• 26
  • 1 minute read

२०१४ च्या मोदी लाटेतून अखिल भारतीय स्तरावर कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून भाजपाचा उदय झाला

२०१४ च्या मोदी लाटेतून अखिल भारतीय स्तरावर कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून भाजपाचा उदय झाला
शिवसेनेच्या वाट्याला लोकसभेच्या २३ जागा आल्या. त्यापैकी १८ जागा सेनेने जिंकल्या व त्यांच्या मतांचे प्रमाण २३.५०% एवढे होते व यात २.६८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. युतीने या निवडणुकीत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ४१ जागा राखल्या आणि त्यांच्या एकत्रित मतांचे प्रमाण ५१.३४% एवढे आहे. २००९ मध्ये त्यांची एकत्रित मते ३५.१७ होती. २०१४ मध्ये ती ४८.४% व २०१९ मध्ये ५१.३४% अशी वाढत गेली. यावरून महाराष्ट्रामध्ये क्रमाने आक्रमक राष्ट्रवाद, कडवे हिंदुत्व व सांस्कृतिक तणाव  कसे रुजत गेले याचे आकलन होणे सोपे होईल.
 
२०१४ च्या विधानसभा निकालातून भाजपा शिवसेनेला मागे टाकत आहे हे स्पष्टपणे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत भाजपाने १२२ जागा तर शिवसेनेने ६३ जागा मिळवल्या तर मतांच्या प्रमाणामध्ये भाजपाने १३.७९ टक्के मतांची वाढ करून २७.८१% मते मिळवली आणि सेनेच्या मतांमध्ये त्यावेळी नाममात्र ३.०९% वाढ होऊन केवळ  १९.३५% मते शिवसेना मिळवू शकली ही उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा होती. भाजपाने आपल्या कडव्या हिंदुत्वाची माळ सेनेच्या गळ्यात घातली व ती माळ आता सेनेच्या गळ्यातला दोरखंड ठरू लागली आहे .भाजपाच्या वाढत्या प्रभावामुळे भाजपापासून सेनेला दूर ठेवणे उद्धव ठाकरे यांना अपरिहार्य झाले.
 
२०१४ च्या मोदी लाटेतून अखिल भारतीय स्तरावर कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून भाजपाचा उदय झाला होता व महाराष्ट्रात भाजपा सर्वाधिक प्रभावशाली पक्ष बनला होता. त्यामुळे त्याच उद्दीष्टांसाठी कडव्या हिंदुत्वाच्या विचाराने प्रभावित /बाधित झालेल्या जनसमुहांसाठी शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाची गरज उरली नव्हती. त्याचबरोबर २०१४ च्या निवडणुकीने मोदींच्या रूपाने अखिल भारतीय स्तरावर जगभर फिरणारा नवा हिंदू हृदय सम्राट उदयाला आला होता. त्यामुळे हिंदू अस्मिता जागवण्यासाठी बाळ ठाकरेंसारखा महाराष्ट्राबाहेर प्रभाव नसलेला प्रादेशिक व जुना हिंदुहृदय  सम्राट उपयोगाचा राहिला नाही आणि याची जाणीव समयोचितपणे उद्धव ठाकरे यांना झाली आणि शरद पवारांच्या पुढाकाराने मविआचा  प्रयोग उभा राहिला.
 
या सुमाराला आणखी एक लक्षणीय घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडली ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा उदय. आरएसएस प्रणीत भाजपाच्या आक्रमक राष्ट्रवाद व सांस्कृतिक दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर वंचित समूहातून सामूहिक प्रक्रिया न उमटणे अगदी अस्वाभाविक होते. २०१९ च्या निवडणुकीत ४७ जागांवर वंचितचे व एका जागेवर एम आय एमचा एक असे ४८ उमेदवार उभे केले  आणि ७.६५ टक्के मते घेतली. यात एक एम आयचा वाटा ०.७३% एवढा होता.  वंचित सारख्या अगदी नव्या संघटनेने नीट संघटनात्मक बांधणी व साधनसामुग्री हाताशी नसताना लोकसभेत एवढी मते घेणे कौतुकास्पद आणि भुवया उंचावणारे होते.
 
राष्ट्रीय स्तरावरच्या नव्या हिंदुहृदय सम्राटाच्या उदयामुळे उद्धव ठाकरेंसाठी त्यांच्या पित्याचा- बाळ ठाकरे यांचा वारसा निरुपयोगी ठरला असून आता त्यांना त्यांच्या आजोबांचा म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा पुढे नेणे क्रमप्राप्त झाले आहे आणि त्यातूनच शेंडी जानव्याच्या कडव्या  हिंदुत्वाचा प्रतिवाद करणे  अटळ ठरले आहे. जितक्या लवकर उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचा स्वीकार करुन सावरकरांच्या मोहपाशातून बाहेर पडतील तेवढे ते स्वतः उद्धव ठाकरे, शिवसेना व महाराष्ट्राच्या सामाजिक सौकर्याला लाभदायक ठरेल! (क्रमशः)
 
उत्तम जागीरदार
0Shares

Related post

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत कांबळे करतांना दिसत आहेत.

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत…

सध्या भारतीय वेब विश्वात धमाकेदार प्रयोग होतांना दिसताहेत. एका बाजुला हिंदी इंडस्ट्रीतल्या मात्तब्बर निर्मात्यांच्या बिग बजेट…
स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *