- 27
- 1 minute read
५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह
५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह
संस्कृत मधल्या 52 उपनिषदांची ओळख पाश्चिमात्य देशांना करुन देणारा मूळ पुरूष मुघल घराण्यातला राजपुत्र होता. असे सांगितले तर आजच्या वातावरणात अनेक तंग मानसिकतेच्या लोकांना पचणार नाही आणि पटणारही नाही. पण विद्वत जगत ज्ञान विस्तारासाठी आयुष्य खर्ची करताना अशा माणसांच्या वृत्तीची कदर कधी करत नाही.
तर याचं झालं असं की सांगवान नावाचे एक युट्यूबर विविध ज्ञानी आणि इतिहासाचे अभ्यासक असलेल्या विविध लोकांसोबत चर्चा करत असतानाच्या चित्रफ़िती समाज माध्यमांवर फ़िरत असतात. त्यातील एक क्लीप काही दिवसांपूर्वी बघण्यात आली. त्यात आर्थर शोपेनहॉवर आणि हेगेल या जर्मन विद्वानांमधल्या विद्वत चर्चेबद्दल एक भारतीय इतिहासकार बोलत होते. त्यांच्या बोलण्यात हा उपनिषद भाषांतराचा विषय प्रथमत: एकला आणि उत्सुकता जागी झाल्याने शोध घेतला, तर खरोखरच एक मौलिक सत्य निदर्शनास आले. मुघल घराण्याचा शहेंशहा शहाजहान यांचा थोरला शहजादा आणि औरंगजेबाचा भाऊ मुहम्मद दाराशिकोह यांचे “सिर्र ए अकबर” पुस्तकाच्या पहिल्या खंडाचा भाग इंटरनेट वरिल अर्काईव्ह मधून हाती लागले. या खंडात (इश-केन-कठ-प्रश्न-मुंडक-मांण्डूक्य-तैत्तीरीय-ऐतरेय-श्वेताश्वतर) यांचा समावेश आहे. अजून ते संपूर्ण वाचायचे आहे. तत्कालीन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने काशी हिंदू विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ हर्षनारायण यांनी दाराशिकोह यांच्या या फ़ारसी ग्रंथाचा हिंदी अनुवाद आणि संपादन केलेले असून लखनौ येथील भुवन वाणी ट्रस्ट प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केलेले आहे.
दाराशिकोह यांनी तत्कालीन प्रमुख मानली जाणारी 52 संस्कृत उपनिषदांचे प्रथम भारताबाहेरील भाषेत भाषांतर केले. अर्थात फ़ारसी विदेशी भाषा असली तरी भारतात सर्वाधिक शतके इथल्या प्रशासनाची आणि शाही राजदरबारांची ती भाषा राहिली आहे, हे आज अनेकांना विशेषत: उच्च विद्या विभूषित परंतु मानव्य विद्याशाखेशी फ़ारकत असलेल्यांना खरेही वाटणार नाही.
संस्कृत मधून फ़ारशी, फ़ारशी मधून फ़्रेंच, फ़्रेंच मधून लॅटिन व जर्मनी आणि तिथून इंग्रजी असा अनुवाद प्रवास करत पाश्चात्य जगाला आपल्याकडच्या उपनिषदांच्या माध्यमातुन इंडॉलॉजीची (भारतीय संस्कृती) ओळख झाली. त्यात शोपेनहॉवर आणि मॅक्स मुल्लर हे इंडॉलॉजीचे अभ्यासकर्ते आणि चाहते म्हणून परिचित आहेत.
शहाजहान यांना चार मुले होती. त्यातला थोरला दाराशिकोह. हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. सतराव्या शतकात जन्मलेला दारा शिकोह, आपल्या धाकट्या भावाच्या म्हणजे औरंगजेबाच्या विपरीत, उदारमतवादी विचारांचा होता. हा काळ साधारण १६५० च्या दशकातील आहे. दिल्लीतील आपल्या ‘मंजिल-ए-निगमबोध’ यमुना नदीवरील निगमबोध घाटावरून हे नाव पडलेले. या राजवाड्यात त्याने हिंदू विद्वानांना एकत्र बोलावले होते, जेणेकरून तो उपनिषदांमधील शिकवण समजून घेऊ शकेल. या विद्वानांमध्ये वाराणसीचे कवींद्राचार्य सरस्वती हे सर्वात प्रमुख होते. दारा शिकोहने स्वतः ५२ उपनिषदांचे फारसी भाषेत भाषांतर केले होते. १६५६ मध्ये त्याने आपला अनुवाद ‘सिर-ए-अकबर’ (Sirr-e-Akbar) या नावाने प्रकाशित केला. तीन वर्षांनंतर औरंगजेबाने सत्तेवर ताबा मिळवला आणि धर्मत्यागाचा (apostasy) आरोप ठेवून शिकोहचा शिरच्छेद केला आणि आजच्या दिल्लीतील चांदणी चौक परिसरातून मिरवणूक काढून वडिलांच्या समोर दाराशिकोहचे शीर ठेवण्यात आले असे म्हटले जाते.
शिकोहचा वैयक्तिक चिकित्सक एक फ्रेंच व्यक्ती होता. त्याचे नाव होते मॉन्सिए फ्रान्स्वा बर्नियर (Monsieur Francois Bernier) त्याला ‘सिर-ए-अकबर’ची एक प्रत मिळाली आणि १६७१ मध्ये तो ती सोबत घेऊन पॅरिसला गेला. १६५९ ते १६७१ या काळात तो औरंगजेबाचाही वैयक्तिक चिकित्सक होता. त्यानंतर सुमारे शंभर वर्षे ‘सिर-ए-अकबर’ फ्रान्समध्ये सुरक्षित राहिले. फ़्रान्स्वा बर्नियर तत्कालीन भारतात मुघल दरबारातही दीर्घकाळ राहिलेला अभ्यासक आहे.
फ्रेंच इंडोलॉजिस्ट म्हणजे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक अंकेतिल द्यु पेरों (Anquetil Du Perron) यांनी याचे लॅटिन भाषेत भाषांतर केले. त्यासाठी त्यांना तब्बल पंचवीस वर्षे लागली म्हणतात. त्यांना ‘सिर-ए-अकबर’ची आणखी एक हस्तलिखित प्रत मिळाली होती, जी अवधमध्ये जो आजचा मध्य उत्तर प्रदेशचा भाग आहे तेथे राहणाऱ्या एका फ्रेंच व्यक्तीकडून आलेली होती. द्यु पेरों यांनी आपल्या उपनिषदांच्या अनुवादाला ‘ऊपेनखात’ (Oupenkhat) असे नाव दिले होते. लॅटीन भाषेत असे उच्चारण स्वर बदल होत नामकरण झाले असणार.
दाराशिकोह सहवासात तसेच औरंगजेबाच्याही दरबारात नि महाराजा जय सिंह यांच्याही सोबत राहिलेला निकोलो मनुची देखील असाच. त्याने मराठी इतिहासाचा प्रत्यक्षदर्शी लिखित पुरावा आपल्याला पहायला मिळतो असा ‘स्टोरिया दो मोगोर’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तत्कालीन कालखंडात पोर्तुगीज भाषा ही व्यापाराची आणि राजनयाची प्रमुख भाषा म्हणून वापरात होती. म्हणून या ऐतिहासिक ग्रंथाचे तीन भाग पोर्तुगीज, चौथा भाग फ़्रेंच आणि 5 वा भाग इटालियन अशा मिश्र भाषेत लिहिला गेला आणि नंतर पुढे विसाव्या शतकात इंग्रजांकडून एसियाटिक सोसायटीद्वारे भारतामध्ये इंग्रजीत भाषांतरित स्वरूपात आला. त्यात मुघलांचा उल्लेख ‘मोगोर’ असा आहे. हा ग्रंथ देखील इंटरनेटच्या अर्काईव्ह मध्ये उपलब्ध आहे. यात पुरंदर तहावेळचे छत्रपती शिवरायांसोबतच्या चर्चेचे प्रसंग त्याने लिहून ठेवलेले आहेत. सखोल इतिहास वाचकांना मनुची यांचे नाव चांगले परिचित आहे.
हे ऐतिहासिक संदर्भ वाचताना प्रश्न हा पडतो की, औरंगजेब क्रुरकर्मा अशी प्रतिमा झालेली असताना आपले हे उपनिषद भाषांतर करणारा दाराशिकोह सहिष्णू असूनही त्याच्या नावाची आणि या ऐतिहासिक कृतीची प्रशंसा मुख्य प्रवाही चर्चेत आणि लोकस्मृतीत का दिसत नाही? आणि पाश्चात्य अभ्यासकांना इंडॉलॉजी अभ्यासताना पाली, अर्धमागधी, गुरुमुखी भाषेतले साहित्य सापडले नसेल का आणि असेल तर त्याची चर्चा होताना का दिसत नसेल ?
~~ आर एस खनके