• 22
  • 1 minute read

सत्यशोधकांची धगधगती ज्वाला “बाबा” अखेरचा क्रांतिकारी सलाम .

सत्यशोधकांची धगधगती ज्वाला “बाबा” अखेरचा क्रांतिकारी सलाम .

सत्यशोधकांची धगधगती ज्वाला “बाबा” अखेरचा क्रांतिकारी सलाम .

सत्याचा शोध,सत्याचा मार्ग, आणि उभे आयुष्य सत्याच्या संघर्षात स्वतःला वाहून घेणारे लढवय्ये क्रांतिकारी सत्यशोधक बाबा आढाव येणाऱ्या पिढ्यांचे प्रेरणास्थान असतील .
 
बाबा आढाव यांच्या आयुष्याची मुळे सत्यशोधक चळवळीमध्ये घट्ट रोवलेली होती. महात्मा जोतीराव फुले यांचा सामाजिक समतेचा विचार, सावित्रीबाई फुले यांची शिक्षणक्रांती, शाहू महाराजांची प्रगतिशील धोरणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मानवमुक्तीची तत्त्वे या चौघांच्या विचारांची सांगड बाबांच्या मनात आणि कृतीत दिसून येते.
 
आपल्या कार्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी “एक गाव एक पाणवठा” या चळवळीत भाग घेऊन जातीय विभाजनाच्या भिंती कोसळवण्याचा ठोस प्रयत्न केला. गावातील सर्व समाजघटकांना समानतेने पाणवठ्याचा अधिकार मिळावा, या अत्यंत मूलभूत पण अत्यावश्यक मागणीत त्यांचे सत्यशोधक बीज पूर्णत्वाने फुलताना दिसते.
संघर्ष, संवाद आणि संयम या तीन गोष्टींचा उत्तम मिलाफ बाबांच्या कामात दिसतो. अन्यायाच्या विरोधात उभे राहणे, कठोर भूमिका घेणे आणि सत्ताधाऱ्यांना उत्तरदायी धरणे याबाबत ते कधीच तडजोड न करणारे ठाम नेते होते.यातूनच त्यांनी श्रमिक चळवळींना नवा चेहरा दिला.
 
औद्योगिक क्षेत्रात संघटना होत्या; पण असंघटित क्षेत्रातील मजुरांना तर कोणतीही ओळखच नव्हती. हाच वर्ग बाबा आढाव यांच्या लढ्याचा केंद्रबिंदू होता. कासाईवाडा कामगार आंदोलन, समता रोजगार चळवळ या त्यांच्या प्रमुख संघटना आणि चळवळी आजही असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आदर्श मापदंड ठरतात. कातकरी, भिल्ल, वडार, पारधी आणि इतर भटक्या-विमुक्त जमातींच्या समस्यांना त्यांनी उचलून धरले. शोषण, कर्जबाजारीपणा, निवाऱ्याचा अभाव, शिक्षणातील दरी आणि पोलिस-प्रशासनाकडून होणारा छळ या सर्व प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष उभारला.
 
“कामगार म्हणजे फक्त कारखान्यातील मजूर नव्हे; श्रम करणारा प्रत्येक मनुष्य हा कामगारच आहे” हे त्यांचे वाक्य असंघटित क्षेत्राच्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी बदलणारे ठरले. त्यांच्या चळवळींमुळे मजुरांना किमान वेतन, कल्याणकारी मंडळे, सामाजिक सुरक्षा, शिक्षण, आरोग्य आणि शासनाशी संवाद यांसाठी मार्ग खुला झाला. आज राज्यातील विविध श्रमकल्याण योजनांचा पाया त्यांच्या लढ्यांतूनच तयार झाला आहे.
जातीय समता, काष्ठाची भाकर कार्यक्रम, शिक्षणविस्तार, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी जागृती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन या सर्व क्षेत्रांत त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचणारे उपक्रम राबवले. फुले–आंबेडकरवादी विचार हे फक्त पुस्तकात नसून लोकांच्या जीवनात उतरले पाहिजेत,या भूमिकेने त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांचे कार्य हे केवळ आंदोलनात्मक नव्हते, तर लोकजीवन सुधारण्याचे सामाजिक प्रबोधनही त्यात दिसते.
 
त्यांनी अनेकदा अटक, खटले आणि तुरुंगवासही भोगला, पण त्यांच्या जिद्दीला कुठेही तडा गेला नाही. हजारो मजुरांसह त्यांनी मोर्चे, सत्याग्रह, धरणे, पदयात्रा आयोजित केल्या. प्रशासनाशी संवाद साधताना ते शांत, तर्कसंगत आणि अभ्यासू भूमिका घेत; पण अन्यायासमोर ते लोखंडासारखे कठोर उभे राहत.
महाराष्ट्रातील मजूर चळवळींत हमाल पंचायत ही अत्यंत महत्त्वाची संघटना आहे. बाजारपेठ, मंडई आणि गोधामांमध्ये काम करणारे हमाल अनेक वर्षे अस्थिर मजुरी, दलालशाही, आरोग्यसुरक्षेचा अभाव आणि सामाजिक उपेक्षा यांना सामोरे जात होते. त्यांच्या श्रमाला किंमत आणि सन्मान मिळावा,न्याय्य दर मिळावेत, ओळखपत्रे व कल्याणकारी सुविधा मिळाव्यात यासाठी हमाल पंचायतने सातत्याने संघर्ष केला. या संघटनेमुळे हजारो हमालांना आर्थिक सुरक्षितता आणि श्रमिक म्हणून ओळख मिळाली.
 
या वास्तवाशी जोडली गेलेली संकल्पना म्हणजे “कष्ठाची भाकर “ दिवसाचे बारा तास कष्ट करून मिळणारा तुटपुंजा घास ही या शब्दांची व्यथा आहे. श्रम, घाम, वेदना आणि असुरक्षिततेतून मिळणारी भाकर म्हणजे कष्ठाची भाकर असंघटित मजूर जगतातील कडवे सत्य. हमाल पंचायतची लढाई म्हणजे या कडव्या भाकरीत सन्मान, हक्क आणि सामाजिक न्याय आणण्याचा प्रयत्न. श्रमिकांच्या जीवनात मानवी प्रतिष्ठा निर्माण करण्याचा हा संघर्ष आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
 
सिद्धार्थ साठे
0Shares

Related post

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल काही दिवसापूर्वी ग्रामीण भागातील एक तरुण मित्राने मेसेंजर मध्ये विचारले “सर…
”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग भारतीय विमान वाहतूक सेवेची जगभर नाचक्की झालेल्या “इंडिगो” प्रकरणाचा गाभ्यातील ‘इश्यू’ नेमका…
”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग  ‘नेव्हर वेस्ट अ गुड क्रायसिस’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. याचा अर्थ असा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *