भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू ही गंभीर घटना.
पवईच्या जयभीम नगरप्रकरणी राज्य सरकार गंभीर नाही, विधानसभा अध्यक्षांच्या आदेशांकडेही दुर्लक्ष.
मुंबई, दि. १ जुलै लोणवळा येथील भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत परंतु अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे. पावसाळ्यात लोणावळ्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही पर्यटक मोठया संख्येने भेट देत असतात. पावसाळ्यातील पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, ते सरकारने स्पष्ट करावे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
विधिमंडळात स्थगन प्रस्ताव मांडत नाना पटोले यांनी लोणावळ्यातील दुर्घटनेप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले. नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्याच्या इतर भागातील धरणावरही पर्यटक पावसाळ्यात भेट देत असताना, अशा घटना वारंवार होत असतानाही त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही. सुरक्षा देऊ, उपाययोजना करू अशी मोघम उत्तरे नकोत तर सरकार नेमक्या काय उपयायोजना करत आहे यावर भूमिका स्पष्ट करावी असे सांगत आझाद मैदानावर अन्यायग्रस्त लोक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. तेथेही चिखल आहे, काहीच सोयी सुविधा नाहीत, सरकार तेथेही दुर्घटना होण्याची वाट पहात आहोत का? लोकांच्या समस्यांकडे राज्य सरकार गांभिर्याने पाहतच नाही असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला.
पवईतील जयभीमनगरमधील ६५० मागासवर्गीय कुटुंबे पावसाळ्यात आजही रस्त्यावर रहात आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी असे निर्देश दिले असतानाही अद्याप ही कुटुंबे उघड्यावरच आहेत. सरकार बिल्डरांसोबत असेल तर त्यांनी तसे सांगावे. देशाच्या आर्थिक राजधानीच्या शहरात जर लोक किड्या मुंग्यासारखे रहात असतील तर ते योग्य नाही. काल भीमनगरला भेट दिली पण परिस्थिती तशीच आहे. राज्य सरकारला कशाचेच गांभिर्य नाही. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाचेही सरकार पालन करत नसेल तर ही गंभीर बाब आहे असेही नाना पटोले म्हणाले.