- 769
- 1 minute read
संविधान बदलायला निघालेल्या संघ, भाजपला तथाकथित आंबेडकरवादी व पोटार्थी पँथरची ही साथ…!
मनुवादी व्यवस्थेने या देशाला कधीच एकसंघ ठेवले नाही की, देशवाशियांमध्ये राष्ट्रीय प्रेम निर्माण होऊ दिले नाही. त्यामुळेच साता समुद्र व वाळवंट पार करुन आलेल्या विदेशी शक्तींनी या देशावर शेकडो वर्ष राज्य केले. या मनुवाद्यांनी या शक्तींशी समझोता करुन या देशाला व देशातील जनतेला गुलाम बनविले. हा पराभूत भारताचा इतिहास आहे. मग या देशाला शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानाने, काँग्रेस, महात्मा गांधी यांच्या संघर्षाने स्वातंत्र्य मिळवून दिले. तर या स्वातंत्र्य देशाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान व लोकशाही या दोन अनमोल गोष्टी दिल्या. स्वातंत्र्य भारत डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालत असून याच संविधानाने या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय भावना पहिल्यांदाच निर्माण केली. सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आणले. हेच इथल्या मनुवाद्यांना खटकत आहे.समतेच्या तत्वाला विरोध असल्यानेच त्यांनी संविधानाला ते तयार होत असल्यापासून विरोध केलेला आहे. हा पण एक इतिहास आहे. याच मनुवादी शक्तींचा तिरंगी ध्वजाला विरोध आहे. सर्व नागरिकांना सर्व प्रकारची संधी देणाऱ्या लोकशाहीला विरोध आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या या दोन्ही गोष्टी संपवून त्यांना या देशात पुन्हा हिंदू राष्ट्राच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्था आणायची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा हा उघड व जाहीर अजेंडा आहे. अन् त्यासाठीच त्यांना ४०० पेक्षा अधिक जागा हव्या असून तथाकथित काही आंबेडकरवादी व पोटार्थी पँथर अशा वेळी ही भाजपसोबत आहेत, हे फार मोठे दुर्दैव आहे.
देश, समाज कुठला ही असो. तेथे दोनच विचारधारा प्रामुख्याने काम करतात. शोषण करणाऱ्यांची एक विचारधारा असते. अन् त्या शोषणातून मुक्तीचा लढा, संघर्ष करणारी दुसरी विचारधारा असते. प्रतिक्रांती – क्रांती, क्रांती – प्रतिक्रांती असे आपण त्यास म्हणू शकतो. आपल्या देशात आज प्रतिक्रांतीचे नेतृत्व संघ, भाजप करीत असून तिचा चेहरा मोदी व भागवत आहे. तर क्रांतीचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीत असून संविधान, लोकशाही अन आंबेडकर स्वतःच क्रांतीच्या लढयाचे चेहरा आहेत. हे सत्य इतके उघड असताना रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व फोटो वापरून काही दलाल भाजपच्या ४०० पार नाऱ्याची साथ देत आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, हे खेदाने नमूद करावे लागते. तसेच हे फारच क्लेशकारक असल्याच्या भावना आंबेडकरी समाज व चळवळीतील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
संविधान, लोकशाही, देशाची एकता, अखंडता अन या देशातील १४० कोटी पेक्षा अधिक नागरिकांचे भवितव्य ठरविणारी निवडणूक देशात होत आहे. संविधान बदलून मनुवाद आणण्यासाठी भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. त्या मिळविण्यासाठी ते करो अथवा मरोची लढाई लढत आहेत. पुढील वर्षी संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होतील, तेव्हा त्यांना या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करायचे आहे. ते होईल तेव्हा संविधान, लोकशाही व संवैधानिक अधिकारांना आपण मुकलेलो असू. याचे स्पष्ट संकेत मोदीने आपल्या १० वर्षाच्या सत्ताकाळात दिले आहेत. विषाची परिक्षा घेण्यात शहाणपण नसते. तरी ही निळे ध्वज, झेंडे घेऊन काही रिपब्लिकन नेते, पँथरचा काहीही संबंध नसलेले तथाकथित पँथर तुकड्यासाठी संघ व भाजपला साथ देत आहेत. हे खुलेआम पहायला मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात दशकभरातच सत्तेच्या तुकड्यासाठी काही नेत्यांनी आंबेडकरी विचार व चळवळीशी गद्दारी केली. पण ती पोकळी भरून काढणारी दुसरी फळी लगेच तयार झाली व तिने या चळवळीचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. यामध्ये पँथरचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. ऐतिहासिक ब्लॅक पँथरपासून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व सामाजिक न्यायाचा लढा पुढे घेऊन जाण्याचे तितकेच ऐतिहासिक काम या पँथरने केले. पँथरची स्थापना व विसर्जन हा काळ केवळ दोनच वर्षाचा राहिला असला तरी पँथरचा ठसा, दहशत अन् दरारा कायम धर्मांध व जातीयवादी शक्तीं समोर राहिला.
१९७०, ८० अन् ९० च्या दशकापर्यंत पँथरचा वचक राहिला. या चळवळीने अनेक नेते, साहित्यिक, विचारवंत अन् पँथर निर्माण केले व घडविले. नामदेव ढसाळ, राजा ढाले,भाई संगारे, अविनाश महातेकर यांना नेते, विचारवंत, साहित्यिक ही ओळख याच पँथरने दिली. अन्याया विरोधात लढण्याचे बळ ही नावं सतत आंबेडकरी विचारांच्या तरुणांना देत राहिली. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हेच तरुण जीवाची पर्वा न करता लढले. पुढील पिढीत गंगाधर गाडे, प्रा .अरुण कांबळे यांनी या चळवळीचे नेतृत्व यशस्वीपणे केले.
आपल्या न्याय, हक्क, अधिकारांसाठी मरायला व मारायला ज्या चळवळीत तरुण तयार असतात, ती चळवळ कधीच आपली लढाई हारत नाही. पराभव तिला मान्य नसतो. पण ती चळवळ ही प्रस्थापित व सत्तेची बटिक होते. त्यावेळी तिचे काय होते. ते आपण ९० च्या दशकापासून पाहत आहोत. स्वतःला पँथर म्हणणारे अनेक लाचार पँथर व रिपब्लिकन नेते संविधान बदलायला निघालेल्या भाजपला चिंधीसाठी साथ देताना आज दिसत आहेत. हेच पाहण्यासाठी शहीद भागवत जाधव, पोचीराम कांबळे आदींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले का ? याच साठी पँथर नेते भाई संगारे यांनी शहादत दिली का ? हे प्रश्न उभे राहतात. मनाला खूप अस्वस्थ अन् बैचन करतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी ही इतके कृतघ्न वागणारे लोक याच आंबेडकरी विचारांच्या चळवळीचे भाग आहेत, ही चिंतेचा भाग तर आहेच पण हे ऐकायला ही भयंकर वाटते.
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)