलू लागल्या… भिक्षूंच्या श्वासात माझा श्वास मिसळला… भिक्षाटनाची सकाळ, धम्मोपदेशाची दुपार, ध्यानाची रात्र…
सगळं मी मनापासून अनुभवलं… हे कल्पनाविलास नव्हता…
हे होतं २५०० वर्षाचा धम्माचा प्रवास… उमगलेलं जिवंत सत्य… मी अजून त्या लेणीच्या चैत्यगृहात होतो…
मी डोळे उघडले… समोर विशाल स्तूप होता… चैत्यगृहाच्या खांबांवरती बुद्धांची रंगीत चित्र होती, नि:शब्द… पण माझ्या आत… फुलांची उधळण अजूनही सुरू होती…. मी अजिंठाच्या दहा नंबरच्या लेणीतून पुढे निघण्यापूर्वी लेणी अभ्यासाला सुरुवात केली…
अजिंठा लेणी…सह्याद्रीच्या कुशीत, वाघुरा नदीच्या वळणावर कोरलेल्या ३० लेण्या… खडकांच्या आत धम्माची ही दोन हजार वर्षांपूर्वीच्या बौद्ध भिक्षूंच्या जीवनाची साक्ष देतात. पहिल्या टप्प्यात (इ.स.पू. २रे शतक ते इ.स. १ले शतक) सातवाहन राजांच्या काळात हिनयान चैत्य आणि विहार कोरले गेले. दुसऱ्या टप्प्यात (इ.स. ५वे-६ठे शतक) गुप्त काळात महायान भित्तीचित्रे आणि बोधिसत्त्व मूर्तींनी सजली…मी लेणी अभ्यासाला सुरुवात केली…क्रमाने प्रत्येक लेणी उलगडत गेलो. डोळे डोळे हळूहळू उघडे केले… तेव्हा चैत्यगृह जिवंत झालं. आणि मी…
लेणी क्रमांक १ समोर पद्मपाणीची करुणा (महायान, इ.स. ५वे शतक) ही एक भव्य विहार लेणी पहात होतो. मुख्य सभामंडपात २० कोरीव स्तंभ, त्यांवर विविध जातककथांचे संकेत…. *भिंतींवरचं सर्वात प्रसिद्ध चित्र पद्मपाणी बोधिसत्त्व. डाव्या हातात अमृतकलश, उजव्या हातात कमळ* करुणेचं, प्रज्ञेचं प्रतीक. इथे “महाजनक जातक”, “शिबी जातक” यांचे संकेत आढळतात… हे चित्र पाहताना वाटतं… करुणा ही शिकवण नाही, ती स्थिती आहे. तिथून पुढे आम्ही..
लेणी क्रमांक २ मध्ये गेलो… मातृत्वाची करुणा (महायान)
हीही विहार लेणी. भिंतींवर जातककथा, विशेषतः हरिण जातक, हंस जातक. स्त्रियांची, राजकन्यांची, सेविकांची भावपूर्ण चित्रं. इथे करुणा आईसारखी वाटते… मूक, पण सर्वसमावेशक. पुढे आम्ही…
लेणी क्रमांक ३ पाहिली.. अपूर्ण, पण बोलकी (महायान)
ही लेणी पूर्ण झाली नाही…. पण अर्धवट स्तंभ, न कोरलेली भिंत, अपूर्ण गर्भगृह… हे सगळं सांगतं की धम्म हा प्रक्रियेत असतो, पूर्णत्वात नव्हे… तेथूनच पुढे आम्ही
लेणी क्रमांक ४ सर्वांत विशाल विहार (महायान, इ.स. ६वे शतक) ३५ x २८ मीटरचा प्रचंड विस्तार पाहिला.. त्यात २८ स्तंभ, भिंतींवर आठ महाभय निवारण करणाऱ्या बुद्ध प्रतिमा…. छत कोसळलेलं असतानाही कलाकारांनी पुन्हा खणलं… धम्मासाठी श्रम थांबत नाहीत, हेच सांगण्यासाठी…. तेथून पुढे आम्ही…
लेणी क्रमांक ५ मध्ये गेलो… (महायान) अपूर्ण विहार.
बोधिसत्त्वांच्या अर्धवट मूर्ती पाहिली… जणू ध्यानात प्रवेश करण्याआधीचा क्षण… तेथून पुढे आम्ही…
लेणी क्रमांक ६ पोहोचलो.. नागराज आणि ध्यान (महायान)
ध्यानस्थ बुद्ध, पाठीशी नागराज मुच्चलिंद. ही मुच्चलिंद सूत्रकथेची दगडी साक्ष. रक्षण, स्थैर्य आणि मौन..तीनही एकत्र. पाहून आम्ही पुढे…
लेणी क्रमांक ७ च्या भव्य प्रवेशद्वार (महायान) भव्य तोरण, आत २५ बुद्ध मूर्ती पाहिल्या इथे बुद्ध बहुवचनात दिसत होते… एक नाही, अनेक; पण सत्य एकच… तेथून पुढे आम्ही…
लेणी क्रमांक ८ मध्ये गेलो.. हीनयानची शांतता अनुभवत
एकअपूर्ण विहार पाहिले… आणि तेथून पुढे आम्ही
लेणी क्रमांक ९ हीनयान चैत्य (इ.स.पू. २रे शतक) अर्धवर्तुळाकार सभागृह. २३ स्तंभ, मागे स्तूप.
भिंतींवर जातककथा रंगवलेल्या पाहिल्या….
तिथून पुढे आम्ही….
लेणी क्रमांक १० जिथे मी माझे डोळे बंद करून उभा होतो तेथे आलो.. सर्वांत प्राचीन चैत्य (इ.स.पू. २रे शतक)
१८.२४ x ८.०४ मीटर. घोड्याच्या नालासारखं प्रवेशद्वार. पहाटेचं ऊन थेट स्तूपावर पडतं.. आणि दोन हजार वर्षांची साधना उजळून निघते… ते मी पाहिलं होतं… तेथून पुढे मी…
लेणी क्रमांक ११ मध्ये आलो तेथे गर्भगृहाची शांतता (महायान) ध्यानस्थ बुद्ध प्रतिमा पाहिली.. इथे शब्द गळून पडतात, फक्त श्वास उरतो… अनुभवून तेथून पुढे मी…
लेणी क्रमांक १२ व १३ हीनयान विहार पाहिली..
साधे, मितभाषी. भिक्षूंच्या दैनंदिन जीवनाची साक्ष देणारी पाहून तिथून पुढे मी…
लेणी क्रमांक १५ व १५-अ मध्ये आलो… भित्तीचित्रे, अपूर्ण रचना. धम्माचा संक्रमणकाळ इथे दिसतो. तो पाहून तेथून पुढे मी…
लेणी क्रमांक १६ मध्ये आलो
राजे, सम्राट, गंधर्व सर्व धम्मासमोर नतमस्तक. झालेले पाहून तेथून पुढे मी…
लेणी क्रमांक १७ मध्ये आलो तेथे वज्रपाणी बोधिसत्त्व
अजेय बळ, पण रागरहित. शक्ती आणि करुणा एकत्र पाहून तिथून पुढे मी..
लेणी क्रमांक १८ अपूर्ण, पण अर्थपूर्ण इथे अपूर्णतेतही संदेश देणारी लेणी पाहून तेथून पुढील…
लेणी क्रमांक १९ मध्ये आलो.. महायान चैत्य प्रवेशद्वारावर बुद्ध प्रतिमा… महापरिनिर्वाण, माराचे आक्रमण जीवन आणि मुक्ती यांचं दर्शन पाहून मी…
लेणी क्रमांक २० ते २५ लेण्यांमध्ये आलो.. या लेण्या लहान विहार, ध्यान बुद्ध, जलदेवता, नागराज विशेषतः लेणी २४—भव्य, पण अपूर्ण लेणी पाहून पुढे मी..
लेणी क्रमांक २६ मध्ये आलो.. करुणेचा विस्तार
तारा बोधिसत्त्व, मैत्रेय. भविष्यातील बुद्ध पाहून पुढे मी..
लेणी क्रमांक २७, २८, २९ क्रमांकाच्या अपूर्ण. लेण्या पहिल्या… आणि आम्ही
लेणी क्रमांक ३० ही आकाराने लहान पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची लेणी पाहिली. ती हिनयान काळातील असून भिक्षूंच्या निवासासाठीचा लहान विहार आहे. आतमध्ये तीन कक्ष असून दगडी पलंग दिसतात. काही अभ्यासकांच्या मते ही अजिंठातील सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक असू शकते…. असं सर्व पाहून… हे सर्व सगळ्या जगाला ओढून ओढून सांगावसं वाटलं.. बस… एवढेच आपला विश्वासू…
-विकी वामन येलवे
0Shares