• 13
  • 1 minute read

१४ डिसेंबरची मराठी शाळांची परिषद – कशासाठी आणि पुढे काय?

१४ डिसेंबरची मराठी शाळांची परिषद – कशासाठी आणि पुढे काय?

१४ डिसेंबरची मराठी शाळांची परिषद – कशासाठी आणि पुढे काय?

ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांचा मुद्दा महाराष्ट्राच्या व्यापक पटावर यावा, यासाठी मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळांवरील एक परिषद रविवार, १४ डिसेंबर रोजी आयोजित केली आहे. ही परिषद राजर्षी शाहू सभागृह, तिसरा मजला, श्री शिवाजी मंदिर, दादर (प), मुंबई येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडेल.मराठी शाळा बंद पडण्यामागे घसरत्या पटसंख्येच्या कारणाबरोबर घातपाताचे कारणही आहे हे पुराव्यांनिशी मराठी समाजपुढे आणणे हा परिषदेचा पहिला उद्देश आहे.
 
या परिषदेतून आम्ही काय साध्य करू इच्छितो?
 
१) अद्ययावत माहिती संकलन: मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींची अनास्था तसेच भूमाफियांची वक्रदृष्टी यांमुळे किती ठिकाणी मराठी माध्यमांच्या शाळांना घरघर लागली आहे, याबद्दलची अद्ययावत माहिती संकलित करणे.यासाठी आपल्याकडील माहिती आम्हाला पाठवावी. संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत:
 
सुशील शेजुळे – ९६०४५२३६६६
अण्णासाहेब चवरे – ९८६००९००९४
 
आपल्याकडील माहितीमध्ये पुढील बाबी हव्या आहेत:
शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या
विद्यार्थ्यांची व शिक्षकांची संख्या
एकूण वर्गखोल्या व प्रसाधनगृहे
शाळा कशामुळे बंद पडली किंवा पाडली गेली – इमारत धोकादायक ठरविण्यात आली, विद्यार्थीसंख्या घटली, शाळेचे स्थलांतर झाले/केले गेले, शिक्षकांचे समायोजन करण्यात आले किंवा इतर काही कारणे
शाळेची इमारत खरंच धोकादायक होती का? की, धोकादायक ठरवून पाडताना किंवा विद्यार्थी नाहीत म्हणून बंद करताना पुरेशी खातरजमा करण्यात आली होती का?
स्थानिक शिक्षण प्रशासन, महसूल प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची शाळा पाडकाम किंवा शाळा बंद करण्यामध्ये काय भूमिका होती?
शाळा पाडल्यानंतर तिथे नव्याने इमारत बांधली गेली का? नसल्यास का नाही?
शाळा बंद करून मुलांना इतर शाळेत पाठवले असल्यास, नव्या शाळेत पटगळती किती प्रमाणात झाली आहे?
शाळाबाह्य मुलांचे काय झाले आहे? त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक उद्ध्वस्ततेची जबाबदारी कोण घेणार आहे?
 
मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर फिरून ही आकडेवारी गोळा करू शकत नाहीत. सरकारकडे यंत्रणा असूनही इच्छाशक्ती नसल्याने हे काम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे काम लोकसहभागातून करणे गरजेचे आहे.
 
या परिषदेचा एक उद्देश म्हणजे स्थानिक पातळीवर – प्रभाग, गाव, वाडी-वसती पातळीवर – मराठी शाळा दक्षता प्रतिनिधी निर्माण करणे. आपण ही जबाबदारी घेऊ इच्छित असाल तर रविवारपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. तातडीने आपले नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल क्रमांक आणि कोणत्या पातळीवर आपण ही जबाबदारी घेऊ शकता, याची माहिती वर दिलेल्या क्रमांकावर कळवा.
 
आपण महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात असाल तरी या परिषदेला उपस्थित राहा. मुंबईत एखादी गोष्ट घडली तर त्याचे प्रतिध्वनी संपूर्ण महाराष्ट्रात उमटतात. त्यामुळे आपली संघटित ताकद आणि कृतिशीलता या परिषदेत दिसणे नितांत गरजेचे आहे.
 
२) आंदोलनाची पूर्वसूचना: अशा परिषदा आम्ही याआधीही घेतल्या आहेत. सरकारशी, महानगरपालिकेशी वेळोवेळी चर्चा केली आहे. पण प्रशासकीय लोक, त्यांना सामील असलेले काही लोकप्रतिनिधी, स्थानिक व राज्यपातळीवरील भांडवलदारी हितसंबंध आणि जमीनमाफिया इतके कोडगे व बिलंदर असतात की मध्यमवर्गीय मवाळ पद्धतीने चालणाऱ्या चळवळी व आंदोलने थकवून मारण्यात त्यांचा हातखंडा आहे.
 
मराठी अभ्यास केंद्र २० वर्षांहून अधिक काळ टिकले आहे, कारण आम्हाला आमच्या शत्रूंच्या संभाव्य शक्तीस्थळांची थोडीफार जाणीव आहे. पण पाशवी बहुमत असलेले सरकार, समाजात फोफावलेला हिंदुत्वाचा ज्वर आणि राजकीय पक्षांची मराठी माध्यमातील शिक्षणाबद्दलची विरळ होत गेलेली बांधिलकी या पार्श्वभूमीवर बाहेरून पाठिंबा किंवा दयाबुद्धीवर आपले काम अवलंबून ठेवता येणार नाही.
 
म्हणून १४ डिसेंबरची परिषद हे रस्त्यावरच्या आंदोलनाची पूर्वसूचना देण्याचे पाऊल आहे. समाजमाध्यमांवरील पोस्ट, वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांवरील बातम्या किंवा मुलाखती यांतून पुरेशी जनजागृती झाली आहे. आता गरज आहे ती महानगरपालिका, सरकार आणि एकूणच मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र, महाराष्ट्र धर्म आणि मराठीकारण यांच्या विरोधात असलेल्या शक्तींना जोरदार धक्का देण्याची.
 
हे साध्य करायचे असेल तर वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर राज्यव्यवस्थेकडून येणाऱ्या दडपणांवर व भीतीवर मात करावी लागेल. कार्यकर्ते म्हणून आम्ही याबाबत निश्चय केला आहे. पण लोकशाहीमध्ये मुद्दा कितीही न्याय्य व महत्त्वाचा असला तरी त्यामागचे संख्याबळच त्या मुद्द्याची ताकद अधोरेखित करते.
 
ही परिषद मराठी शाळांच्या मागे ही ताकद उभी राहील का, हे ठरविण्याचे निर्णायक पाऊल आहे. त्यामुळे हे निवेदन वाचणाऱ्या सर्वांना आमची विनंती आहे की, ही पोस्ट शेअर करणे, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणे, अंगठा दाखवणे किंवा “सोबत आहे” असा कोरडा दिलासा देणे या नेहमीच्या प्रतिक्रियांपलीकडे जाऊन काहीतरी कृती करूया.
 
आज जर आपण मराठी शाळांसाठी उभे राहिलो नाही, तर उद्या मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी भांडण्याची वेळच येणार नाही. आपला समाज जर इतका कमनशिबी असेल तर नाईलाज आहे. पण आम्ही कार्यकर्ते म्हणून आशावादी आहोत. लोक या कामाच्या मागे सर्व प्रकारच्या भीतीवर मात करून उभे राहतील आणि रस्त्यावर येतील, असा विश्वास आहे.
 
रविवारी परिषदेत भेटूया – लोकांमध्ये जाऊन करायच्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून. तोपर्यंत जय मराठी, जय महाराष्ट्र!
 
डॉ. दीपक पवार
 
0Shares

Related post

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे ….. आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे: आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी अर्थव्यवस्थेतील श्रीमंत / उच्च /…
मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ? गेल्या दहा वर्षात भारतीय…

मुंबईत मुलींचे अपहरण आणि राजकीय मौन : सोयीस्कर गप्पीची भयावह किंमत

मुंबईत मुलींचे अपहरण आणि राजकीय मौन : सोयीस्कर गप्पीची भयावह किंमत मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *