महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४९ (२७ जुलै २०२४)
‘स्वातंत्र्या (Liberty)’, नंतर डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक मानवतावदाचा, ‘समता (Equality)’, हा दूसरा आधार आहे. समता आणि स्वातंत्र्य हे परस्परसंबंधीत आहेत. सर्वप्रथम सामाजिक समता असणे आवश्यक आहे. नागरिकांचे हक्क जितके समान असतील तितके ते स्वातंत्र्याचा अधिक उपभोग घेऊ शकतील. स्वातंत्र्याचे उद्दिष्ट जर साध्य करायचे असेल तर त्यासाठी समानता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे बाबासाहेब म्हणतात.
समाजातील सर्व व्यक्ति समान नाहीत, ही वास्तविकता आहे. प्रत्येक व्यक्तिमध्ये काही व्यक्तिगत भिन्नता असते. प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा, भावना आणि प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना करने योग्य नाही, ही गोष्ट बाबासाहेब मान्य करतात. परंतु, जेथे व्यक्तींच्या काही सामान्य वैशिष्ट्यांचा प्रश्न निर्माण होतो तेथे समतेच्या सिद्धांताचा स्वीकार केला पाहिजे. सर्व व्यक्तींना समान मानणे हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. जाती, धर्म, लिंग, वर्ग, राष्ट्रीयता आदींमध्ये व्यक्तिव्यक्तीत भिन्नता असली तरी, सर्व व्यक्तींमध्ये सामान्यतः एक विशेषता आहे, ती म्हणजे सर्व लोकांमध्ये बुद्धी आहे. या दृष्टिकोनातून सर्व व्यक्ति मानव समाजाच्या किंवा बौद्धिक समाजाच्या सदस्य आहेत. म्हणूनच समानतेचा सिद्धांत हा व्यक्तींच्या सामान्य अशा वैशिष्ट्यांमधून निर्माण होतो.
समतेच्या तत्वाला व्यावहारिक स्वरूप कसे प्राप्त करून देता येईल, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. “समता’, हा एक फक्त विचार नाही की ज्याचा केवळ विचारांमधून अनुभव घेता येईल. याकरिता व्यावहारिक मापदंडाची आवश्यकता आहे. मानव हा समाजशील आणि बौद्धिक प्राणी आहे. त्यानी आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संस्थांची रचना अशा प्रकारे केली पाहिजे की ज्याद्वारा समतेची भावना प्रबळ होईल आणि अनावश्यक अशा प्रकारची असमानता दूर होईल. त्याकरिता सर्व लोकांनी समतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
भारतीय समाजव्यवस्था ही प्रामुख्याने विषमतेवर आधारित आहे. जाती आणि वर्णव्यवस्था ही संपूर्णपणे असमानतेच्या तत्वावर उभी आहे. जाती आणि वर्णव्यवस्थेतील श्रेष्ठ जाती आणि वर्णाचे विशेष अधिकार आणि कनिष्ट जाती व वर्णाच्या लोकांना दिलेली विषम वागणूक लक्षात घेऊन बाबासाहेबांनी या व्यवस्थेला शह देण्यासाठी समानतेच्या तत्वांचा पुरस्कार केला. समानतेच्या तत्वांचा पुरस्कार केल्याशिवाय जाती आणि वर्णाचे माहात्म्य नष्ट होणार नाही यांची त्यांना स्पष्ट जाणीव होती. त्याकरिता कर्तव्य आणि अधिकारांमध्ये संतुलन असले पाहिजे. त्याशिवाय न्यायावर आधारलेल्या समाजाची स्थापना होणे अशक्य आहे.
ज्या ठिकाणी विषमता असेल तेथे हिंसा आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा विषमताप्रधान समाजामध्ये अशांतता निर्माण होते. म्हणून, बाबासाहेबांनी अशा विषमतेप्रधान व्यवस्थेला विरोध केला आणि शांतता व न्यायावर आधारलेली व्यवस्था टिकवून ठेवण्याकरिता समान अधिकाराचा आग्रह धरला. कायद्याची समानता व समान राजकीय अधिकारांवर त्यांनी विशेष भर दिला.
समतेच्या तत्वाचे महत्व लक्षात घेऊनच बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये, ‘समता’, या तत्वाचा समावेश केला. संविधानाच्या कलम १४ आणि १६ नुसार बाह्यरूपात समतेच्या सिद्धांताला क्रमशः ‘ कायद्यापुढे समता’ आणि ‘संधीची समानता’ याबरोबर जोडले आहे. परंतु, आंतरिक रूपात त्यास बघितले तर ती मूलतः सामाजिक समतेच्या व्यवहाराची प्रवृत्ती आहे. राज्यघटनेमधील समतेचा सिद्धांत हा जाती, वंश आणि धर्माच्या आधारावरील सर्व प्रकारच्या भेदभावाचा अंत करतो. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तिद्वारा सन्मान करणे ही गोष्ट समतेच्या तत्वामध्ये निहित आहे.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)